सॅन्डविच

सॅन्डविच
"काका, पुण्याहून येताना कॅम्पातून चीझ घेऊन येशील ना ? नक्की न विसरता... " अशी आठवण श्रेयाने आपल्या काकाला फोन करून, एसएमएस आणि ईमेल जे जे शक्य होईल त्याने  दिवसातून किमान चोवीस वेळा करून दिली होती.
काका सर्जन होता, ऒपरेशन्स, ओपिडी, हॉस्पिटल यात बिझी होता. दर वर्षाआड आली तरी केवळ तीन आठवडे पुतणी आपल्या घरी असते म्हणून श्रेयाचे जास्तच कौतुक होते.  त्या ती होती चुणचुणीत. ग्लोबलायझेशनच्या जमान्यात वावरणारी ही मुले भराभर बटणे दाबण्यात पटाईत असतात; वस्तूंची आणि माणसांचीही! पण का कुणास ठाऊक मृणालला नेमके चुकीचे बटणं दाबले जाते आहे आणि धूर निघणार याची  जाणीव झाली होती म्हणूनच तिने मध्ये पडायचे ठरवले.

"कशासाठी हट्ट सुरू आहे? उगीच काकाला त्रास देई नकोस.  चार दिवस चीझ, ब्रेड अस काही खाल्लं नाही तर काय जीव जाणार आहे का तुझा? आणि याच ब्रॅन्डच हव - तेच चीझ हव हे कसले नखरे? इथे चिंचवडला आहे प्रत्येक दुकानाची ब्रॅन्च तिथून घेऊन ये. "
"पण त्या दुकानाची नाही !"
"काकाला काय फक्त तेवढेच काम नाहीये."
"का? ड्रायव्हरला सांगेन दुकानातून आणायला असेच म्हणाला आहे तो. म्हणून तर मी सांगितले  त्याला. आई याला नखरे म्हणत नाहीत 'परफेक्शन' म्हणतात. चांगल्या क्वालिटींचा ब्रेड आणि चीझ नसेल तर सॅन्डविचेस कशी पर्फेक्ट होतील?"
"अग काकू, बाबा आणेल ना चीझ , सारखा काय बिझी बिझी नसतो तो" इशानने तिच्या पुतण्याने ,श्रेयाची बाजू घेत उत्तर दिले.
"बघ, मी तेच तर सांगत होते आईला की मला काकाच म्हणाला स्वतः;हून. "
भावंडांनी संगतमत करून प्लॅन केला होता तर. बघू संध्याकाळी दीर येईल तेव्हा काय ते . तोवर मृणालने विषय बंद करायचा ठरवून टाकले. टीव्हीवर मोठी दोघे आणि पोर्टेबल डीव्हीडी प्लेयरवर धाकटी दोघे भावंडे कार्टून लावून बसली होती. किमान पंधरा मिनटे तरी न भांडता जातील असे मानायला हरकत नव्हती.

"लागले वाटत पुन्हा टीव्हीचे डबडे"! लाईट नाहीत असे म्हणावे तर जनरेटर आहे कळते त्यांना. सदैव मनाप्रमाणे करून घेतील. आमचा विचार कोण करणार?काय मुले आहेत ही.. "
आतल्या खोलीतून आजेसासूबाईंनी काढलेले उद्गार मुलांना ऐकू आले नाहीत.  नाही ते बरेच झाले. मुलांची उलट उत्तरे, आणि नंतर "काय लाडावून ठेवले आहे नुसते .. आमच्या वेळी असे नव्हते "हा तिच्या आजेसासूबाईंचा जप सुरूच झालाच समजा.

" आजी चहा घेताय ना " सारीकाने किचनमधून मोठ्याने विचारले.
"अग मी काय म्हणते आहे.. "
"आजी,  या दिवाळी अंकातली  'शेजार' नावाची कथा वाचली का?पुण्याला आपल्या शेजारी त्या करंबळेकर आहेत ना तसेच आहे एक पात्र यात ." गेले बारा वर्षे मृणाल अमेरिकेत होती, पण पुण्यातले शेजारी म्हणजे कायमच तिचे शेजारी .
 मृणालच्या हातातला चहाचा कप आणि तिच्या संभाषणातलं स्वतः:चा उल्लेख ऐकून आजी पुढे सरसावल्या. त्यांचा तेव्हाचा  उत्साह पाहून ’दमले गं बाई’ म्हणत आडव्या झालेल्या आजी, एकदम उभ्या राहून तासभर बोलत्या होतील असे तिला वाटले होते. मृणालच्या मनात त्यांच्या पोटात चहाच्या दोन घोटातून किती साखर गेली असावी हाही विचार आला होता.

"अगो बाई, बघू, हा कुठला अंक? प्रतिभाने नेला असेल कॉलेजात म्हणून मला दिसला नाही. तुला बरे दिसला आता."
काही मिनिटे आजेसासूबाई प्रतिभेचा अंक रंगवणार होत्या हे दिसतच होते.  प्रतिभा म्हणजेच तिच्या सासूबाई . त्या कॉलेजातून यायला तासभर तरी अवकाश होता. त्याआधी अंक संपला तर बरे ..अन्यथा सासूबाईंच्या कॉफीची चव जाणार यात शंकाच नव्हती.  तिथे थांबावे की सटकावे असा विचार करत मृणाल थोडावेळ उगीचच रेंगाळली.  एखादी गोष्ट मग ती कितीही शुल्लक असो -एक रुपयाचे नाणे, दहा वर्षांपूर्वीचा फोटो, पोतेरे झालेली जुनी साडी, चेन तुटलेली पर्स , काहीही... एकदा ताबा मिळाला की आजी ते सोडत नसत हे लहान मुलांनाही कळले होते. काही दिवसांनी पुराणवस्तू संग्रहालय होईल त्यांच्या अख्ख्या फ्लॅटचे.  पण त्याचा उल्लेख करणे म्हणजे स्वतः:वर संकट ओढवून घेणे हे दोन्ही नातसुना चांगल्या ओळखून होत्या.  आजेसासूबाई आणि त्यांची मुलगी  प्रतिभा म्हणजेच कॉलेजात शिकवणाऱ्या मृणाल -सारिकाच्या सासूबाई -  या दोघीतला वाद अधून मधून रंगत असे पण या दोघींपैकी एकीचीही बाजू न घेता विषयांतर करायचे अथवा ’नो कॊमेंट’ हा पर्याय स्वीकारायचे हे मृणालला उशीरा का होईना अखेर समजले होते. सारीकाला तर नेह्मीच दोघींबरोबर राहायचे असल्याने तिने हुशारीने आणि कौशल्याने दोन्ही आघाड्या सर केल्या होत्या. 

आजींच्या हातात अंक आणि मुलांच्या हातात रिमोट सोपवून मृणालने आपला चहाचा कप उचलून घेतला. सारीकाने , तिच्या जावेने मृणालला बाहेरच्या खोलीत बसू अशी नजरेनेच खूण केली होती.
"कसा झाला  हॉस्पिटलचा राऊंड?"
हॉस्पिटलामध्ये  काही विशेष असेल तर सारिका स्वतः:हूनच सांगायची.  तरी पण तिला बोलते करायला हा एक प्रश्न पुरेसा असे . चहासंपेपर्यंत मग ओपिडी पासून पॅथोलॉजी लॅब, आयसीयू ते थेट हॉस्पिटलामध्ये काम करणाऱ्या मावशांची प्रकरणे इथपर्यंत दोघींच्या गप्पा रंगल्या होत्या. दुपारी शांतता अशी नसतेच. शेजारच्या वाड्यात नवराबायकोचे भांडण सुरू होते .  त्याच्या गप्पा चालू होत्या त्यादरम्यानच हॉस्पिटलमधून तीनदा फोन आला होता. त्यानंतर दोन रॊंग नंबर होते.  किसनने बाजारहाट केला होता. पार्वतीबाईची भांडी झाली होती, आशाबाईंनी गच्चीवर कपडे वाळत घातले होते.  सगळे कसे चाकोरीतले.. घड्याळाच्या काट्याप्रमाणे चालू होते.

"पुण्याहून काय आणणार आहेत डॉक्टर श्रेयाकरता?" सारिकाच्या चेहऱ्यावर आपला नवरा सांगितलेली वस्तू नक्की विसरणार याची खात्री दिसत होती.
"काही नाही. ही श्रेया उगीच मागे लागली आहे, चीझ हव म्हणून. खाण्याचे काय कमी प्रकार होत आहेत का ? सकाळ संध्याकाळ दोघी स्वयंपाकाला आहेत ,   नचिकेतला लाडू , मला वड्या आवडतात म्हणून ऒर्डर देऊन आईंनी ते पण करून घेतले आहे.  तरी हिच नेहमी तिसरंच. वरणभात भाजीपोळी खायची म्हणजे शिक्षा दिल्यासारखा चेहरा करून बसायचं. काहीही तळलेलं, चीझ घातलेले,किंवा गोड पदार्थ, चॉकलेट , आयस्र्किम की येऊ दे समोर मग चेहरा पाहा कसा खुलतो. "
" असच असत, इशान पण हट्ट करतो. सगळीकडे तेच झालं आहे. दोन जेवणाच्या मध्ये काय खायचं ते खाऊ देत जा तिला. "

"परवा पावभाजी झालीच ना काकूंकडे , आता कशाला सॅडविच खायचं आहे माहिती नाही. पोळी, पराठा सोडून ब्रेड खायचा नुसता..."
"जाऊ दे गं. तू खूप विचार करतेस. सोडून देत जा कधी कधी. त्याला चहा नको आहे का?" विषय बदलत सारीकाने दिराची चौकशी केली.
"छे, साखरझोप चालू आहे त्याची"
"मग काय हव आहे त्याला, बघ तर खरं तू वर जाऊन" सारीकाने तिला चिडवायची संधी सोडली नव्हती.
नचिकेतचा -मृणालच्या नवऱ्याचा जेट लॅग अजून गेला नव्हता , आणि सर्व आवाजात त्याने मस्त ताणून दिली होती.
"सारिका, तुला बरं जमत शांत राहणं आणि स्वतः:ला प्रत्येकानुसार मोल्ड करणं"
"अग, मोल्ड होतो अस फक्त दाखवायच, करायचं आपलंच , पण लगेच आणि त्रागा करत नाही, सावकाश आणि गोड बोलून"
"मला असे वागता येईल तर शपथ. जमतंय अस वाटत आणि थोडा काळ शांततेचा जातो. पण मग पारा चढलाच म्हणून समज.  आता हा त्याचा जेटलॅग कसा जाईल? प्रयत्नच केला नाही तर.. " तिचा स्वर बदलला होता.
 रात्री दोघे भाऊ कुणाकडे तरी भेटायला म्हणून जाणार, गप्पा करत बसणार, हे ठरलेले. मी मात्र मुलांच्या जेटलॅगसाठी  पहाटे उठायचे. हा मात्र केव्हाही ताणून देतो. सकाळी लवकर शाळेत जायचं म्हणून इशान लवकर झोपतो , त्याच्या बरोबर ही मुले आणि मीही झोपते . बघितलेस ना तू?
"एवढा कशाला विचार करतेस?"
"नाही कस ?  भारतात आल्यानंतर नचिकेत  'वेकेशन मोड'  मध्ये असतो. झाडून सगळ्या नातेवाईकांना भेटतो, मित्रांबरोबर पार्ट्या करतो. मुलांची आबाळ नको म्हणून  मी मात्र  बाहेरगावी असलेले आपले नातवाईक फक्त फोनभेटीएवढे ठेवले. किती वेळा मुलांना हवा बदल आणि पाणी बदल?  पूर्वी मी चिडायचे पण आता वाऱ्या वाढत गेल्या तसा तो वादाचा कप्पा बंद केला आहे.  तरी अचानक असा कधी कधी तो कप्पा उघडतोच! "
मृणालचा बदललेला स्वर आणि तिच्या सासूबाई कॉलेजातून घरात यायला एकच गाठ पडली होती.  मृणालच्या चेह-कडे पाहून त्यांना अंदाज आला होता. त्या काही बोलणार त्याआधी मुलांनी त्यांच्या हातातल्या पिशवीचा ताबा घेतला होता. आजी आली हे मुलांना नेमके कळले होते. 
" अरे ,थांबा देतेच आहे मी "..असे म्हणत फ्रेश होऊन त्या किचनमध्ये गेल्या. त्यांनी आणलेला केक खाता खाता इशान आणि श्रेया सगळे मिळून किती ब्रेडचे स्लाइस आहेत, किती सॅन्डविचेच होतील याचा हिशोब करत होते.
"इशान, तुला मॅकडोनाल्ड्स मधले सॅन्डविच बिलकुलच आवडत नाही का रे?"
"ए, त्याला काही चवच नसते , "
"असते की"
"ए त्याला काय चव म्हणतात का?" इशानने तिला वेडावून दाखवले होते.
"इशान, मग तू जात नाहीस का तिथे?"
"  मी तिथे फ्राईज खातो  आणि मला ते टोय देतात ते हवे असते"
"मला इथले मॅक आवडते,आई मला  नेत नाही मॅकडोनाल्ड्स मध्ये. हे असे चिप्स आणि कुरकुरे पण खाऊ देत नाही रोज"
"हे कुरकुरे कोणी आणले?" मुले एवढा वेळ फक्त टीव्ही बघत नव्हती तर.. म्हणूनच कोणी दंगा केला नाही. मृणालच्या कपाळावर आठय़ांची संख्या वाढत होती.
"काकू, माझ्याकडे होता एक पॅक तोच खाल्ला आम्ही , शेअर केला , हो ना श्रेया?"
"इशान, आई रागावेल, तुम्ही फळ का खाल्ली नाहीत. ती द्राक्षे आणि चिकू तसेच आहेत."
"काकू , कधी कधी चालत गं, माझ्या वर्गातली मुले तर रोज मधल्या वेळेला असेच काही तरी खातात. आम्ही खातो ना एरवी सगळे चांगले.."
"इशान ,ही आई असेच करते, हे खाल्ले तर असे होईल ते खाल्ले नाही तर तसे होईल असे सांगत असते. आई,  बघ ,बघ इथे सुद्धा सगळे तसेच मिळते आणि लोक खातात सुद्धा"

"हे काय ?तुम्ही रोज फक्त असेच अबरचबर खाता की काय तुमच्या अमेरिकेत" आजेसासूबाईंनी नेमकी एंट्री घेतली.
"पणजीआजी, आई करते सगळं तिथे  जसे इथे  स्वयंपाकाच्या मावशी करतात तेच.. पण मला नाही आवडत सारखं वरणभात भाजीपोळी किंवा सारखे इंडियन पदार्थ"  श्रेयाने तत्परतेने उत्तर दिले.
 श्रेयाच्या उत्तराकडे पणजीआजीने दुर्लक्ष केले होते.
"मधल्या वेळेला मुलांना शिरा, उपमा , पोहे , साबुदाण्याची खिचडी, चिवडा लाडू असे काही तरी करून दिल की मग खातात ती नीट"
"पणजीआजी, कालच मी बोलले की या सगळ्या गोष्टींचा मला कंटाळा आला आहे, बोअर झाले आहे मी"
" मग काय पाहिजे तुला? तुलाही समोसे, बटाटेवडे पाहिजेत का तुझ्या आजीसारखे?ती लहान असताना अशीच किटकिट करायची खाण्यावरून.

विषय भारतीय असो , अमेरिकन असो, माणसाचा असो की कुत्र्यामांजराचा , आवडता असो की नावडता, त्यातले काही कळत असो किंवा नाही फक्त कोणताही विषय असो तो आपल्याला हवा तसा आपल्याकडेच वळवता आला पाहिजे, फोकस सदैव आपल्याकडेच असला पाहिजे ही एक कला पणजीआजींना अवगत होती. वयोमानानुसार हातात काठी आली होती, त्यांना थकवा जाणवायचा, त्या त्याच त्याच गोष्टी पुन्हापुन्हा सांगायच्या हे सोडले तर पणजीआजींची तब्येत चांगली होती. जगण्याचा उत्साह होता, खाद्यपदार्थ , सणवार, दागिने, नातेवाईक, टीव्ही मालिका, नाटक चित्रपट सगळ्याची पणजीआजींची माहिती अगदी अप टू डेट होती.
बेल वाजल्याचे निमित्त झाले आणि त्यामुळे सासूबाई बाहेरच्या खोलीत गेल्या.  बहुधा रात्री पणजीबाई झोपल्या की मगच सासूबाई स्वयंपाकघरात येतील असे मृणालला वाटले.

"श्रेया, हे असच सॅण्डविच रोज खायचं का गं?"
डॉक्टर होऊन पुढे अमेरिकेत येणाच्या इशानच्या स्वप्नात हे सॅण्डविच तेवढ सलत होत. पिझ्झा, नुडल्स ठीक आहे. पण हे कोरडे, बेचव ब्रेडचे तुकडे गिळणे म्हणजे इशानला कससच झालं..
"तुला चिकन नगेट्स खाता येतील की"
चिकन नगेटसने अवघड प्रश्न सोडवला होता. त्यामुळे श्रेयाला सॅण्डविचसाठी मदत करायला इशानला आगळाच उत्साह आला.

बॅकग्राउंडला आजेसासूबाईनी प्रतिभा पाच वर्षाची असताना ती अळूच्या फदफद्याला कशी चिडवायची, साडेआठाची असताना कोणाकडे बटाट्याची भाजी कशी वाईट्ट होती म्हणून वेडावून दाखवायची , साडे बारा वर्षाची असताना तिच्या वडिलांनी तिला शेवटी कसे एकदा रागावले आणि मग कुठे तिचे नखरे कमी झाले याची कहाणी जमेल तेवढी चविष्ट आणि खमंग करून ऐकवली.  हे सर्व घडून आता खरं चार तप होत आली असावी पण ती घटना जशी काही कालच घडली असावी इतकी ताजी वाटत होती. त्यांनतरच्या आयुष्यात मृणालच्या सासूबाईंनी देशातलेच नाही पण परदेशातले जे काही पदार्थ समोर आले, आवडते , नावडते ते सर्व खाल्ले होते. पण त्याने काही इतिहास बदलता येणार नव्हता हेच खरे!

दरम्यान टॉमॅटो, काकडी, कांदा सगळे कसे चिरायचे ह्याचे श्रेयाने प्रात्यक्षिक दिले. किती मिऱ्याची पूड , किती बटर लावायचे ते दाखवले. जगातले सर्वोत्तम शेफ आपण आणि आपण किती सुग्रण असा भाव तिच्या चेहऱ्यावर विलसत होता.  आपण जणू सॅन्डविच कसे करतात याची शिकवणी देत असून बाजूला उभा असलेला भाऊ, तिथे असलेली  आई, काकू हे सर्वजण त्याप्रमाणे सर्व सॅन्डविचेस करतील याची फक्त पहाणी किंवा खात्री ती करणार होती, तेही बहुधा टीव्ही बघता बघताच....

अमेरिकेत विद्यार्थी असे सॅन्डविच, बरिटो, पिझ्झाच्या दुकानात काम करतात आणि पैसे मिळवतात हे इशानने वाचले होते. न जाणो चुकून गरज पडली तर.. शिकून घेतलेलेच बरे म्हणून तो जास्त लक्ष देऊन काम करत होता.
"नारळ खवून ठेवला आहे ना ? चटणी करायची असेल." आजेसासूबाईंनी १९६८ मध्ये त्या महाबळेश्वरला गेल्या होत्या तेव्हा कसे सॅन्ड्विच खाल्ले तसे कोणी करू शकलेले नाही याची छोटीच पण चमचमीत कहाणी ऐकवली . पाहू तरी जमतंय का तुम्हाला! अशी टिप्पणी ऐकल्यावर श्रेया गप्प कशाची बसते!

"याक , पणजीआजी!  बाबा म्हणतो नारळात कोलेस्टेरॉल असत. मला नाही चटणी आवडत.. माझ्या सॅन्डविचमधे नसते चटणी!"
"चटणी खात नाहीस, मग निदान कोशिंबिरी तरी खातेस की नाही? काकडी, गाजर, कोबी , बीट की त्यापण नाही?"
"मला मुळा नाही आवडत"
"आमची आई म्हणायची मुळा खाल्ला की आपण गोरे होतो. "
"माझी आई म्हणते आपण काही केले तरी अमेरिकनांपेक्षा काळेच राहणार"
तिच्या बोलण्याकडे पणजीबाईंनी एवढेसेही लक्ष दिले नव्हते. त्या काही थांबायला तयार नव्हत्या. त्यांची आई ती किती गोरी होती, कशी मुळ्याची कोशिंबीर करायची, मुलांना कशी द्यायची इत्यादी...दुसरीकडे श्रेया सॅन्डविचवर अडून बसली होती. त्यामधे हा कोशिंबीरीचा अडथळा किरकोळ होता.  बघता बघता तिने सर्वांना कामाला लावले होते.
" मी कोशिंबीरी खाते पण दाण्याच कूट नको त्यात.. " श्रेया सुद्धा गप्प बसणार नव्हती.

दाण्याच्या कुटावरून पणजीआजींना दाणे, तीळ , जवस असे नवे दालनच उघडे झाले. त्यांनी मनसोक्त कुटाकुटी सुरु केली.  लग्नानंतर जावयाला गवारीची भाजी  खूप दाण्याचे कूट घालून केली तरच आवडायची  आणि प्रतिभाला न आवडणारे पदार्थच त्यांना जास्त आवडायचे , प्रतिभाचा मग कसा नाईलाज झाला ते सुद्धा त्यांनी हजाराव्यांदा सांगितले. त्यानंतर पणजीबाईंची गाडी जावई किती चांगला,  माझे नातू कसे बहुगुणी या रस्त्यावर ताशी एकशेवीस किलोमीटर वेगाने धावू लागली. त्या झपाट्यातच केव्हातरी ब्रेडचे दोन पुडे लहानग्या दोघांनी पळवले. . दुसऱ्या खोलीत त्यावर उड्या मारून त्यांनी " हे काय आहे? 'आपण यांना ओळखले का' किंवा 'कशापासून ब्रेड करतात'  हे सर्व प्रश्न सोडवता येणार नाहीत अशी त्याची अवस्था केली होती.  सुदैवाने आपल्या नातवंडांना ओळखून असल्याने प्रतिभाआजीने ब्रेड जास्तच आणला होता.

सगळी तयारी जय्यत होती. स्वयंपाकघरातून खमंग वास दरवळत होता.
"आज फक्त काय सॅन्डविचेस खायची की काय जेवण म्हणून? "
नचिकेतने डब्यातून सढळ हाताने पुन्हा एकदा करंजी आणि चिवडा घेतांना विचारले.  त्याचा अर्ध्या तासातच दुसरा चहासुद्धा झाला होताच.
"कुकर झालेला दिसतोय. काही नाही तर खा तू आमटी भात आपला" आपल्या अमेरिकेतून आलेल्या नातवाला आज फक्त आमटी भात मिळणार याचे दु:ख वाटूनच की काय मृणालच्या आजेसासूबाईंचा चेहरा थोडा सुकलेला दिसत होता.
"आजी , तुझ्यासारखी आमटी मी आख्ख्या अमेरिकेत खाल्ली नाही" नचिकेतला आमटीतला 'आ' सुद्धा आपली आजी किती चविष्ट आमटी करते याकरता पुरेसा होता. पणजीबाई स्वयंपाकघरात काही करायला म्हणून गेल्या त्यालासुद्धा आता दोन तप उलटली असावीत. पण त्या आमटीची चव मात्र नचिकेतच्या जिभेवर कायम होती.  एकेकाची मेमरी असते म्हणा ...
..
"अमेरिकेचे अध्यक्ष जेवायला आले तर आज्जी तुझ्या हातची आमटी खाऊन काय खूष होतील असेही तॉ म्हणेल" मृणालने सारिकाकडे पाहून हळू आवाजात म्हटले.
आजी आणि नातवाच आमटीपुराण चालू असेपर्यंत निश्चिंती होती. बराक ओबामा बटर चिकन, कबाब, पनीर आणि पकोडे असे सर्व पदार्थ दूर सारून आमटी भात खातो आहे म्हणजे भुरकतो आहे हे दृश्य डॉळ्यासमोर आल्याने मृणालला हसूच आले. आजीच्या या आमटीपाई तिचे सुरळीच्या वड्या, उकडीचे मोदक, सगळे नॉर्थ आणि साऊथ इंडियन पदार्थ रूचकर झाले तरी त्यांची किंमत शून्य असते हे तिला माहिती होते.  तिचेच काय ह्या आमटीमुळे नचिकेतला माहिती असणाऱ्या जगभरातील तमाम गृहिणींचे पाककौशल्य धुळीला मिळालेले होते.

"हे काय तू जाणार नाही म्हणतोस अण्णामामाकडे?चिडेल ना तो.. त्याची समजूत घालता घालता दम लागेल मला"
आजींचा चढलेला स्वर पाहून नचिकेत जरा गडबडला.
" जाणार नाही म्हणजे उद्या नको म्हणतोय मी. "
"गेल्या ट्रिपला गेला नाहीत तेव्हापासून रागावला आहे तो तुझ्यावर आणि माझ्यावरही"
"तुझ्यावर कशाला रागावेल त्यामुळे?"
"माझा नातू आहेस ना तू"
"अण्णामामा कोण?"श्रेयाने हळूच इशानला विचारले.
"पणजीआजीचा चुलत भाऊ, खूप म्हातारे आहेत ते, कुठे जात येत नाहीत, शिंदेवाडीला राहतात."
"ओह! तेच का जे लास्ट ट्रिपमधे फोनवर बाबाला पुढच्या वेळी आला नाहीस तर तुझ तोंड पाहणार नाही म्हणाले?"
"हो तेच! "
"मग बरच ना, या वेळी बाबा तिथे गेला नाही तर पुन्हा जायचा प्रश्नच नाही! तेवढाच दिसेल बाबा आपल्याला"
"तस नाही, पणजीआजीला राग येईल. अण्णामामाला पण राग येईल."
"मग अस केल तर? "स्वतः:शीच बोलत श्रेयाने विचार केला..मग नचिकेतच्या मांडीवर बसून ती त्याला म्हणाली,"बाबा, तू गाडी पाठव ना , तेच येतील इथे. पणजीआजीची पण भेट होईल. आमचीपण."
" तो पंच्याऐंशी वर्षाचा आहे.माझ्याहून मोठा. नचिकेतनेच जायला हवे भेटायला"
"आमच्या शेजारचे म्हातारे कपल आहे, त्याच वयाचे, ते दोघे जातात बाहेर , तो आजोबा तर गाडी चालवतो, आजी सगळी कामे करते. माझ्या मित्रमैत्रिणीं भारतात आल्या की आजीआजोबा काय पणजोबा येतात भेटायला त्यांना इथे सुद्धा . तिकडे ते येतातच.
"तुमच्याकडची गोष्ट वेगळी, मला  असले काही चालणार नाही, एवढी मोठी झालीस तू बाबाच्या मांडीवर काय बसतेस? " पणजीआजींनी नापसंती दाखवली.
"कशाच वेगळ आहे? सगळ तेच आहे. पाहते मी तू पाहतेस त्या सिरियल्स तिकडे, त्यात दाखवतात की मोठठी मुलगी बाबाच्या मांडीवर बसलेली.  आमचे तुमचे असे नसते काही वेगळे. हा इशान  बघतो मी ज्या इंग्लिश सिरियल्स बघते त्याच."
मृणालने श्रेयाला गप्प बस अशी खूण केली. शेवटी तणतणत श्रेया  बाहेरच्या खोलीत निघून गेली.
आपले काम होणार असेल तर बोलावण नसतांना जाणारी आजची पिढी आणि बोलावण आल्याशिवाय नाही अशी आधीची पिढी यांचे सख्य कसे होणार? किती वेळा कुणाकुणाची समजूत काढायची? त्यापेक्षा मृणालला स्वयंपाक सोपा वाटला. पणजीआजीने नचिकेतचा ताबा मात्र सोडला नव्हता.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
मृणालने फ्रीजमध्ये असलेले फ्रूटसॅलड चाखून पाहिले. सारीकाने कच्छी दाबेल्यांवर एक कटाक्ष टाकला ,  चीझ आले की ते सॅन्डविच आणि दाबेलीवर भुरभुरून पाने घेता येणार होती. कुकिंग शो मध्ये दाखवतात तसे एका सॅन्डचिचचे प्रात्यक्षिक करून श्रेया गायब झाली होती, इशानला एकदाचे सुटलो असे झाले होते पण अमेरिकेत जायचा निश्चय मात्र त्याने धरून ठेवला होता.

मुलांनी प्रतिभाआजीकडे बाहेर फिरायला घेऊन चल असा हट्ट धरला. अर्थातच प्रतिभाआजीने चटकन त्याला संमती दिली. पणजी आजींचे बोलणे सुरु होते.  पुराणात कोण कोणते अध्याय येतील आणि कुणाकुणाचा कितीदा उद्धार होईल ते ऐकण्यापेक्षा बाहेर जाणे हा सर्वात सोपा मार्ग त्यांनी निवडला होता. भाजी निवडणे, डाळ तांदूळ निवडणे , कॉलेज करता लॉ, सायकॉलोजी , अकौंटींग हे विषय निवडणे अशी किरकोळ निवडानिवडी त्यांनी केली होती.  पण आपले आईवडील, मुलबाळ  कोण असावी, कशी असावी ती निवड त्यांना करता आली नाही हे त्यांना राहून राहून क्लेषदायी वाटत होते

’टॉम आणि जेरी" सुरू होणार होते. त्यामुळे गावभर भटकंती करून ,कुलफी खाऊन आलेला बालकंपू पुन्हा आपापल्या जागेवर बसून उड्या मारू लागला होता.
सारिका आणि मृणालला मात्र या खाद्यपदार्थांनी चांगलेच जेरीस आणले होते.   पुढच्या पंधरा मिनिटात दीर घरी येऊन थडकणार होता आणि चक्क बरोबर चीझ येणार होते!
 एकदाचा दीर आला आणि चीझसुद्धा!
"ई, याला म्हणतात का चीझ? काहीतरीच दिसतय."
" त्यात ई काय आहे पणजीआजी, अग जस तुमच पनीर तस आमच चीझ"
" पनीरबिनीर काही आपल नाही बरं का" आजेसासूबाईंची मराठी अस्मिता जागी झाली होती.
"आजकाल लग्न, मुंज साखरपुडा , डॉहाळजेवण काही असू द्या मेनू आपला तोच असतो. मटरपनीर, पालकपनीर, भेंडीमसाला नाहीतर छोले. तुमच्या अमेरिकेत पण असेच असते असे सांगत होती नलू. नलू आठवते ना तुला मृणाल? माझी मैत्रीण. ...तिची मुलगी नाही का? "
"हो, सायली, जिने पीएचडी केले आणि दहा वर्षांनी भारतात परत आले ते. मृणालने त्यांना सहमती दर्शवली. खरं  आता ते भारतात परत येऊन तिचा मुलगा पीएचडीला अमेरिकेत गेला होता. पण तो मुद्दा वेगळा...
"हो हो , तीच."   तेवढ्यात दिराने काय आज्जी म्हणायचा अवकाश ; आजीचे नातूप्रेम पुन्हा दुप्पटीने उतू गेले. त्याचा ओघळ किती दूरपर्यंत गेला होता ते मोजायला दोन्ही नातसुनांना उसंत नव्हती.

सॅन्डविचच आणि कच्छी दाबेलीचा एक एक घास घेता घेता आजेसासूबाईंचे एकेका पदार्थाचे आख्यान सुरु होते. अधून मधून  असे पदार्थ आता चेंज म्हणून कसे आपण मान्य केले आहेत ते त्या सांगत होत्या. तुमचे पावभाजी आणि सॅण्डविच म्हणजे काय दोन पाऱ्यांमध्ये काहीतरी घालून खायचे. 
पदार्थाचे राहू द्या ;मेडिसिन, इंजिनियरींग, मॅनेजमेंट, लॉ अशा डबल डिग्र्या एवढच काय एका नातवाची पीएचडी सुद्धा पणजीने दोन ब्रेडमधे म्हणा किंवा मोदकाच्या करंजीच्या पारीमधे गुंडाळली होती.
आजीला आईस्क्रिम खा ,फ्रूट सॅलड खा असा आग्रह करून आणि वर खोकल्याचे औषध घे असे प्रेमाने सांगून दोघे भाऊ तळहातावरचे पाणी न वाळते तोच घराबाहेर पडले होते.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आवडते जेवण करून बालकंपूच नाही तर त्यांची प्रतिभाआजीसुद्धा बाहेर टीव्ही बघतांना समाधानी दिसत होती.
 आपलंच म्हणण खरं करून घेणाऱ्या श्रेयाच्या चेहऱ्यावर आणि चेहऱ्याभवती काही वलयबिलय दिसत का ते बघून याव असा मोह मृणालला झाला होता.
"आजी, तू म्हणते तसे माझे बेसिक पक्के आहे की नाही? अग कुणी काय म्ह्णेल ते म्हणू दे, आपण आपल्याला हव तस करून घ्यायला शिकायच . हो ना? हट्टीपणा तर हट्टीपणा पण एक दिवस मी पण कुणीतर  होईनच. आपण कुठेही गेलो तरी आपल ओरिजिन काय आहे ,कुठे आहे ते माहिती असल आणि ते नीट सेफ असल म्हणजे झालं ना?आणि मला कळत आहे ते  " श्रेया आजीच्या कानात कुजबुजली!
"या घरातल्या मुली त्यांच म्हणणच खरं करतील "असे वाक्य प्रतिभाआजी नणंदेकरता म्हणत, तेच मृणाल सारिका म्हणत.
"आता ही श्रेया!  देश बदलला, पिढी बदलली तरी गुणधर्म काही चटकन बदलत नाहीत!

-सोनाली जोशी