क्षण हा क्षणात आहे, क्षण हा क्षणात नाही
रेंगाळंत किरणांतुनी, सावल्यांसवे खेळे
गहन सावळे उजळे, उसळे घे हिंदोळे
अचपळ उधळत दरवळ, झुळझुळ नितळ प्रवाही
क्षण हा क्षणात आहे, क्षण हा क्षणात नाही
नवखा नवल निनादी, नवथर झरझर जुनवे
ढाळी आसवे केंव्हा, रुसवे हसवे फसवे
विमुक्त हा स्वच्छंदी, बांधून दिशाही दाही
क्षण हा क्षणात आहे, क्षण हा क्षणात नाही
पुरता पुरे न केंव्हा, सरता सरे न केंव्हा
झुरतो हरतो विरतो अन उरतो मनात तेंव्हा
मुक्या बोलक्या स्वप्नी, रंगत रंगत (रंग तरंगत) राही
क्षण हा क्षणात आहे, क्षण हा क्षणात नाही
क्षण उदासी धुमारे, आल्हाद अन शहारे
डोलडोलवे चकवे, क्षण वादळे किनारे
हाच पालवी झडही, हिरवाई-लाही लाही
क्षण हा क्षणात आहे, क्षण हा क्षणात नाही