खेकडा नि कबिला(भाग ३)

एकदाचं शेवटची लंबीऽऽऽघंटा वाजली नि रेनकोट घालून मी तरातरा फाटकाकडं गेले. माझी पावलं आज उगीच भराभर पडतायत जाणवू लागलं. वळणाजवळचा ओहोळ आल्यावर खूप बरं वाटलं. माझी वेधक नजर दगडाआडच्या पिलावळींचा नि त्यांच्या माता-पित्याचा शोध घेऊ लागली. कुणीच दिसेना तसं माझा चेहरा कोमेजला. मी ओहोळाच्या काठावर तसंच बसून राहिले. बऱ्याच प्रतीक्षेनंतर सळसळत पाण्यात मस्त पोहत-पळत खेकडयाचा कबिला येतानां दिसला. कबिला पाहिल्यावर हायसं जाणवलं. त्या कबिल्याचा तो ओहोळ सहलीची खाशी जागा असल्याप्रमाणं इथं रमला. त्यांची आपल्याच दुनियेतली पळापळ नि लपालपी सुरू झाली. माझ्याकडं त्यापैकी कुणाचंही जरी लक्ष नसलं तरी माझी नजर मात्र त्यांच्या खेळावर खिळून होती. मी त्यांना ओंजळीत घ्यायचा लाख प्रयत्न करायची पण अल्लदपणं सारी ओंजळीतून निसटत. तरी पण त्यांना ओंजळीत धरण्याचा पिछा काही मी सोडायची नाही.

माझी तुमच्यावर कशी अधिकच माया आहे. याचा पुरावा म्हणून डब्यातील बिस्कीटं हातात घेतली. त्याचा बारीक चूरा करून पिलावळीवर सोडला. तर काय कोसळलं बुआ!!!... म्हणून साऱ्यांत पळापळ होऊन दगडाआड लपली. सारं पाहून मला भारीच मौज जाणवली. माझा असा उस्फूर्त कारभार चालायचा. मी परत खाली मान घालून ओहोळातील पिलावळ पाहण्यात रमले. सारं काही आलबेल आहे का पाहायला दगडाआडचा कबिला हळूच आजूबाजू डोकवत होता. त्यानां थिजलेल्या बिस्किट चुऱ्याचा खमंग वासानं जास्त काळ राहू दिलं नाही. कसलंही धोक्याचं नामोनिशान नाही पाहून अल्लदपणं बिस्कीटचूरा खाण्यात सारा कबिला रमला. बघता-बघता चूऱ्याचं कसलंही अस्तित्व तिथं राहीलं नाही. साऱ्यांना मी दिलेला खाऊ आवडला पाहून, माझ्या जिवाला खूपच बरं जाणवलं. इतका खाऊ खाल्ल्यावरही पिलावळ माझ्या ओंजळीतून अल्लद निसटायची. धन्यवाद व्यक्त करायला क्षणभर का होईना पण माझ्या ओंजळीत रमावी ही माझी लाख इच्छा असूनही त्यांनी पूर्ण केली नाही.

शिकवणी आटपल्यावर घरी येऊन पुन्हा ओहोळाकडं गेले. जिथं कबिला रमायला तिथंच परत दिसावा अशी अपेक्षा माझी नव्हतीच. दिसतील तिथंवर चालत जायचे. आताही मस्तपैकी अंगात मी रेनकोट अडकवला होता. पाऊस थांबला तरीही पावसाळी ओला गंध मला वेडावून टाकत होता. मी गवती रंगाची होऊन गवत व्हावंसं वाटत होतं. कुरणाला दोन्ही खांद्यावर आडवी काठी नि घोंगडं पांघरुण गुराखी मस्त फिरतांना दिसलं.

मोठं झाल्यावर मी पण असंच गुराखी होणार. हे पण पक्कं ठरवलेलं. आजूबाजू पाखरं आपला पोटोबा कसा भरेल या कामगिरीवर रमली होती. नजरेला सुखद जाणवेल असा सारा पावसाळी नजारा पाहत-पाहत मी जात होते. चालण्याच्या नादात लक्षात आलं की मी पिलावळीचा शोध घ्यायचं थांबवलं आहे. बरीच पायपीट केल्यावर कबिला नजरेत आला. मला जरी आता त्यांच्यात रमायला फुरसत असली तरी त्यांना नव्हती. ओहोळातनं मोठ्या लगबगीनं सारी ऐकमेकांना ढकलत जात होती. बराच रस्ताभर मी त्यांचा मागोवा घेतला. पण भली चतरी निघाली सारीच्या सारी मला चकवून माझ्या नजरेपार कधी पसार झाली कळलंच नाही. अजून चार महिने पावसाळी आहेतच की म्हणून मनाचे समाधान केले.

महिने उलटून गेले. ओहोळ आटले. मैदान सुके झाले. कालांतरानं परीक्षेनंतर सुट्टी सुरू झाली. आबी तर आपल्या संसारी विश्वात रमलेली. नेहमीप्रमाणं शाळा सुरू झाली. पावसाचे दिवस आले. शाळा पळत गाठण्याच्या नादात कधी ओहोळ वाहू लागले. नि त्यात खेकड्याचा कबिला धावाधाव-लपालपी करू लागला. पण माझं कश्यातही ध्यान कधीच लागलंच नाही. तशी भट्टी परत कधी जमलीच नाही. नि बराच काळ निघून गेला. उरल्या फक्त कच्च्या कैरीसारख्या आंबटगोड आठवणी!!!... एकदम खुदकना हसते नि मनात म्हणते की, -'पिलावळीत रमणारी मी आता गुराखी नाहीय. '!!!!!! हाऽऽऽऽऽहाऽऽऽऽहाऽऽऽऽ.............