खालील माझी ही कथा पुर्णपणे काल्पनिक असून कशाशीही साम्य जाणवल्यास तो केवळ योगायोग असावा.. पल्लवी
थंडगार वारं जसं अंगाला झोंबायला लागलं तसं विमानातला एसी अर्पिता नं हात वर करून बंद केला. समोरचा टीव्ही शांतपणे चालू करून बघत राहिली. अंगभर शाल लपेटून घेतली तिनं, हो.. पोटातल्या लहान जिवाला जपायचं होतं ना.. खुदकन तिचं तिलाच हसू आलं.. आकाश ही कित्ती जपत असतो रात्रंदिवस.. आत्ता सुद्धा एकटी नकोच जाऊ म्हणत होता पण काय करणार त्याला सुट्टी मिळाली नाही आणि इकडे राधिकाने हट्टच धरला होता तिच्या लग्नाच्या आधी पंधरा दिवस सुद्धा येणार नाहीस का म्हणून.. शिवाय खरच आहे. आई ला मदत केली पाहिजे.ती एकटी तरी काय काय बघेल? शेवटी आकाश ने जपून जा अस चार चार दा सांगत पाठवलं. रवी दादा येणारच आहे न्यायला मुंबईत आणि मग त्याच्याच कार ने पुण्यात जायचय त्यामुळे काही काळजी नाही. पुण्यात सगळे वाट पाहत असतील.
पुण्याच्या आठवणी ने मग तिचं टीव्हीत मन लागेना..
********************
विमान तळावरील सर्व सोपस्कार पुर्ण करून बाहेर यायला तिला अर्धा तास लागला, बाहेर येतानाच रवी दादा तिला दिसला आणि तिची कळी खुलली. रवी दादा तिचा चुलत भाऊ. अर्पिता त्याची लाडकी बहिण.
"काय जाडू दिसतेस ग? आकाश काय म्हणतोय? तो ही आत्ताच आला असता तर छान झालं असतं ना? तुझी तब्येत काय म्हणते आणि? ऑफिस कसे चालू आहे? "
"अरे हो हो किती प्रश्न विचारशील? जरा दमानी घे, आणि काय रे तू सॉलिड बॉडी बिल्डरच झालायस की"
"याऽऽऽ.राईट.. चला गाडीकडे बाईऽऽसाहेबऽऽ"
"ओके..ओके.. अरे .. ती बघ ती मुलगी का बघतेय तुझाकडे.. "
"कुठे? कोणऽऽऽ " रविदादा चटकन मागं बघायला लागला तशी अर्पिता खुदकन हसली
"काय हे नुसतं मुलगी म्हटल्यावर लगेच मागं पहायला लागलास होय रे? अंऽऽ रविदादाऽऽऽ?"
"हम्मं आता कसं अप्पीला भेटल्या सारखं वाटलं बघ. लग्न झालं तरी थोडी सुद्धा कशी सुधारली नाहीस गं? आम्हाला वाटलेलं आकाश मुळे का होईऽऽना, जरा शहाण्यासारखी वागशील"
"वा! मोठ्ठा आलाय आकाशची बाजू घेणारा."
गाडीच्या वेगाबरोबर गप्पाही रंगत होत्या ..
********************
"अप्पू उठ ग. पुणं जवळ आलंय" रविदादा उठवत होता.
"अरे काय गाढ झोप लागली होती मला, पण आता मस्त फ्रेश वाटतय. "
"होऽ आपल्या काल गप्पा रंगल्या आणि मध्येच तुला झोप लागली"
"अरे हे देसायांच घर ना? रीनोव्हेशन केलेलं दिसतय"- अर्पिता
"हो येस. तुला आठवतो त्यांचा जुना वाडा? आपण लगोरी खेळायचो बघ.. "
"अर्थाऽऽऽतच, खुप मजा यायची ना ?" अर्पिता खिडकीतून बाहेर बघत होती..
"राधिकाच्या नवर्याला पाहिलस कारे तू? कसा आहे? "
"चल ना आता घरी. मग पहाशीलच की .. "
"अरे पण तू पाहिलस का नाही? "
"सो हिअर कम्स युवर स्वीट होम"-रविदादा
राधिकाने धावत येउन दार उघडलं...
"ताई आलीये ऽऽऽऽऽऽ... "
सगळ्यानी अर्पिता समोर घोळका केला, आज्जी, आई ला तर तिला कुठे ठेवू असं झालं..बाबाही खुष झाले. लग्नानंतर पहिल्यांदाच ती पुण्यात येत होती..चहा पाणी आटोपल्यावर रविदादा त्याच्या घरी निघून गेला त्याला आवरायचं होतं ऑफिसला जायला. सकाळचे आठ वाजत होते.
********************
"अप्पू आंघोळ करून घेतेयस का ग? पाणी ठेवू का? "- आई
"बस ग जरा माझ्या जवळ.. किती घाई तुला, आत्ताच तर आले ना" -अप्पू लाडात येऊन म्हणाली
"अगं आता तू स्वतच आई होणार आहेस, बाळा.. बरं झालं तू आलीस आता मला खरं हुश झालं बघ.. ̮ लग्न घरातील पहिली पाहुणी तू " -डोक्यावरून हात फिरवत आई म्हणाली.
"छाऽऽऽऽन मला पाहुणी पण करून टाकलेलं दिसतय लगेच"
"काय ग मायलेकी बोलताय? म्हातार्या आज्जीला ही सांगा" -आज्जी ही जवळ येउन बसली
आई आज्जी कडून कोतुक करून घेताना अर्पिता चांगलीच खुश झाली होती.
"अय्या आकाश ला फोन करून सांगते ना मी पोचलीये ते"
"अग अग किती गडबड. थांब तू उठू नकोस, मी करते" -आई.
आज्जीने मग अर्पिता चा ताबा घेतला. "काय गं बाई तरी.. राधिकाने चांगलाच घोळ करून ठेवलाय बघ. "
"म्हणजे? काय बोलतेयस तरी काय तू आजी? " अर्पिता अवाकच झाली.
"नाहीतर काय.. कॉलेज मध्ये होता तिच्या, लहान आहे एक वर्षानी.. सीए करतोय अजून.. दोन वेळा नापास झालाय. दिसायलाही साधारणच आहे, आणि शिवाय... "
"शिवाय काय? "
"इतर जातीतला आहे बघ. काय पाहिलयं त्याच्यात कोण जाणे.. हिनेच त्याला मागणी घातलीय.. आधी तो तिला चक्क नाही म्हणाला अन आता वर्षानंतर त्याचा निर्णय बदलून राजी झालाय म्हणे.. बाई बाई निर्लज्जपणाची हद्द झाली ग अगदी. अग तो कशाला नाही म्हणेल, लाखात एक आहे हो आपली राधिका.. सडपातळ बांधा, लांब सडक केस, गोरीपाऽऽऽन आहे ...अगदी नक्षत्रासारखी दिसते बघ साडी नेसते तेंव्हा... तो तंगवत असला पाहिजे तिला, पण ही काही एकेल तर शपथ.. प्रेम आहे म्हणे.. कसलं प्रेम अन कसलं काय.. तुझ्या बाबाला म्हटलं दे चार थोतरीत ठेवून. अक्कल नाही काडीची अन म्हणे बाबा माझं लगीन करा.. आमच्या वेळी नव्हतं हो असलं काही.. "
"अहो आई.. बास करा जरा. किती चिडाल? तिला जरा विश्रांती घेऊ देत. उद्या बोला उरलेलं.. तसाही तिला जेट लॅग आला असेल होय ना ग आप्पे? " -आई.
दमलेल्या अर्पिताला तावातावाने काही तरी बोलायचं होतं पण डोळ्यावर येणार्या पेंगे मुळे ती कधी झोपली, तिचं तिला ही कळलं नव्हतं..
(क्रमशः)