रोखला मनात तो विचार मस्त भासला
मोहुनी चितारता जगास स्वस्त भासला
जाहला सराव की असेल जाहला बरा?
घाव कालचा उगाच जबरदस्त भासला
आज घेतसे सलाम पाय टाकताच मी
काल हाच का जमाव भारदस्त भासला?
काम काढले जसे मनास आवरायचे
चेहरा तुझा मला बराच त्रस्त भासला
हा अता कुठे नभात घेतला प्रवेश मी
एवढ्यात का तुला समीप अस्त भासला?
जाहले बरे मला दिलास तू नकार ते
हा रिकामटेकडा जगास व्यस्त भासला
एकही न यार या जगात पाहिला असा
जेवढा असेल तेवढाच ग्रस्त भासला