राजा ३

५ वीचा निकाल लागला अन राजानं प्रतिज्ञा केली. इंग्रजी बोलायच, अन तेही मराठेसरपेक्षा चांगलं पण आधिच तो "वात्रट" म्हणून प्रसिद्ध आणि गरिबही. कोणता शिक्षक त्याला इंग्रजी शिकवणार ? त्यातच आमच्या गावात केबल आलं. झालं, मानमोडेच्या केबलनं धमाल उडवली. राजा लगेच त्याच्याकडे गेला. म्हणाला, तु मला शिकव, चॅनल सेटींग आणि कनेक्षन. २०० रु महिना पुरेल मात्र रात्री मी केबल रुमला झोपणार.

मानमोडेला लॉटरीच लागली. तो राजाला घेउनच फिरू लागला. रात्रीची झोपायची व्यवस्थाही झाली त्याची.

*******************************************************

२० जुलैला वर्गात नोटिस आली. टिळक पुण्यतिथीच्या कार्यक्रमासाठी भाषणाचे नाव द्यायचे होते. आमच्या वर्गात स्वतःहून नाव देणारा राजा एकमेव होता. बाकी देशपांडेचा गज्या, मी अन वाघाचा राम्याचे नाव मराठेसरांनी आधीच लिहिले होते. आम्हाला भाषण म्हटल की हुडहुडी भरायची, पण राजानं स्वतःहून नाव दिलं हे पाहून आम्हाला धीर आला. मी एक भाषण लिहून घेतलं आणि तेच घोटलं.

१ ऑगस्ट उजाडला. सकाळचे वर्ग कसे झाले मला कळलच नाही. मध्येच हृ्दयात धडधड व्हायची, राजा मात्र निर्विकार होता. शेवटी ४ वाजता कार्यक्रम सुरू झाला. मी भाषणाच्यावेळी प्रमुख पाहुण्याचं नाव चुकीच म्हटलं तर राम्यानं अध्यक्षाला प्रमुख पाहुणा बनवलं. गज्याचं भाषण बऱ्यापैकी झालं. मराठे सरचा राजावर आधीच राग होता त्यामुळे त्याचं नाव त्यांनी सर्वात शेवटी घेतलं.

राजा मोठ्या दिमाखात माईकपुढे गेला. शेवटचं भाषण म्हणून सगळे जरा रिलॅक्स झाले होते. राजाकडून कोणालाच "खुप छान" वगैरेची अपेक्षा नव्हतीच. त्यानं आधी माईक चालू आहे की नाही ते तपासलं आणि घसा खाकरून म्हणाला,

"ऑलमोस्ट ६० इअर्स बॅक लोकमान्य तिलक पास अवे, बट स्टील वी रिमेंबर हिम ऍंड सेलेब्रेट हिज डेथ ऍनिव्हर्सरी.... डु यु नो व्हाय ? " असं म्हणत त्यानं आधी मराठे सर अन नंतर सगळ्या शिक्षकांवर नजर फिरवली. त्याचं अमेरिकन पद्धतीचं इंग्रजी ऐकून खुद्द मराठेसर चकीत झाले, तर आमची काय कथा. पुण्यतिथीला इंग्रजीत "डेथ ऍनिव्हर्सरी" म्हणतात हे बऱ्याच शिक्षकांनाही त्यादिवशी कळले असावे.

पुढे त्यानं लोकमान्यांच्या छोट्या-छोट्या गोष्टी फार सुरेख सांगितल्या. मुख्याध्यापकांनी त्याचं विशेष कौतुक केलं.

आम्हाला कळलच नाही की राजा इतका चांगला इंग्रजी कसा बोलू लागला. त्याला कार्यक्रम संपल्यावर लगेच आम्ही विचारलं तर एकदम बेफिकीरपणे डोळे मिचकावत म्हणाला, "स्टार प्लसवर सांता-बार्बरा बघा, म्हणजे तुम्हालाही जमेल". सांता-बार्बरातर सोडाच, नुस्त "स्टार प्लस" जरी म्हटलं तरी आमच्या डोळ्यासमोर "स्टार" चकले असते हे मोठ्या भावंडाकडून आम्हाला कळलं होतं, त्यामुळे आम्ही त्याचा नाद सोडला.

इंग्रजी बोलण्यात जरी राजानं बऱ्यापैकी प्रभुत्व मिळवलं होतं तरी लेखनात प्रगती नव्हती. त्यामुळे तो दहावीला लटकला. नुस्तं घरी बसण्यापेक्षा तो नागपुरला गेला. डॉक्टरकडे कंपाउंडर कम रिसेप्शन कम हरकाम्या असं त्याला काम मिळालं. २-३ महिने चांगलं चाललं पण एक दिवस तो परतला.

आम्हाला कळलं तसं आम्ही लगेच भेटायला गेलो. त्याला भेटायला मला नेहमीच आवडायचं कारण त्याच्याजवळ मस्त किस्से असायचे. मी खोकतच त्याच्याशी बोलत होतो, तसा तो उठला अन एक बाटली घेउन आला.

"घे रे म्हाताऱ्या, १० रुची बाटली आहे, आठ दिवसात खल्लास ! "

मी १० ची नोट देत मुद्दाम म्हणालो, "खोकला का मी"

नोट घेउन शांतपणे म्हणाला, "मी बाटलीची गोष्ट करत होतो". मी थंडाच झालो.

राजानं मग डॉक्टरच्या गमतीजमती सांगितल्या. राजा बरच काही शिकला त्याच्याकडे. औषधी बांधून देणं वगैरे. मात्र काही लोकं असतातच वात्रट. एकाने राजाला विचारलं, " का रे मी इंग्रजीचा प्राध्यापक आहे, पण मला समजत नाही डॉक्टरने काय लिहिलं आहे, तुला कसं कळते ? "

राजाला आधीच "इंग्रजीचा मास्तर"ची ऍलर्जी होती. तो हासत म्हणाला, "डॉक्टरच्या मनात जे येते ते तो लिहिते, मला वाटते ते औषधं मी देतो". ते ऐकून तो मास्तर औषध न घेताच गेला म्हणे.

पण ही नोकरी कशी सुटली त्याचीही एक मजाच झाली. एक दिवस डॉक्टरकडे एक म्हातारी आली. डॉक्टरने राजाला नेहमीप्रमाणे ताप बघायला सांगितलं. राजा थर्मामिटर बघून म्हणाला, " डॉक्टर म्हातारी तापली हो. "

म्हातारी जाताच डॉक्टर राजाला म्हणाले, "अरे तुझी इंग्रजी इतकी चांगली आहे तर तु इंग्रजीत बोलत जा, म्हणजे इंप्रेशन पडेल पेशंटवर " राजानं मान डोलावली.

पुढची पेशंट एक तरूण मुलगी होती. नेहमीप्रमाणं राजानं तिला झोपायला सांगितलं आणि तिच्या तोंडात थर्मामिटर कोंबलं. ताप पाहून राजा एकदम उडालाच. १०३ !

राजा म्हणाला, "डॉक्टर, शी इज व्हेरी हॉट! "

ते ऐकताच ती पोरगी जरा सावरून बसली. नशीब तिच्या तोंडात थर्मामिटर होतं, पण आता डॉक्टर तापला अन राजाला धकलत दवाखान्याबाहेर काढलं. राजा तिथून निघाला तो सरळ घरी !!!