झाडाझडती

आपटलं काहीतरी, खाणकन नाहीतर दाणकन.

"दर वेळेला काहीतरी आपटूनच सुरुवात करायला हवी का?

How very predictable!"

"वेगळं काही करावं अशी लायकी तरी आहे का?"

झाली सुरुवात.

आता शब्दांच्या नख्या नि दात परजले जातील.

आणि एकमेकांच्या जाणीवांत ते खुपसून,

भळाभळा रक्ताचे पाट वाहवले जातील.

भूतकाळातले दाखले दिले जातील,

भविष्यकाळातल्या शपथा घेतल्या जातील.

अखेर रक्ताने निथळणारे दोघे मुकाटपणे जखमा चाटायला लागतील.

आपापल्या नव्हे, एकमेकांच्या.

शेवटी काय?

एकमेकांशिवाय आपण अपूर्ण,

आणि एकमेकांमुळेही आपण अपूर्ण.