स्वप्नील - भाग १

स्वप्नील हे नाव ऐकल्यावर कोणालाही एका सुसंकृत मृदू आणि सरळ मुलाची कल्पना डोळ्यासमोर येईल पण त्याच्या आगळ्या वेगळ्या जगाची आणि संघर्षाची कथा खूप वेगळी आहे त्याला सामान्य जीवनात परत आणण्यात माझी पण कसोटी लागली होती.

स्वप्नीलची व माझी ओळख प्रथम मी शिक्षण पूर्णं करून नोकरीच्या खटपटीत असताना झाली, त्यावेळी त्याने नुकतीच इंजिनीअरिंगची सुरुवात केली होती. सहसा दोन मराठी मुलं एकत्र आली की लगेच एकमेकांचे चांगले दोस्त होत नाहीत पण मी स्वप्नीलचा रूम पार्टनर असल्याने त्याच्याशी कधी न कधी संबंध येणारच होता. त्याआधी त्याने स्वतःहून खूप आवर्जून माझी ओळख काढली मी एका पीडित मराठी मुलाप्रमाणे ज्याला जगाशी नेहमी लढायचे आहे अन् ज्याला सतत वाटत असत की आपल्यावर अन्याय झाला आहे अशी एक कल्पना मराठी मुलात असते त्याप्रमाणे त्याला धुडकावायला चालू केले.
तरी देखील त्याने माझ्याशी ओळख वाढवणे चालूच ठेवले माझ्या रागाचा चिडचिडेपणाचा त्याच्यावर जास्त परिणाम होत नसे. तो एकीकडे खूप असुरक्षित वाटायचा तर दुसरीकडे त्याचा जगाकडे आजुबाजुच्या वातावरणाकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन वेगळा होता. कुणालाही मदत करणे हा त्याचा स्थायीभाव होता. कुणाचा जेवणाचा डबा आणून दे, आमच्या घरमालकीण काकूंचे रेशन आणून दे, कुणाचे बैंकेचे काम अथवा निरोप पोहचवणे कुणा रूम पार्टनरचे नातेवाईक आले तर त्यांची विचारपूस करणे त्यांना बसवून त्या रूम पार्टनरला बोलावून आणणे अशी असंख्य कामे तो करायचा.

एक दिवस मी नोकरीच्या शोधात फिरून घरी आलो तर तो एकटाच खोलीचे दार लावून रडत बसला होता, त्यावेळी मात्र मी आपला आखडूपणा बाजूला ठेवून त्याला जरा हटकून विचारले "काय रे स्वप्नील काय झाले"
तो काही बोलायला तयार होईना खूप रागावून विचारल्यावर तो जास्त रडायला लागला मी मग थोडं हळू विचारले "अरे काय झालं तुला कोणी मारलं का? नाही, मग कुणी काही बोलल का? नाही मग परीक्षेत नापास झालास का? नाही, त्याने शेवट पर्यंत काही सांगितले नाही मग मीच म्हणालो असूदे सांगू नको जेवून घे उद्या बघू काय करायचे ते. दुसऱ्या दिवशी मी सगळ्यांना विचारले काय झालं त्याला कुणी मारलं का वगैरे पण सतत आपल्या विश्वात असलेल्या त्या मुलांना त्याकडे लक्ष द्यायला वेळच नव्हता. शेवटी समोरच्या छोट्या मकरंदने सांगितले "दादा खालची मुलं त्याला बायल्या, छक्का म्हणून चिडवतात".

आम्ही रहायचो त्याखाली चष्म्याचे दुकान होते तिथे काम करणारी मुले त्याला चिडवायची मी थोडा विचार केला हा खरोखरच तसा आहे का , वरवरून बघताना तसं लगेच कळून यायच नाही पण नीट लक्ष दिल्यावर कळलं की त्याच्या वागण्या बोलण्यात थोडा भास व्ह्यायचा. मी एक दोनदा त्याच्याकडे विषय काढायचा प्रयत्न केला पण त्याला त्याचे खूप दडपण यायचे तो सारखा रडायला लागायचा मग मी आपल्यापरीने त्याला ह्यातून बाहेर काढायचे ठरवले मला समजत नव्हते ह्याला कशी मदत करावी पण त्याला त्यातून बाहेर काढावे असे मनापासून वाटत होते. सर्वात प्रथम त्याला विश्वासात घेणे खूप जरुरीचे होते म्हणून मी त्याच्याशी दुसऱ्या विषयावर खूप बोलायचो, त्याचे घरचे वातावरण कसे आहे घरी कोण कोण आहेत कुठे शिकला वगैरे तेव्हा कळले त्याच्या वडिलांचा स्वभाव प्रचंड तापट होता आई व एक बहीण वडिलांच्या स्वभावामुळे घाबरून असायच्या. वडिलांच्या मुलाकडून खूप अपेक्षा होत्या. स्वप्निलच्या समस्येला तर ते समस्या मानायलाच तयार नव्हते, कधीही तो विषय निघाला की ते त्याला प्रचंड रागावायचे व मारायचे त्याने त्याची कुचंबणा व्हायची पुढे पुढे तर त्याची काळजी करणेच घरच्यांनी सोडून दिले. आई व बहीण पण त्याचा तिटकारा करू लागले कारण नातेवाईकांच्यात चर्चा व्हायला लागली होती लहानपणा पासून आई व बहिणी बरोबर राहिल्यामुळे व वडिलांच्या तापट स्वभावामुळे त्याचे वागणे थोडे बायकी झाले होते त्याचा कल नेहमी फेमीनाइन गोष्टींकडे असायचा. समाजाने पण त्याची थट्टा उडवल्याने त्याच्या समस्येने गंभीर रुप धारण केले होते. त्याचे मनोधैर्य हळू हळू खचत होते आणि मुख्य म्हणजे घरच्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे तो खूप निराश झाला होता आता तर त्याने कॉलेजला जाणे जवळ जवळ सोडूनच दिले होते तो एकटाच बाल्कनीत बसून तो दिवस काढायचा माझे शोधकार्य चालू होते त्यामुळे चिडचिडा झालो होतो एकदा तो असाच सारखे प्रश्न विचारायला लागल्यामुळे मी त्याच्यावर खूप चिडलो पण नंतर मला खूप वाईट वाटले , वाटले आपण जर त्याच्या कडे दुर्लक्ष केले तर तो आणखी खचेल पण माझ्या परिस्थितीमुळे व त्याच्या अवघड स्थितीत मार्ग काढणे खूप कठिण होते.

त्यावेळी दरमियां नावाचा एक चित्रपट आला होता त्यात एका तृतीयपंथी माणसाची कथा होती खालची मुले स्वप्नीलला दरमियां म्हणून चिडवायला लागली. त्याने तो चित्रपट आवर्जून पाहिला तो चित्रपट बघून त्या समाजाबद्दलची सहानुभुती वाढली होती समाज घरची माणसे ह्यांनी नाकारल्यामुळे तो त्या समाजाकडे नकळत ढकलला गेला होता. इथून त्याचा चुकीच्या दिशेने प्रवास सुरू झाला त्याच्यामते तो योग्य करत होता तो सगळ्यांना दोष द्यायला लागला होता त्याला वाटायला लागले होते आपण वेगळे आहोत आपला समाज, माणसं वेगळी आहेत पण मला त्याला त्या वाटेवर जाण्यापासून थांबवायचे होते त्याला मी आत्मचरीत्र वाचायला द्यायचो रोज त्याच्याशी चांगलं बोलून तो सामान्य मुलासारखा आहे हे पटवून द्यायचो त्यामुळे त्याच दु:ख थोडं हलकं व्हायच. त्याला माझ्याशी बोलायला आवडायच.

मला कशीबशी एक नोकरी लागली पण त्यामुळे माझा त्याच्याबरोबरचा वेळ कमी झाला. माझ्याकडे थोडेफार पैसे आल्यामुळे त्याची थोडी मदत करू लागलो त्याला घरून थोडे पैसे मिळायचे पण घरचे लोक पैसे देऊन आपली जबाबदारी टाळायचे. एकदा तो बस पकडताना पडला त्याच्या डोक्याला मार लागला त्यावेळी मी गावी गेलो होतो त्याने घरी खूप फोन केले पण घरून कोणीच आले नाही त्याने स्वतःच डॉक्टरकडे जाऊन ट्रीटमेंट घेतली तो त्यातून बरा झाला पण त्याच्या मनावर घरच्यांनी दुर्लक्ष केल्याचा खूप आघात झाला तो मला म्हणाला माझ घर मला तुटलं आता मी त्यांच्या कडून काहीही अपेक्षा ठेवणार नाही.

एक दिवस मी कामावरून घरी आलो तर दोन तीन मुले घाईघाईने बाहेर निघून गेली स्वप्नील आत बसला होता मी विचारले स्वप्नील ती मुले अशी का पळून गेली तो म्हणाला माहीत नाही मी नाही ओळखत अजून खोदून विचारल्यावर तो परत टाळाटाळ करू लागला शेवटी मी त्याला मदत करणे सोडून देईन म्हणाल्यावर त्याने सांगितले. तो म्हणाला ती माझ्यासारखीच पीडित आहेत आमच्या समाजातील मुले आहेत ती मला मदत करतात आमचे ग्रुप असतात आम्ही चोरून भेटतो. आता मला
ह्या सगळ्या प्रकाराचे गांभीर्य समजले शेवटी मी खूप प्रयत्न करून देखील तो ह्या सगळ्या प्रकाराला बळी पडला होता मनात खूप स्वप्न घेऊन निरागसतेने आपल्या कॉलेज जीवनाची सुरुवात करणारा एक मुलगा दबावाला बळी पडला होता. मला आपल्या समाजाची चीड आली किळस आली आपलाच समाज असे नवीन समाज निर्माण करतो. समाजात तृतीयपंथी लोकांची काय अवस्था होत असेल तुम्ही त्याच्याशी जवळीक साधू नका पण कोणाला त्याच्यात ढकलू तर नका.

मी हरलो होतो पण मी त्याला झिडकारलं नाही त्याला विचारलं तू कोणत्या व्यसनात तर नाही ना पडलास तो म्हणाला नाही जेव्हा मी त्या मुलांबरोबर असतो तेव्हा खूप सुरक्षित वाटते ती मूल माझी काळजी घेतात आमच्यात पण मुलगा मुलगी अश्या जोड्या असतात मी खोलात जायचे टाळले. पुढे तो खूप बदलत गेला माझ्याशी
बोलणे टाळायचा रात्री अपरात्री यायचा मी त्याला विचारायचो जेवलास का नाही नसेल तर रात्री एखाद्या गाडीवर भुर्जी पाव खायला घालायचो.
मला त्याची व आपल्या समाजाची नाळ तोडायची नव्हती तो पहिल्या वर्षी खूप विषयात नापास झाला मला कळून चुकले त्याचे इंजिनीअरिंग तिथेच संपले.

क्रमशः