मी ही तयार आहे

या संकटांचि चिंता माझ्या मनास नाही
पचवून दुःख सारी ते ही तयार आहे

असली मनात श्रद्धा तर देव सर्वव्यापी
दगडात राहण्याला तो ही तयार आहे

कसले हिशोब करता? थोडे खुशाल बिघडा
थोडा सुधारण्याला मी ही तयार आहे

शत्रू हवा कशाला? हे दोस्त बास झाले
धोकाच द्यायचा तर कुणिही तयार आहे

मदिरा खराब आहे सांगायचा मला जो
आली समोर मदिरा, तोही तयार आहे

सत्यात प्राप्त व्हावी कशि हा सवाल आहे
स्वप्नात यायला तर ती ही तयार आहे

गेला सराव माझा अश्रूस रोखण्याचा
अन थांबण्यास डोळा नाही तयार आहे

माझ्या स्तुतीमुळे ती आली खुलून आणि
दुसऱ्याच साठि कोणा सजुनी तयार आहे

मृत्यूस सांग माझ्या, रेंगाळला फुका तो
मी भेटण्यास त्याला कधिचा तयार आहे