राजा माझ्यापेक्षा २-३ वर्षांनी मोठा होता. त्याला त्याच्या बापाने पहिल्या वर्गात घातले अन हा पहिल्याच दिवशी पळून आला. बापही चिवट ! रोज तो राजाला शाळेत सोडून कामाला जायचा. अन राजा तो गेला की घरी पळायचा. एक दिवस त्याच्या मास्तरीण बाईनं त्याच्या बापाला सांगितलं. झालं बापाचं टक्कुरं फिरलं. दुसऱ्या दिवशी तो राजाला घेउन शाळेत गेला अन कामावर निघून जायच्यासारखं केल.
राजा घरी आला, बाप दरवाज्याच्या मागेच लपून बसला होता. त्यानं हातातल्या फोकानं जो बडवायला सुरुवात केली की बस ..... झोडत झोडत राजाला शाळेपर्यंत आणलं. "लोकांना फी भरून शिका लागते, अन तुले फुकटात शिकाले भेटते तं माजला लेका ...... " तोंडानं शिव्या देणं अन हातानं झोडपण चालुच होतं. राजाची आई बिचारी "नको मारू वो.... " म्हणत रडत होती. त्या दिवसापासून असा एकही दिवस नाही गेला की राजा शाळेत नाही गेला.
घरची परिस्थिती फारशी चांगली नव्हती, त्यामुळे राजा लहानपणापासुनच छोटी-मोठी काम करायला लागला होता. कधी किराणा दुकानात, तर कधी भाजीच्या, तर कधी मधल्या सुटीत गोळ्या, बिस्कीटही विकायचा. कदाचित त्यामुळे परिस्थितीशी कसं जुळवून घ्यावं त्याला लहानपणापासुनच कळलं असावं.
तो पाचवीत पहिल्यांदा नापास झाला, कारण त्याला इंग्रजी अन गणित दोन्ही जमलं नाही. त्याच्या बापानं सरळ मास्तरला सांगितलं, "माझं पोरगं १० वेळा नापास झालं तरी चालल, पण कच्च राह्यला नको". मग तो अन मी एकाच वर्गात आलो. आमचा वर्ग म्हणजे हुशार पोरांचा वर्ग होता, म्हणुनच फक्त आमच्याच वर्गात मुलीसुद्धा होत्या. त्यातच एक छान मुलगी होती, सोनाली काटेखाये. तिचं आडनाव जरी आवडत नसलं तरी ती पोरगी आम्हाला (आमच्या गृपला) आवडायची. मात्र तिच्याशी बोलण्याची हिंमत राजाशिवाय कुणातच नव्हती. कारण तिचा बाप खाटीक होता.
एक दिवस तिचा बाप तिची वही घेउन शाळेत आला. मास्तरनी वही बघितली अन राजाला बोलावलं. आदल्या दिवशी सोनालीच्या वहीवर राजानं "I love you " लिहिलं होतं, हे त्यानच आम्हाला सांगितलं होतं. आता मास्तर राजाला झोडणार हे आम्हाला कळलं होत. सगळा वर्ग चुप.
मास्तरनं विचारलं, " हे तु लिहिलं आहे ? "
राजानं एखाद्या डिटेक्टीव्हसारखं बघितलं अन म्हणाला, "हो, मीच लिहिलं"
मास्तर लालबुंद झाला. "नालायका, तुला अर्थ कळतो का याचा ? "
"हो. याचा अर्थ आहे मला तु खुप आवडते. "
"आणि हे तु सोनालीच्या वहीत लिहिल? " सोनालीचा बाप डोळे बाहेर काढून केन्व्हा याची पाठ सोलतो अश्याप्रकारे उभा होता.
"तिनं विचारलं म्हणून मी लिहून दिलं"
"तिनं विचारलं" असं म्हणत मास्तरनं सोनालीकडे पाहिलं. ती घाबरून रडायला लागली. तिच्या बापाला काय कराव समजत नव्हतं. पाचवीतले पोरं अन .....
"त्यादिवशी नाही का मास्तर तुम्ही 'माय मदर' निबंध लिहायला सांगितला होता, त्यात तिले लिहायचं होत, की ती तिच्या आईवर खुप प्रेम करते, पण इंग्रजीत कसं लिहायचं हे समजत नव्हतं. म्हणून मी लिहून दिलं. सांग न व सोने". राजा बिनधास्त बोलला.
"हम्म" मास्तरने काटेखायेकडे पाहिलं. त्याचा चेहरा बिचारा मलुल झाला होता. "आधी खरं काय आहे हे विचारायचं नाही का ? चालले आपले शाळेत..... आता मास्तरने त्याचा राग काढला अन राजासकट आम्ही सगळे गालातल्या गालात हसायला लागलो.
पुढच्या वर्षी मात्र सोनाली दुसऱ्या वर्गात शिकायला गेली. त्याची मुलीसोबत बोलणे इतकिच इच्छा असायची. बाकी काहिच नाही. घाटंजीसारख्या तालुक्याच्या छोट्या गावात तेही दुर्मिळच असायचं. अगदी कॉलेजलासुद्धा, मग शाळेची गोष्ट तर दुरच. पण त्यात राजासारखे महाभाग असायचे.
आमच्या गृपसोबत तो ५ वीत पास झाला पण इंग्रजीत ग्रेस घेउन. त्याचा निकाल वाचतांना मास्तरनी "पास विथ ग्रेस इन इंग्लिश" हे जरा जोर देउन म्हटलं अन राजाचं टाळकं सटकलं. "सर, एका वर्षात नाही तुमच्यापेक्षाही झकास इंग्लिश नाही बोललो तर पाटलाचं नाव नाही लावणार" असं सर गेल्यावर भर वर्गात म्हटलं होतं. ते ऐकून सोनाली त्याच्याकडे पाहून गोड हसली, ते त्याला कदाचित आठवत नसेल पण आम्हाला नक्कीच आठवते, कारण इतकी हिंमत आमच्यात कधीच नव्हती.
क्रमश :