चटपटे हरभरे

  • ओले हरभरे अर्धा किलो (सोलाणे असल्यास उत्तम, अन्यथा भाजीवाल्यांकडे मोडाची कडधान्ये बंद पिशवीत मिळतात त्यातले ओले हरभरे)
  • तेल एक डाव
  • मीठ चवीपुरते
  • मिरपूड चवीपुरती
  • लिंबू अर्धे
  • कोथिंबीर एक छोटी जुडी
२० मिनिटे
चार जणांना चवीपुरता

हरभरे धुऊन निथळून घ्यावे.

नॉन-स्टिक पॅनमध्ये तेल तापवावे. धुरावल्यावर मोठ्या ज्योतीवरच हरभरे टाकून चटाचट हालवावे. मीठ घालून सारखे करावे आणि ज्योत बारीक करावी. दुसऱ्या शेगडीवर अर्धी वाटी पाणी गरम करावे.

मिरपूड भुरभुरवावी. गरम पाणी घालून ज्योत मोठी करावी. मिनिटाभरातच पाणी आळेल. मग ज्योत बारीक करून झाकण ठेवावे. दुसऱ्या शेगडीवर अजून अर्धी वाटी पाणी गरम करावे.

पाच मिनिटांनी झाकण उघडून, ज्योत मोठी करून, हरभरे परतावे. मिरपुडीचा दरवळ सुटला नसेल तर अजून थोडी मिरपूड भुरभुरवावी. गरम पाणी घालून ज्योत मोठी करावी. एक मिनिटात ज्योत बारीक करून झाकण ठेवावे.

पाच मिनिटांनी झाकण काढावे व ज्योत मोठी करावी. हरभरे लाह्यांसारखे चटचटू लागतील. ज्योत बारीक करावी आणि दोन मिनिटांनी बंद करावी.

हरभरे थंड झाल्यावर त्यावर लिंबू पिळावे आणि चिरलेली कोथिंबीर मिसळावी.

(१) हा प्रकार भडंगासारखा आहे. एकदा तोंड चाळवले की हात नि दात काम करत राहतात. त्यामुळे अर्धा किलो हरभरे हे चार जणांना 'चवी'पुरते होतात.

(२) यावर कांदा व हिरवी मिरची बारीक कापून घातल्यास थाट वेगळाच होतो.

(३) जर मद्यार्कयुक्त पेयाचे पान चालले असेल तर चार जणांऐवजी एकच व्यक्ती अर्धा किलो हरभरे पार करून "अजून?" अशी आव्हानात्मक आरोळी ठोकण्याची शक्यता दाट आहे. त्यामुळे अजून हरभरे (वा एखादा दणकट सोटा) जवळ असल्याची खात्री करावी.