चाहूल

        चाल : ही वाट दूर जाते


तू मूर्तिमंत प्रतिमा स्वप्नील लोचनांची
रेखाकृती सचेतन स्वर्गीय कुंचल्याची


अंधारल्या मनाला तू भासतेस ज्योती
त्या मंद तेवणाऱ्या परसातल्या दिव्याची


आकार घेत आहे जे भावविश्व माझे
दे पूर्णता तयाला, हो स्वामिनी तयाची


का कालच्या स्मृतीने डोळ्यात लाज दाटे
जगतो पुनः पुन्हा मी, ती रात्र आर्जवांची


धावे खळाळते जळ अभिसारिकेप्रमाणे
सरिता असे मनोमन आसक्त सागराची


तू चाळवू नको रे, निजल्या मनास माझ्या
येते तुझ्या स्वरांनी चाहूल यौवनाची


झालास धीट तू अन् मी मोहरून आले
स्मरते , मिलिंद , मीही बरसात चादंण्यांची