जुन्या शिळ्याच मैफिलीत काय नवे नादवी?
जुन्या-जुन्यातुनी नवीच आस रोज जागवी॥
धरा जुनी जमीन तीच, तीच जीर्ण मृत्तिका;
वर्षतो जुना ऋतूच चार मास नेटका।
तरल गंध तो तरी नवाच होत मोहवी----
जुन्या-जुन्यातुनी नवीच आस रोज जागवी॥
सात सूर, तेच ताल, पदन्यास तोच तो;
चित्रकार सृष्टीचा रंग तेच फेकतो।
तरी दिठीस खिळवुनी नवाच मोह गुंगवी;
जुन्या-जुन्यातुनी नवीच आस रोज जागवी॥
देह जुना बीज जुने, तीच मेळशृंखला
अनादि चेतनेसवे सजीव तोच जन्मला।
का तरी नवीन जीव पाश नवा गुंतवी
जुन्या-जुन्यातुनी नवीच आस रोज जागवी॥
_ मुग्धा रिसबूड.
रचनाकाल : पौष शुद्ध पौर्णिमा, शके १९३०.