खेकडा नि कबिला (भाग २)

पळत जाण्याचा बेत रद्द झाला. गार-गार वाऱ्यात नि सटंसटं मार देणाऱ्या पावसात घराची वाट चालत होते.  रेनकोटच्या टोपीवरचं पाणी निथळून त्याचा टपटप आवाज येत होता.  आडव्या-तिरप्या पावसाच्या मोठाल्या थेंबानं माझा जीव एवढासा झालेला. रस्त्याच्या दोन्ही बाजूनं स्वच्छ खळाळणारे ओहोळ जोरात वाहात होते. पावसाचा नाद-वाऱ्याचा नाद-ओहोळाचा नाद-नि पाखरं चिडीचूप बसल्यावरचा शांततेचा नाद-मधनंच खोडसाळ पिलावर ताणून आवाज करणारा पाखराचा नाद-माझ्या चालण्याचा आवाज-रेनकोटवर पडणाऱ्या थेंबांचा नाद-माझ्या शांततेचा अगदी मनातला आवाज---या साऱ्या नादानं माझा जीव अगदी वेडावलेला. नादात हरवून ओढाळ वाट कधी संपते याकडं माझी नजर होती. इतक्यात बाजूच्या जरा संथ ओहोळ वाहत असलेल्या जागेकडं माझी नजर वेधून गेली. चक्क!!!... तिथं खेकडा नर-मादी नि बच्चे कंपनी झकास संथ आराम करत होते.  अरेच्या!!!.. कित्ती-कित्ती सुंदर खेकडयाचा कबिला आहे.  इवली-इवली पिल्लं तर कित्ती-कित्ती छान-छान!!!... म्हणत टाळ्या पिटत. संवाद करत माझी नजर खाली दगडाआड लपलेल्या कबिल्याकडंच होती. बिच्चारे!!! काय झालं बुआ..... काठाजवळ असलेल्या पोरीला ओरडायला म्हणून माझा रानटी संवाद ऐकत सारी आड झाली. नि आपल्या इवल्या-इवल्या डोळ्यांनी हळूच टुळूटुळू सारी मला पाहत होती. पिलांचं बदामी पण गुलबस झाक असलेलं चिंचोक्याइतकं शरीर पाहून तर मला आनंदानं वेड का लागलं नाही.  याचं राहून-राहून आश्चर्य जाणवत होतं. पिलावळीची मिश्किल नजरही मला खदखदून हसवत होती.   

पाण्यातील शेवाळी दगडाआड लपालपी खेळत असलेल्या पिलावळीवरनं नजर हटत नव्हती. अगदी अल्लद ओंजळीत त्यांना घेण्याचा मोह काही मला आवरता आला नाही. काठावर बसून त्या ओहळात हात घातला. खूप प्रयत्न केला.  पण शपथSSS एक पिलू हातात येईल तर!!!... मला ओंजळीत क्षणभराकरता का होईना पण जितकी मावेल तितकी पिलावळी हवी होती. मग मी दप्तरातील आपला रिकामा डबा त्या खळाळत्या ओहोळात स्वच्छ धुतला. नि जरा वेळातच त्या डब्यात १०-१२ पिलं जमा झालेली पाहून मला आनंद झाला, त्या कोवळ्या इवल्या पिलांच्या हालचाली पाहून मी वेडावून गेले.घरी मागल्या बाजूला टाकं बांधून त्यात ही पिलावळ मोठी केली तर किती मजा येईल. हा विचार हमखास माझ्या  डोक्यात जाऊन शिरला. पण आबी मला असं काही करू देणार नाही याची पूर्ण जाणीव असूनही मी असली स्वप्नं पाहण्यात दंग असायची.जरावेळानं रेनकोटच्या दोन्ही ऐसपैस खिशात पाण्यासह पिलावळ आत टाकली. नि बटण लावले.पिलांना मी अल्लदसा स्पर्श केला.पण त्यांची अस्वस्थ हलचल पाहून माझीही बेचैनी वाढली. नि मला काही न सुचून मी घरचा रस्ता सरसर चालू लागले.  

शाळा सुटल्यावरही तास-दोन तास मी इथं रमले. अगदी आबीचा खास हिटलरीपणा समोर तरळत होता तरीही!!!... पिलावळीची दुनिया तिच्या हिटलरीपणावर मात करून गेली. माझा वेळ झक्कास गेला. पण आता आबीची हिटलरीसह वास्तव दुनिया आठवली. नि माझं धाबं दणाणलं. इतक्या गारव्यात नि पावसातही मला घाम फुटला. 'आलीया भोगासी असावे सादर' म्हणत मी चालत होते. आबी पायरीवरच उभी होती. मला पाहताच ती आत गेली. माझ्याशी अबोला तर तिचा कधीचाच सुरू झाला होता. सवयीनं मला आता कळू लागलेलं. त्यामुळं आता ओले कपडे बदलून, केसं खसाखसा कोरडे केले. अंगात उबेच्या लहरी दौडत गेल्या. सारं सोपस्कर झाल्यावर जेऊन झोपले. आबीकडं उठल्यावर पाहिलं तर तिचा चेहरा जरा निवळला होता.  

माझी शिकवणीची वेळ झाल्यानं. मी दप्तर घेऊन दारावरचा रेनकोट घातला. आबीनं माझ्याकडं पाहून न पाहिल्यासारखं केलं. नि मी तसंच फाटक उघडून बाहेर आले. आता पावसाचा जोर कमी झालेला असला तरी संथ धारा अगदी ध्यानमग्न होऊन बरसतच होत्या. माझ्या डोक्यात टयूब पेटली तसं मी रेनकोटच्या खिशात हात घातला पण त्यात पिलावळीचं, ना, पाण्याचं नामोनिशान उरलं नाही. पाहिलं तर कळलं की, खिश्याच्या वरच्या बाजूला बटन बंद होतं तरी बाजूच्या सांदीतनं पिलावळ गायप झाली. शिवणीतल्या जागेतनं पाणी पण निथरून गेलं होतं  मग काय!!... माझ्या धांदरटपणावर मी हसण्याशिवाय अजून काही करू शकले नाही. सारं काही उलट-पूलट झाल्यानं शिकवणीत पण उलटपूलटपणा करून मी संथ नि ढिम्म गतीनं घरी पोचले. पाऊस जरी आता थांबला असला तरी बाहेर खेळायला जायचा माझा बिलकूल इरादा नव्हता. व्हरांडयात दप्तर पसरून मी अभ्यास करण्यात मग्न झाले. यात बराच वेळ गेला.    
पावसाचेच दिवस असल्यानं पाऊस आपली कामगिरी बजावत होता. संथ पाऊस आता शाळेत निघतांना रोजचाच झाला. एक दिवस शाळेतनं येतांना ओहळापाशी जरा वेळ थांबायचं हा बेत पक्का करुनच शाळा गाठली. पाऊस थांबायची कोणतीही चिन्ह दिसत नव्हती. सारं वातावरण पावसानं सर्द झालेलं. मला हा खुला सर्दपणा खूपच आवडून जायचा.  गुलमोहराखाली तर पालापाचोळा भिजून-कुजून एक अजीब उग्र- कुंद गंध दरवळत राहायचा. हा गंध पण खूप आवडायचा. त्या दिवशी शाळेत डबा खाण्यात मला काही फारसा रस नव्हता. नरम पडलेली बिस्कीटं मी तशीच डब्यात परत ठेवली. नि शाळा कधी सुटते याची वाट पाहत चित्रकलेच्या तासात रमण्याचा प्रयत्न करत  होते.