(अज्ञेय)

आमचे प्रेरणास्रोत : कोहम् यांची गझल अज्ञेय

कविवर्यांचा वाटेवरला वृश्चिक आहे
म्हणून माझा जालावर बदलौकिक आहे

भक्ष्यासाठी वणवण करतो जालावरती
इलाज नाही, विडंबनाचे आह्निक आहे

तिला भेटण्या असेन गेलो अनेकदा मी
अंगाला ती कुठे लावते, नॉन्स्टिक आहे

मिठी सोडता घोरत पडतो खुशाल मेला
नवरोबांची ओळख ही सार्वत्रिक आहे

हात तिने हातात दिल्यावर नकोस थांबू
वाटायाचे तिला किती हा अरसिक आहे

कसल्या गप्पा लग्नाच्या तो कवी मारतो
करार हल्ली सौख्याचा नैमित्तिक आहे

नाही कौतुक, नाहित वाचक, 'अर्थ'ही नाही
जरी खोडसाळाची रचना मार्मिक आहे