मारवा !

          त्या दिवशी संध्याकाळी अचानकच आभाळ दाटलं होतं. नेहमीपेक्षा लवकर, आणि जरा जास्त अंधारून आलं होतं. आणि अशात सीडीवर वसंतरावांचा 'मारवा' लागला होता. 'मदमाती चली चमकत दामनीसी.... ' असे काही तरी बोल असावेत विलंबित ख्यालाचे.वसंतराव मारव्याच एक एक पदर उलगडत होते, आणि इकडे मनःपटलावर वेगवेगळ्या प्रतिमा तयार होत होत्या आणि विरून जात होत्या. कुणी जुना मित्र भेटावा, आणि कुणालाही न सांगता येण्याजोगं काहीतरी गहिरं असं त्यानं आपल्यासमोर मोकळं करावं तसंच झालं होतं अगदी. 

          मन हळवं झालं होतं. असं म्हणतात की आभाळ दाटलं असताना तुमच्या मनात जी भावना असते ती दुपटीने वाढते, म्हणजे तुम्ही आनंदी असाल तर तो आनंद अजून उत्कट होतो. त्यामुळे की काय कोण जाणे, पण मी जरा जास्तच हळवा झालो, पापण्या ओलावायच्या बाकी होत्या, पण हृदय कधीचं भरून गेलेलं होतं. मारव्याची हुरहूर पण अशी होती, की तानेला दाद जात होती तीसुद्धा मनात खोलवर काहीतरी रुतल्यासारखी 'आह' अशीच ! बाहेर विजा आणि आत वसंतरावांच्या ताना एकीवर एक अशा कडाडत होत्या. मनात वादळच उठलं होतं. मारव्यानं कसल्याशा अपूर्णत्वाची जाणीव करून दिली होती. एरवी ते जाणवत नसल्यानंच पूर्णत्वाच्या भ्रमात आपण जगतो असं वाटलं. मनः पटलावर येण्याऱ्या प्रतिमा काहीशा मूर्त-स्वरूप घेऊ लागल्या होत्या. त्यात तिन्हीसांजेला सौधावर आपल्या प्रियाची वाट बघणारी विरहिणी होती.कृष्णाच्या विरहाने वेडी-पिशी झालेली गौळण होती. ती विरहिणी किंवा गौळण म्हणजे जिवंत हुरहूरच असते जणु. कुठेतरी त्यांच्या मनातलं ते खोल दडून बसलेलं, गहिरं, अनाम, सनातन दुःख कळल्याचं जाणवत होतं; नव्हे मीच ते सोसतोय असाही भास झाला क्षणभर. दुरून कुठूनतरी, अंधारात वाट चुकलेल्या कोकराचं केविलवाणं ओरडणं ऐकू येत होतं.त्या प्रतिमांमध्ये अगदी क्षणभरच, पण मला नोकरीच्या निमित्ताने घरच्यांपासून दूर आलेल्या माझाही चेहरा दिसला... पाऊस सुरू झाला होता. मन अजूनच हळवं झालं ...

आत तीनतालाची, अन् बाहेर पावसाची लय वाढत होती. वसंतरावांच्या ताना अजूनच आक्रामक होत होत्या.विरहिणीचे अस्पष्टसे हुंदके ऐकू आल्याचा भास झाला. मग जाणवलं, की आपलीच पापणी ओलावली आहे. एक क्षण वाटलं आत जाऊन सीडी थांबवावी. पण काही वेळातच तिहाईवर येऊन वसंतराव थांबले आणि मारवा संपला ... सीडीतला.... 

कानात मात्र मारव्याचे सूर अजूनही घुमतच होते, पाऊस पडतच होता...