नि:शब्द

असं एकदा करूनच बघ

तूच लिहिलेलं काहीतरी हातात घे आणि त्यावरचे सगळे शब्द खोडून टाक

घासून, पुसून कागद स्वच्छ स्वच्छ कर
अक्षरांची उरली सुरली धूळही फुंकरीने उडवून लाव आणि -

बघ त्या नि:शब्द कागदाकडे
नाकाजवळ कागद धरून ऊरभरून श्वास घे
मग, तो कागदही दे फेकून हवेत कुठेतरी आणि नुसताच बस; नि:संग

जाणवेल काहीतरी तुला
तू लिहिलेल्या त्याच शब्दातलं.. किंवा त्या शब्दांच्याही पलिकडलं

आणि काहीच जाणवलं नाही तर...?
पुन्हा काही काहीसुद्धा लिहू नकोस... जन्मभर

असं एकदा करूनच बघ!