चिंता नाही उगा चित्ता...!

रम्य माझे बालपण / आठवते पुन्हा पुन्हा /
दंगा मस्तीत खेळणे / लाल मातीत लोळणे /
किती चिंचेची ती झाडे / किती धुंडाळले वाडे /
सख्या सोबत्यांच्या सवे / उगाउगी झगडावे /

सौख्यदायी तरुणाई / आठवते पुन्हा पुन्हा /
वसंताचे आगमन / उमलत जाई मन /
ओठावर येता मिशा / विचारांना मिळे दिशा /
अंगी उत्साहाचे वारे / कृतीसह उंच नारे /

गृहस्थाश्रमाची गाज / आठवते पुन्हा पुन्हा /
मुलाबाळात रमलो / कर्तव्या ना विसरलो /
पूर्ण क्षमतेने काम / व्यर्थ नाहीच आराम /
नाही मोजली पुण्याई / पापाची ही भीती नाही /

भविष्यात काय आहे/ मला नाही काही ठावे /
मागे वळोनी पाहता / चिंता नाही उगा चित्ता /
येता  दिन सार्थ व्हावा / लोकांसाठी खर्च व्हावा /
समाजाशी माझे नाते /नित्य राहो सदोदिते /