राजे – १

मंत्रालयामागचं आमदार निवास. आत शिरलं की डावीकडं स्वागतकक्ष. चारेक पायऱ्या चढून गेलं की, समोर कॅण्टिनकडं जाणारं दार, उजवी-डावीकडं लिफ्ट. आमचा तीन दिवसांचा मुक्काम होता. अशा मुक्कामासाठी आमदार निवासासारखी दुसरी चांगली सोय मुंबईत त्यावेळी नव्हती. सकाळी सहाच्या सुमारास आम्ही चौघं पोचलो. चौघं म्हणजे मी, दादा आणि त्याचा पीए कम कार्यकर्ता अजित व गाडीचा चक्रधर सतीश. दादा जिल्हा परिषदेचा सदस्य होता. पण त्याआधीपासूनचा माझा मित्र.
बाहेर गाडी पार्क करून आम्ही आत प्रवेश केला. उजव्या बाजूच्या लिफ्टपाशी गेलो आणि थांबलो. इंडिकेटरवर तिचा प्रवास दिसत होता. ५,४,३...! काही क्षणांत ती खाली आली आणि दार उघडलं गेलं. नेहमीप्रमाणं गच्च भरलेली होती. बाहेर उभ्या असलेल्या आम्हा मंडळींच्या आपसूकच दोन रांगा झाल्या आणि बाहेर येणारा एकेक जण पुढे सरकू लागला. चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर एक दिमाखदार युवक पुढे झाला आणि क्षणार्धात त्यानं समोरच्या रांगेत दादाला मिठी मारली.
"दादा, किती दिवसांनी?"
दादा थोडा चपापलेला दिसला, पण त्याला ओळख पटली. "राजे? इथं कुठं?"
आम्ही रांगांतून बाहेर आलो. तिथंच थांबलो. कारण ही 'कृष्ण-सुदामा भेट' दिसत होती.
"आत्ताच येतोस असं दिसतंय. चलो, चाय मारेंगे," इति तो देखणा युवक, म्हणजे राजे. दमदार आवाज. खर्जातला वाटावा असा. जबर जरबेचा. कारण दादाही चालू लागला होता.  
मी केव्हापासून या क्षणाची वाट पहात होतो. एक तर आमदार निवासापाशी आपण आहोत, बाहेर आलं टाकून होत असलेल्या चहाचा दरवळ आहे, तो दरवळ पुरे नाही म्हणून की काय, पण ती चहा ढवळण्याची डाव पातेल्यावर आपटून साद घातली जात आहे आणि इथं आधी रुम, मग फ्रेश होऊन चहा अशा "आरोग्यं धनसंपदा..." मार्गावर आम्ही होतो. सुटका झाली होती. मी लगेचच दरवाजाच्या दिशेनं पाऊल टाकलं.
ओळखी झाल्या. चहाचे दोन राऊंड झाले. सिगरेट झाली. आणि राजेंच्या पुढाकारानं आम्ही पुन्हा आमदार निवासात गेलो. आम्ही खोली गाठली, राजे त्यांच्या दिशेनं निघून गेले. पण जाण्याआधी एक सांगून,
"संध्याकाळी साडेसातला खाली भेटूया. जेवायला जाऊ."
दादा काही तरी बोलणार होता तेवढ्यात त्यांनी, "सबबी सांगू नकोस. जाऊ जेवायला" असं आपल्या, बहुदा खास ठेवणीतल्या आवाजात सांगून टाकलं. दादा गप्प झाला.
संध्याकाळचा कार्यक्रम ठरला गेला. मुंबईच्या अशा दौऱ्यात बहुतेक पहिल्याच संध्याकाळी मी 'चर्चगेट स्टोअर'मध्ये बसून बिअर पिणं पसंत करायचो. तिथं पिचरमधून बिअर मिळते. त्यामुळं ती आवड. त्या दिवशी संध्याकाळीच तिथं जायचं ठरवलं होतं, ते आता कोलमडलं होतं. स्वतःवर चरफडण्याखेरीज हाती काही नव्हतं. हे कोण राजे हे कुतूहल त्या चरफडण्यातूनच जागं झालं. कारण त्यांच्या त्या जरबयुक्त आवाजावर दादानं मान तुकवली होती हे थोडं नवलाचंच होतं. असो. आम्ही दिनक्रमाला लागलो.
---
राजे. उंची सहा फुटांवर एखाद-दोन इंच. खानदानी देशमुखीला शोभेल असा गौरवर्ण. स्वच्छ चेहरा. तुळतुळीत दाढी केलेली. अगदी रोज. झुबकेदार मिशा. डोक्यावर लष्करातल्या निवृत्त वारिकानं हात फिरवलेला असावा. अगदी बारीक कापलेले केस. प्रमाणबद्ध. तजेलदार डोळे, अर्थात राजे नॉर्मल असतील त्याच दिवशी. म्हणजे दिवसाउजेडी पाहिले तर ते नॉर्मल असतील तेव्हा त्यातील तजेला कळायचा. एरवी तो संध्याकाळी चौपाटीवर मावळत्या सूर्याच्या प्रकाशात पाहण्याची संधी मिळाली तरच.
जशी उंची तगडी तशीच शरीरयष्टीदेखील. मी पहिल्यांदा भेटलो तेव्हा या गृहस्थाचं वय होतं सत्तावीस-अठ्ठावीसच्या घरात. पहिल्यांदा पाहिलं की कोणालाही वाटावं हा गृहस्थ एक तर लष्करात कॅप्टन वगैरे असावा किंवा आयपीएस किंवा गेलाबाजार आयएएस. राजेंची 'कामं' पाहिली तर त्यांची उडी त्यापेक्षा कित्येक पट लांब होती हे नक्की. अर्थात, त्याविषयी थोडं पुढं.
एकूण राजेंचं व्यक्तिमत्त्व रुबाबदार, पहिल्या दृष्टीभेटीतच प्रेमात पाडणारं.
---
दिवसभरात मंत्रालयातील दादाची कामं उरकता-उरकता मध्ये जो वेळ मिळाला त्यात राजे समजत गेले. कारण एकच. संध्याकाळी आपण ज्याला भेटणार आहोत, तो गृहस्थ आहे कसा हे कुतूहल. त्यामुळं मधल्या वेळेत चर्चा फक्त राजेंभोवतीच केंद्रित झालेली होती. मध्ये एकदा तिसऱ्या मजल्यावर त्यांचं ओझरतं दर्शनही झालं. शिक्षणमंत्र्यांसमवेत. शिक्षणमंत्री त्यांच्या दालनातून बाहेर आले, पाठोपाठ, जणू किंचीत शेजारीच असल्यासारखे राजे. मग मंत्र्यांचे स्वीय सचिव आणि इतर मंडळी. आम्ही पंधरा-एक पावलांवर होतो. बाहेर येताच दारात थांबून त्यांच्यात काही बोलणं झालं. स्वीय सचिव वाकला होता. मंत्री त्यांच्या त्या वेषात गबाळे म्हणूनच उठून दिसत होते. या सगळ्या घोळक्यात राजे ताठ उभे होते. मंत्र्यांना काही सांगत होते. आम्ही दोन-चार पावलं पुढं टाकली होती. आणि तेवढ्यात राजेंच्या तोंडून वाक्य आलं,
"सर, यू जस्ट एन्शुअर दॅट द स्कूल गेट्स रिकग्नीशन. अ क्वेश्चन ऑफ मोअर दॅन फायूहंड्रेड स्टुडंट्स फ्रॉम रुरल एरिया. ऑल आय वॉंट इज दॅट द इन्स्टिट्यूट इज नॉट आस्क्ड टू फाईल अॅन अॅफिडेव्हिट दॅट इट इज एंगेज्ड इन इल्लिगल अॅक्टिव्हिटी."
मी उडालोच. शिक्षणमंत्री दिसायला गबाळे होते, पण इंग्रजी अस्खलीत बोलायचे, समजायचं आणि लिहायचेही, शिवाय त्यांचं वाचन दांडगं आहे हेही बऱ्याच जणांना ठाऊक होतं. पण राजे? एव्हाना दादाकडून ऐकलं होतं ते थोडं वेगळंच होतं. मराठवाड्यातून शाळा, औरंगाबादेत महाविद्यालयीन शिक्षण. दादाची आणि त्यांची ओळख महाविद्यालयीन काळातील. विद्यार्थी चळवळीच्या माध्यमातून एका शिबिरात झालेली. राजे म्हणजे त्यावेळचे हिरो. अभिनय, एकपात्री यात हात धरणारा कोणी नाही वगैरे...! पुढे तारू भरकटलं आणि ते बेपत्ता झाले. मग कानी आलेल्या खबरा म्हणजे कुठे गर्द वगैरेचं व्यसन असल्याचं. त्यानंतर मंत्रालयातील कामांची 'गुरूकिल्ली' ही त्यांची ओळख. थोडक्यात या चौकटीतच (खरे तर ही आपलीच चौकट असते, तीही चुकीची) स्वच्छ इंग्रजीत संवाद कुठंही बसत नव्हता. वाया गेलेला माणूस हे तीन शब्द त्या वर्णनाला पुरेसे ठरावेत. दादाच्या म्हणण्यानुसार त्यानंतरची भेट ही सकाळचीच आणि आत्ता हे त्यांचं असं दर्शन.
राजेंचं अस्खलीत, कुठंही न अडकता असं ते इंग्रजी वाक्य ऐकून मी दादाकडं पाहिलं आणि त्यानंही भुवया उडवत माझ्याकडं पाहिलं.
एव्हाना मंत्र्यांनी होकार दिला होता राजेंच्या मागणीवर, आणि वरून "आमच्याकडंही लक्ष ठेवा" अशी पुस्ती जोडली होती. त्यावर चक्क हात जोडत "च्यायला राव, इथं भेटलात हेच पुरं. तिकडं नको!" हा त्याचा टोला मी पहिल्यांदा ऐकला आणि मला वाटलं आता काही तरी गडबड होणार. पण कसचं काय, शिक्षणमंत्री "असं थोडंच सोडेन तुला," असं म्हणत पुढं निघालेदेखील.
राजे आणि मंत्र्यांच्या वयातलं अंतर किमान तीस वर्षांचं होतं. मंत्री पश्चिम महाराष्ट्रातले तर राजे मराठवाडा. म्हटलं तर राजकीय दृष्ट्या मंत्र्यांनी त्याला पाण्यात पाहिलं असतं, तर आश्चर्य वाटलं नसतं. पण इथं ही मैत्री? मला धक्के बसत होते. मंत्री निघून गेले आणि राजे पुन्हा त्यांच्या दालनात शिरले. आम्ही आमच्या कामाला निघून गेलो.
तर मराठवाड्यातून आलेला हा उमदा - किमान दिसणारा तरी - तरूण आता मंत्रालय परिसरात अनेकांचा अनेक कामांसाठी 'गुरूकिल्ली' झाला होता हे अखेर एकदाचं डोक्यात शिरलं त्या प्रसंगातून आणि अंगभूत कुतुहलातून - किंवा भोचकपणातून म्हणा - मी संध्याकाळच्या भेटीकडं नजर लावून बसलो. सकाळी ही भेट ठरताना झालेली चिडचिड आता पळून गेली होती.
(क्रमशः)