वेगळी वाट... (शेवट)

त्याच्या समोर आणि हॉटेल मधल्या बाकीच्याची माफक करमणूक नको व्हायला असे वाटून पैसे चुकते करून अर्पिताने राधिकासह तिथून काढता पाय घेतला.. पण राधिकाला दुसरी बाजू ही समजावून सांगायला हवी आहे.. नव्हे त्याची फार गरज आहे हे तिला मनोमन पटलं होतं..

*****
पुढे चालू..
*****
रिक्षात बसल्यावर अर्पिता म्हणाली.
"अगं दुरून डोंगर साजरे.. जवळ गेलं की खाचा खोचा दिसतात त्यातल्या. लग्न होउन मी ऑस्ट्रेलियाला जायला निघाले, तेव्हा पहिलाच विमान प्रवास होता माझा. त्यात आकाश पुढे निघून गेलेला, त्यानंतर माझे विसाचे काम होऊन मला जायला साधारण 
महिना लागला होता. तुम्हाला विमानतळावर अच्छा करून मी खुप धास्तीनेच विमानात बसले, तुला माझा हसरा चेहरा दिसला पण मनातले तुमच्या वियोगाचे दुःख आणि एकटीने प्रथमच इतका लांब प्रवास करायची भीती तुला दिसली नाही, सहसा कधी ट्रीप केली नव्हती लांबची कुठे आणि अचानक विमानात बसले. बाबा साधं मुंबई पर्यंत एकटं जाउ देत नसत तर ऑस्ट्रेलिया लांबच राहिला..
मी ऑस्ट्रेलियात पाऊल टाकलं तेव्हा समोर होता आकाश सोबत गुलाबांचा एक छानसा गुच्छ.. मला ज्याक्षणी आकाश दिसला तो क्षण मी आजपर्यंत विसरणार नाही. ‌सगळे अनोळखी चेहरे ..कोणीही सोबत नाही आणि अधीरतेने ज्याची वाट पाहत होते तो आयुष्यभराचा सोबती समोर दिसल्यावर जे काही वाटलं ते शब्दात वर्णन न करता येण्यासारखं आहे.. आनद, प्रेम, हायसेपणा,  सुरक्षितपणाची झालेली अचानक जाणीव आणि त्याबरोबरच प्रवासाच्या अतीव शीणाची तीव्रता कमी होत असल्याची भावना..
त्याला मारलेली गच्च मिठी अजुनही आमच्या दोघांना स्मरते.. त्या मिठीत जी जादू होते ति काही विलक्षण..
घरात पाऊल ठेवलं आणि पाहिलं की आमच्या कडे काही ही फर्निचर नव्हतं.. आकाश म्हणाला की सगळ्याना सोडून फक्त माझ्या साठी तू इकडे आलीस.. आपल्याला शुन्यापासून सुरूवात करायची आहे गं.. शिदोरी आहे ती फक्त बुद्धी, कष्ट करायची तयारी आणि चांगले संस्कार यांची ..
त्याच्या शब्दानी मी खूप सुखावले.. अजून मला हवं तरी काय होतं?
त्याला म्हणाले माझी तुला भक्कम साथ आहे, काही काळजी करू नकोस, मी निभावेन सगळं..

 मी गेल्यावर हळू हळू आमच्या दोघांच्या आवडीचं एकेक फर्निचर घेत गेलो जसे पैसे साठतील तसं तसं..
आमच्या कडे एकच स्लीपींग बॅग होती आकाशची त्यातच आम्ही काही आठवडे निभवून नेलं, आयुष्यात कधी खाऽली झोपले नव्हते, पाठ दुखायला लागली दोन आठवड्यातच.. मग पहिलं फर्निचर घेतलं ते म्हणजे पलंग..

परदेशात पोचल्यावर नवे घर, नवीन चालीरिती, नवी माणसे. नवा नवरा. नवा संसार असं सर्व काही नवीन होतं..नवा लायसन्स मिळवावा लागला त्यासाठी लेखी परीक्षा देणे, ती पास होणे मग रोडटेस्ट साठी लायसन्स चे धडे घेणे. एक ना अनेक कामे होती.. एक तर स्वयंपाक नीट येत नव्हता आणि त्यात घरी कॉईल ..गॅस नाही.. साध्या पोळ्या नीट जमे पर्यंत महिना गेला, चांगली कणीक कुठे मिळते हे ही शोधावं लागलं, तोवर काही मैत्रिणी मिळाल्या.. मग एकमेकींच्या सल्ल्याने मदतीने अनेक नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या..
एकीकडे जॉब शोधला, पहिलाच इनटरव्यू, अगदी स्कर्ट/ब्लेझर घालणे ही मला नवीनच होतं ग..

कुणाची वाट जास्त रूळली आहे ते मला आता तूच सांग.. तुम्हाला काही सांगायला दाखवायला आई वडील , नातेवाईक असतात इथे, तिथे मला कोण होतं? मला एकटीने सर्व करावं लागलं.. या सर्वात मी आणि आकाश खूप जवळ येत गेलो कारण आपली मणसं अशी दोनच मी आणि तो.. पण त्या सर्वात एक आनंद होत, तो भारतात आपल्या लोकाना कळवावासा वाटायचा म्हणून मग कॅमेरा घेतला..ज्यायोगे  तुम्हाला ही आमच्या जीवनात सहभागी करून घ्यावस वाटत होतं..प्रदर्शनाचा काही विचार नव्हता गं डोक्यात.
आपलं यश,आपली सुख आणि दुःख एकमेकाना वाटणं यात प्रदर्शनाचा विचार नसतो .. असतो तो फक्त आपलेपणाचा..

भारता बद्दल म्हणशील तर ती माझी मायभुमी आहे. तिला मी कशी विसरीन? भारताचा नकाशा जरी कुठे पाहिला तरी मन भरून येतं ..डोळे पाणावतात.. भारताच्या धुळीची लाऽऽज? छे छे, कसं शक्य आहे ते? मुंबईत विमानातून उतरल्यावर पहिले काय केलं असेल तर ती माती मी कापाळाला लावली. अभिमानानं ऊर भरून आला माझा.. परदेशात परकीयांबरोबर काम करत असताना भारताची मान आणि शान कायम उंच राहावी यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्न्शील असतो.
आणि इथे आल्यावर हे बोल तुझ्या तोंडून एकण्यापुर्वी कान किटले का नाहेत माझे? खरच.."

"ताई खरच मी तुला असं बोलायला नको होतं .."
"कुठलीच वाट केवळ वेगळी आहे म्हणून तू निवडू नकोस.. तुझ्या मनाला जी रूचेल तीच वाट तुला यशाकडे नेणारी ठरेल.. वेगळ्या वाटेपेक्षा तूला स्वतःला भावेल ती वाट तू निवड आणि त्यावरून जा..लग्न हा आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा टप्पा असतो तो विचारपुर्वक निर्णय घेऊन पार करायचा असतो.. म्हणून काळजी वाटते. आई बाबानाही त्याच साठी तुझी काळजी वाटते. त्यामुळे त्याना दुखवू नकोस. मी ही आता आई होणार आहे त्यामूळे तुला सांगतेय. तुला सुरज आवडलाय ना? तुझा त्याच्या वर पुर्ण विश्वास आहे नाऽऽ झालं तर मग.. कोण काय म्हणेल याची काळजी नको करू..बिनधास्त लग्न कर ..
मगाशी आपण घेतलेल्या जांभळ्या रंगाच्या शालूत काय सुरेख सजशील म्हणून सांगू? सुरज कडच्याना म्हणावं मोहरी उतरवा हो सुनेवरून.."
"कायत्तरीच काय ग तुझं ताई.. "
राधिका लाजली..

                                                                             ******************

हा हा म्हणता लग्न येऊन ठेपलं, आकाश ही येऊन पोचला, सुरज कडच्याना लग्न अगदी थाटामाटात हवं होतं, मानपान देणीघेणी झाल्यानंतर मुलाकडची जेवणं होउन मगच मुलीकडच्या नि जेवावं वगैरे अशा काही माफक अपेक्षाच होत्या त्यांच्या. हुंडा वगैरे नको पण मुलाला काही द्यायचं तर द्या म्हणून ते ही घेऊन झालं. राधिकाला हे सगळं चालत होतं ..अगदी खालमानेने सलज्ज बसत होती..नट्टापट्टा वगेरे  व्यवस्थेत चालू होतं तिचं, अर्पिता ला काही हे पटलं नाही. आईकडे तिने भुण भुण सुरू केली.
"काय ग आई. हुंडा वगैरे घेऊन शिस्तीत लुटताहेत की बाबाना. राधिका सुरज ना ही योग्य वाटतय का ते? " मानपान देणीघेणींच्या नावावर वधू पक्षाला उणं ठरवण्यात अजिबात कमी पडत नाहीत कुठे "
"अप्पू तू आधी गप्प बस पाहू..काहीच बोलू नकोस या बाबतीत.. कितीही जरी तू समजावून सांगितलस नऽऽऽ तरी अगं राधिका आहे तीऽऽ, एका कानाने एकून दुसर्याने सोडून पण दिलं असेल तिनं.. आम्ही कमी वेळा का समजावून पाहिलय? तू अजिबात डोक्याला ताण करून घेऊ नकोस. आनदी रहायचा प्रयत्न कर. बाळाला जप, तू काय परवा चाल्लीच आहेस परत. "

विमान तळावर आकाश अर्पिताला टाटा करायला सगळे जमले. निरोप समारभच होतो तो ही एक..

                                                                             ******************

महिन्या भरानी आईचा फोन "अप्पू अगं खुश खबर! राधिकाला बाळ होणार आहे. "
"अरे वा काय सांगतेस?  छानच की..  कितवा महिना? "
"अं.. अं‌.. चव था आहे म्हणे "
"म्हणजे ऽऽऽ तुम्हाला आधी काहीच?
"नाही नाऽ ..बाबा आज्जी अस्वस्थ झाले होते, पण आता ठीक आहे. "
"... "
"... "
"तिला सातव्यातच माहेरी घेऊन जा असा तिच्या सासरहून निरोप आलाय"-आई.
"म्हणून लग्नाची घाई चालली होती वाटतं? आणि मग तुम्ही ऑस्ट्रेलियाला येणार होता पुढच्या महिन्यात त्याचं..... "
"बहुधा कॅन्सल करावं लागेल गं. "
"पण आई, मी इथे एकटी... "
"काय करू बाळाऽऽऽ माझा जीव अडकलाय गं दोन्हीकडे..... "
"बरं मी आकाश ला सांगते सासूबाईना विचारायला... "
"सुरज परिक्षेसाठी पुण्यातच आहे पण राधिका कसल्यातरी कार्यक्रमासाठी गावात गेलीये म्हणे, ओटी भरणे वगैरे.. "
"फारच रितीभाती धरून वागतात गं ते लोक.. त्याना सांगा ना की अप्पूचं करून आम्ही राधिकाच्या आठव्या महिन्यापर्यंत परत येऊ आणि मग नेतो राधिकाला म्हणाव, म्हणजे दोघींची  काही काळजी नाही"
"अगं बाबानी तेच सांगितलयं पण पहिल्या वेळी मुलीला
सातव्या महिन्यातच
माहेरी नेतात अशी पद्धत आहे म्हणे आमच्याकडे.. म्हणून हट्टच धरला आहे त्यानी अगदी.. "
"आणि राधिका?? ती तरी काही बोलतेय का? का आता पानात चटणी डावीकडे  आणि भाजी उजवीकडे तेव्हढच शिकत  बसली आहे? "
"तिला ही वाईट वाटतय ..पण काय करणार. सासरच्यांसमोर काही चालत नाहीये तिचऽऽऽ.. आणि आधी त्या दोघानी हे बाळाचं ही कुणाला कळू दिलं नव्हतं त्यामुळे सर्वानी बोटं तोंडात घातली आहेत.."
"ठीक आहे, मी बघते काय करायचं ते.. तुम्ही काळजी घ्या.."

                                                                             ******************

राधिका- सुरज ला मुलगी झाली. स्वरा.. तिचं नाव. ते सर्व उरकून अर्पिताचे आई वडील मग ऑस्ट्रेलिया गेले.
आयुष...   अर्पिता -आकाश ला मुलगा झाला होता. आकाश चे आई वडील ही तिथेच असल्याने घर भरून गेलं.. अर्पिता खुष होती..आयुष चे लाड करता करता आकाश अर्पिताला दिवस पुरेना. अर्पिताने मग सुट्टी वाढवून घेतली होती. सासूसासरे गेल्यावरही आई बाबा असल्याने तिला हायसं वाटलं होतं.

सकाळचा नाश्ता करून आकाश ऑफिसला निघाला.. आयुष कडून त्याला अच्छा करून अर्पिता घरात आली आणि फोन वाजला..
"आईऽऽऽ जरा बघतेस का गं? लाँग डिस्टन्स कॉल वाटतोय" - आयुष ला क्रिब मध्ये ठेवत अर्पिता म्हणाली.
"होऽऽ बघतेऽऽ"

फोन राधिकाचा होता. आई बोलत होती

"अरे वा.. काय सांगतेस? वा.. वा... अहोऽऽ एकलत का?? सुरज सीए पास झाला. "

"काय हे राधिका?  नाही हा असं चालणार नाही आता... हा विचार तु आधी करायला पाहिजे होतास, सारखीच तुझी धरसोड चालू असेल तर ते मला यापुढे मुळीच चालणार नाही आणि आता तुला "स्वरा"चा विचार पहिले करायला हवा. एका लेकीची आई आहेस तू.  उद्या बोलू आपण यावर, आता तू झोप...नाही ऽऽऽ मला यावर काहीच बोलायचं नाहीये,  चल ठेवते.. उद्या बोलू" -आईने फोन ठेवला .

"काय गं वसू? काय एवढं तावातावाने बोलत होतीस? सगळं ओके आहे ना? " - बाबानी आईला विचारलं तसं  अर्पिता ने ही कान टवकारले.

"काहीऽऽनाहीऽऽ तुमच्याच लेकीच्या एकेक करामतीना मी वैतागले आहे. आता काय म्हणे तर सुरज चं सीए झालं आहे तर माझा ही विचार चालू आहे, एंटरन्स द्यायची आणि पुढे सीए करून टाकायचं. काय खाऊ वाटतो का या पोरीला सगळा? करून टाकायचं म्हणे" -आई.
"नाहीतर काय? एकेक खुळं नुसती. त्या पोटच्या पोरीकडे बघ म्हणावं आता थोडे दिवस.. आणि सासरच्याना विचार म्हणावे नाहीतर परत रूसवे नकोत"- बाबा काहीश्या नाराजीने बोलले
"अहोऽऽ सुरजला पटलयं म्हणे, स्वरा ला तिच्या सासूबाई साभाळणार आहेत, सध्या थोडं नाही म्हणाल्या तरी करतील म्हणतेय. आणि आपण भारतात गेलो की आपल्याकडेही पाठवणार आहे म्हणे स्वराला. " -आई.
"छे छे सरळ नाही सांगून टाक, उंच उड्या मारायच्या तर त्या आपापल्या जीवावर मारा म्हणाव. "- बाबा चांगलेच वैतागले होते.
"तेच म्हणते मी. आता अप्पू कशी जॉब सांभाळून सगळीकडेच बघते आहे की.. तिला आपली खरी गरज आहे इथे परदेशात"-आई

अर्पिताने एकलं आणि ती सुखावली."कॉग्रेटस राधिका.. अशीच ठाम राहा आता तू.." हर्षभरित होऊन ती बोलली
"अप्पे, गोष्टी इतक्या सोप्या नसतात.."

आईचं वाक्य मध्येच तोडत अर्पिता म्हणाली "आई! आता आपण राधिकेला साथ द्यायला हवी..स्वतःचा सूर गवसलाय तिला.. तिने तिचा स्वतःचा रंग मिळवलाय.. कधी नव्हे ते तिच्या भल्याचा निर्णय स्वतंत्रपणे तिने घेतला आहे, कोणाचाही विरोध न जुमानता, सर्व बाजूंचा विचार करून निर्णय घेण्याची क्षमता तिच्यात आली आहे.वेगळी वाट वेगळी वाट करता करता तिला आत्ताशी कुठे स्वतःची स्वतंत्र वाट दिसली आहे आणि त्यावर तिला चालायचं आहे. ती शिकेल स्वतः तिच्या पायावर उभी राहिल.. जेव्हा निसरड्या वाटेसाठी तुम्ही तिला काही बोलला नव्हतात, तेव्हा या सावध किबहूना यशाकडे नेणार्या वाटेकडे जर ती जायला निघाली आहे तर आता तुम्ही पाय मागे ओढू नका.. प्लीज तिला नाही म्हणू नका.. "

(समाप्त)