राजे - ६

राजे आणि मी अशी ही एक भेट. मुंबईतच.
मी काही कामासाठी गेलो होतो. मुक्काम आमदार निवासातच होता, पण राजेंकडे नाही. जाणीवपूर्वकच मी ते टाळलं होतं. पण कसं कोण जाणे मी आल्याचं त्यांना समजलं आणि दुपारच्या सुमारास त्यांनी बरोबर मला ‘चर्चगेट स्टोअर’मध्ये गाठलं.
"क्यूं सरकार, आम्हाला टाळत होता की काय?"
मला खोटं बोलणं जमलंच नाही. हा माणूस आपलं काहीही नुकसान करीत नाही. पैसा कमावतो, पण म्हणून सक्तीनं बिल देण्याचा आग्रहही धरून आपल्याला कानकोंडं करत नाही हे सगळं मनात असल्यानं मी एकदम म्हणालो, "म्हटलं तर हो, म्हटलं तर नाही."
"मग एक शिक्षा आज. आज आमच्याकडून रात्रीभोजन." हा एक खास शब्द हा गृहस्थ नेहमी वापरायचा.
रात्री मी, माझे दोन स्नेही आणि राजे असे आम्ही जेवण घेतलं त्या हॉटेलवर नेमकी त्याचदिवशी उशीरापर्यंत ते चालू ठेवल्याबद्दल धाड पडायची होती. पण राजे होते आणि तेच परमीट असल्यासारखं होतं आमच्यालेखी. हॉटेलातून आम्ही बाहेर पडलो, तर राजे सरळ पोलीस जीपकडे गेले. नेहमीप्रमाणे अधिकारी बसला होता पुढे.
"ओळखलं?" इति राजे.
"?" अधिकाऱ्याच्या चेहऱ्यावर मग्रुरी होतीच.
"देशमुख. विपिनचा दोस्त." विपिन हे दक्षिण मुंबईच्या त्या झोनच्या डीसीपीचं नाव.
"मी काय करू?" तो इन्स्पेक्टर.
"काही नाही. आम्हाला उगाच लटकवू नका. जेवण करत होतो. उशीर झाला असेल तर तो दोष हॉटेलवाल्याचा आहे. आमचा नाही. त्यानं बसू दिलं, आम्ही बसलो."
हे बोलणं होतं न होतं तोच डीसीपींचा ताफा तेथे आला. राजेंनी थाप मारली असावी असं वाटून आम्ही थोडे हबकलो होतो, पण तसं नव्हतं. त्यांना पाहताच तो डीसीपी पुढं आला. काही वेळात आम्ही इतरांपासून वेगळे झालो आणि परतीचा मार्ग मोकळा झालादेखील.
"साला, क्यूं रे एकही हॉटेलको पकडता है?" इकडे राजे आणि तो डीसीपी यांच्यात जुंपण्याची चिन्हे होती.
"तुझे छोडा ना. भाग ना फिर."
"बात वैसी नही है. एकही हॉटेलके पिछे क्यूं लगता है? मै बताऊ?"
डीसीपीच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव.
"तुझे जॉईंटने बोला होगा. पक्का." जॉईंट म्हणजे जॉईंट कमिशनर ऑफ पोलीस,
"तू जा ना बाप..." तो डीसीपी एकदम गयावया करण्याच्या परिस्थितीत आला.
"छोड यार. बोल उसको के हॉटेल बंद किया है. छोड दे सब लोगोंको. जाने दे. इतना तू कर सकता है."
आम्ही वैतागलो होतो. ही समाजसेवा करण्याची अवदसा राजेंना आत्ता कुठून आठवली म्हणून. पण त्या डीसीपीनं खरोखरच सर्वांना सोडून दिलं आणि हॉटेल बंद झाल्याचं पाहून तोही निघाला. जाता-जाता त्याला राजेंनी रोखलं.
"विपिन, एक बोलू तुझे? यू आर टोटली मिसफिट इन द जॉब. यू वुईल सफर..."
ते शब्द मात्र खरे ठरले. पुढे हा अधिकारी सचोटीचा म्हणूनच नावाजला आणि पाहता-पाहता साईड ब्रँच, सेंट्रल डेप्युटेशन असं करत कुठं अडगळीत गेला ते कोणालाही कळलं नाही.
आम्ही रुमवर परतलो. मी अद्यापही कोड्यात होतोच. हॉटेलवरील छाप्यामागील राजकारण राजेंना ठाऊक होतं. माझ्या मध्यमवर्गीय मानसिकतेत तिथल्या जेवणाचं बिल त्यांनी दिलं की नाही हीच टोचणी होती.
"दिया है बिल. धाडीमागचं मला ठाऊक आहे कारण त्या हॉटेलनं त्याच परिसरातील दोन बड्या हॉटेलचा धंदा बसवलाय. त्यांनी गृह राज्यमंत्र्यांना सांगून या हॉटेलला अडचणीत आणायचा प्रयत्न चालवला. जॉईंट सीपी त्याला सामील. चोर साले सगळे."
"तो नियम तोडतोच ना?" मी.
"तोडतो. करा कारवाई. पण मग सगळ्यांवर करा. डान्सबार चालतात, लेडीज सर्विस बार चालतात, हे फक्त चालत नाही. म्हणूनच मी आडवा गेलो."
"तुझा विपिनशी काय संबंध?"
"अरे, यू मस्ट बी फ्रेण्ड्स विथ हिम. फिलॉसॉफीवाला आहे. मतलब, एम.ए. फिलॉसॉफी. मग एम.फिल. आणि पीएच.डी. आय वंडर व्हाय ही बिकेम आयपीएस! टोटली अनफिट. काण्ट नेगोशिएट, बार्गेनिंग नाही करत. तत्त्वांना चिकटून. त्याला ही पोस्टिंग मिळाली कशी ठाऊक आहे?"
"?"
"दिल्ली कनेक्शन. कनेक्शन म्हणजे, थेट कॅबिनेट सेक्रेटरी."
हे थोडं खरं असावं. कारण तेव्हाच्या कॅबिनेट सेक्रेटरींचं अनेक राज्यातील अशा अधिकाऱ्यांकडं लक्ष असायचं आणि असे अधिकारी अडगळीत जाऊ नयेत यासाठी ते प्रयत्न करायचे असं बोललं जायचं. त्यात त्यांना किती यश यायचं वगैरे संशोधनाचा विषय.
"पण तुझा काय संबंध त्याच्याशी?"
"फिलॉसॉफी. एका कॉन्फरन्समध्ये तो होता. मी श्रोता होतो. त्यानं काही तरी मुद्दे मांडले. समथिंग अबाऊट बुद्ध अँड गांधी. दोघांना एकत्र आणू पाहणारं काही तरी. मी त्यावर प्रश्न विचारले. बुद्धानं त्या काळी एका व्यवस्थेच्या विरोधात बंड केलं, मूलभूत विचार मांडले. गांधींनी ते थोडंच केलं आहे, गांधींनी व्यवस्थेला नैतीक आयाम देण्याचा प्रयत्न जरूर केला, पण मूळ विचारधारा थोडीच बदलली त्यांनी, असा काहीसा माझा मुद्दा होता. एक छोटी चकमक झाली आमची. आत्ता तपशील आठवत नाहीत..." हे सांगताना ग्लासकडं अंगुलीनिर्देश. बुद्ध आणि गांधी यांच्यासंदर्भात असा तौलनीक विचार मांडतानाच तपशील आठवत नाहीत असं हा माणूस म्हणतो म्हणजे हे तपशील काय असावेत इतकाच माझ्यापुढचा प्रश्न.
"...पण त्या कॉन्फरन्समधून बाहेर पडताना हा आला माझ्याकडं, ओळख करून घेतली आणि भेटायला बोलावलं. ही थॉट आयम अ स्टुडंट ऑफ फिलॉसॉफी. मी त्याचा गैरसमज दूर केला. अर्थात, माझ्याविषयी खरी माहिती सांगितली नव्हतीच. ती पुढं आमच्या भेटी वाढल्या तशी त्याला समजत गेली."
"तुझ्या ‘करियर’विषयी त्याचं मत काय?"
"ते काय असणार? तो म्हणतो दे सोडून, खासगी क्षेत्रात तुझ्या गुणवत्तेला वाव आहे वगैरे..."
"आणि ते तुला नको आहे..."
"कोण म्हणतं? खासगी क्षेत्रासाठी ज्या आवश्यक गोष्टी आहेत, त्या माझ्याकडं नाहीत, त्या रेसमध्ये मी पडू शकत नाही. कारण तिथं माझ्या गुणवत्तेवर इतर गोष्टींच्या जोरावर मात होऊ शकते आरामात. मग तिथं सडणं नशिबी येईल."
"हा विरोधाभास आहे राजे. इथंही तुम्ही रिलेशनशिपच्याच जोरावर काही करता. तिथंही तेच करावं लागेल..."
"नाही. मी इथं रिलेशनशिपच्या जोरावर काहीही करत नाही. इथं सरळसोट व्यवहार असतो. दिले-घेतले. बास्स. नातं-बितं, संबंध, मैत्री सारं झूट. ठरलेल्या नोटा मिळाल्या नाहीत तर इथं काम होत नाही. कारण इथलं प्रत्येक काम नियमांत बसवावं लागतं. आणि ते तसं खासगी क्षेत्रात नसतं. तिथं नातं-बितं महत्त्वाचं. ते गोट्या चोळणं आपल्याला जमणार नाही. इथं आपण काम झालं की कुणालाही "वर भेटू नका" असं सुनावतो. फाट्यावर मारतो. तो आपलं काहीही वाकडं करू शकत नाही. आपण आपली न्यूझन्स व्हॅल्यूही इथं निर्माण करतो. ती तिथं नसते..."
माझं बोलणंच खुंटलं. त्यामुळं त्या ‘ओरिजिनल’वर लक्ष केंद्रित करत मी गप्प झालो.
हा माणूस पचवणं अवघड आहे इतकंच काय ते डोक्यात शिरलं त्या रात्री. पुढं आमचा संपर्क राहिला नाही. पण हा माणूस असा आयुष्यातून जाणार नव्हता. त्यानं आधी अनेक धक्के दिले होते. एक राहिला होता. अनेक कल्पनांची मांडणीच विस्कटून टाकणारा.
(क्रमशः - यानंतर सातवा आणि शेवटचा भाग)