चालली नार गोमटी...!

चालली नार गोमटी, अंगचोरटी दृष्टि टाकून,

मारले ठार हो तिने पुन्हा हासून ॥

भरजरी शालु नेसली, अंगि ल्यायली चांदणे खूप,

अन चंद्र कपाळी, खुलून दिसले रूप ॥

वादळी श्वास हो तिचे, जगाला रुचे अशी ही चाल

अन तिच्या उरीचा, धुंद वेगळा ताल ॥

चालली नार ही कुठे? रूप गोमटे, एकटी जाई

अन सोबत जाण्या, उडे आमची घाई ॥

ती म्हणे, "छान जाहले, तुम्ही हो भले सोबती झाला,

एकटी कशी मी गेले असते बाला? "

हासली, जरा लाजली, पुढे थांबली, वळुनिया  मागे

"गुंतले" म्हणाली, "ह्या शालूचे धागे" ॥

ओंजळीमधें चांदणे  ओतले तिने माझिया थोडे ,

'ही खूण' म्हणाली, असे घातले कोडे ॥

ती नार : मत्त यामिनी, राहिली मनी भेट नक्षत्री

मी सोबत करतो तिची, एकला यात्री ॥