स्पेशल इफेक्ट!

निवेदन : या कलाकृतीतील (डोंबल! ) सर्व घटना आणि पात्रे वास्तव असली, तरी कोणत्याही सभासदांचा त्यांच्याशी काहीही संबंध नसण्याची दाट शक्यता आहे. या लेखनाच्या वाचनानंतर कोणतीही जिवंत व्यक्ती म्रुत झाल्यास, तो निव्वळ योगायोग (किंवा त्याचा भोग! ) समजावा.
--------
डिस्कव्हरी, अनिमल प्लॅनेट, इत्यादी इत्यादी वाहिन्यांवरून अनेकविध माहितीपर कार्यक्रम, उपक्रम चालू असतात म्हणे दिवसरात्र. मी कधी फिरकलो नाही तिकडे. परवा सहज सकाळी टीव्ही लावला आणि जो चॅनेल लागला होता, तो पाहून एकदम सर्दच झालो. कुणीतरी भगवी कफनी, गळ्यात मोठमोठ्या मण्यांची माळ घातलेला, पांढरे केस भुतासारखे मोकळे सोडलेला एक बाबा बेंबीच्या देठापासून ओरडून काहीतरी सांगत होता. आधी मला वाटलं, कुठला तरी न्यूज चॅनेलच की काय! कारण प्रसंगानुरूप वेशभूषा करायचं फॅड तिकडे सध्या असल्यामुळे त्यातही काही अवघड नव्हतं. पण हे प्रकरण वेगळंच होतं, ते जरा नीट बघितल्यावर कळलं.

तुमच्या घराला, ऑफिसला, आयुष्याला कुणाची तरी द्रुष्ट लागलेय, त्यातून कसं वाचायचं, यावरचे मौलिक विचार तो मांडत होता. कुणीतरी तुमच्या घराची तारीफ करतं, तुमच्या मुलाचं कौतुक करतं आणि तेव्हापासूनच दुर्दैवाचा फेरा सुरू होतो हे त्याला सांगायचं होतं. जनहितार्थ दाखविल्या जात असलेल्या या कार्यक्रमातलं 'स्वहित' थोड्याच वेळात उघड झालं. कुठला तरी ताईत गळ्यात घातला आणि लॉकेट गाडीत, घरात, ऑफिसात टांगून ठेवलं, की ही सगळी संकटं, दुर्दैवाच फेरा बिरा दूर होतो, असं त्याच्या बोलण्यावरून कळलं. या लॉकेटच्या सेटचे किंमत होती, फक्त अडीच हजार की काय तरी!

सगळ्यात महत्त्वाचा आणि नवी दृष्टी देणारा भाग होता, त्या जाहिरातीतल्या स्पेशल इफेक्टचा. एक बाई घरात येते, बाळाला उचलून घेते आणि त्याचं कोडकौतुक करते. तिच्या डोळ्यातून अचानक पांढरे किरण बाहेर येतात आणि बाळ एकदम रडायलाच लागतं.

गंमत म्हणजे, जाहिरातीच्या पुढच्या भागात, घरात लॉकेट अडकवल्यावर, हे किरण परत त्याच्या डोळ्यात जातात, असं दाखवलं होतं. कमाल आहे की नाही?

मला तर थेट रामानंद सागरांच्या (गेले बिचारे! ) रामायणाचीच आठवण झाली. त्यात नाही का, एकमेकापासून पंधरा-वीस फुटांवर उभे असलेले राम-रावण एकमेकांवर बाण सोडतानाही आधी तो आकाशात मारायचे. मग तिथे काहीतरी वर्तुळं नाहीतर चांदण्या निर्माण होउन एक बाण नाहीसा व्हायचा. मग त्या रामाच्या नाहीतर रावणाच्या चेहऱ्यावर एकता कपूरच्या सीरियलमधल्या कलाकारांच्या चेहऱ्यावर धक्का बसल्यानंतर येतात, तसले भाव.

हे भारीच ना?

माझ्या आजोळी परसातल्या एका फणसाला येणारे-जाणारे लोक दृष्ट लावतात म्हणे. त्यामुळे तो फणस पिकायच्या आधीच काळा पडतो. असलं एक लॉकेट घेऊन देतो आता मामाला. म्हणजे तिकडे गेल्यावर 'स्पेशल इफेक्ट'चा खेळ तरी बघायल मिळेल घरबसल्या!