पाणवठ्यावर घागरी भरतात, रित्या होतात, हिंदकळत चालतात, सवयीची पाउलवाट.
पाण्यात बुडतानाच घागरी मनातलंही बुडवतात पाण्यात, पाणी वाहून झाल्यावर, निमूट बसतात कोपऱ्यात,
आडाविहिरींच्या खुणा घागरींवर, दिल्या घेतल्याच्या आठवणी अंगभर.
पाणवठ्यावर घागरी कुजबुजतात, एकमेकींसाठी पाझरतात, तहानल्या ओंजळीवर सर्वस्व वाहून टाकतात.
आयुष्यभर पाण्यात तरी नाही थेंबाचाही अधिकार, ठेचाळले पाय तरी तोल सावरीत जवळ करायचं दार,
वाटचालीत कधी घेरून टाकतो उंबऱ्याचा अद्रुश्य धाक, कधी गोठवून टाकते विषारी नजरेतली हाक,
कोठे ठेवायचे हे 'घाटाचे 'अघटित? सावलीचंही भय वागवीत, किती जपायची राहरीत?
घागरींचे गळेच असे दोरांच्या गाठींसाठी, आणी अवघा देह पाणी वाहण्यासाठी,
अवेळी पाणवठ्यावर घागरी अबोल, तरीही वाऱ्यावर वावड्या उडतात, आणि भरल्या घागरींना तडे जातात.
तुडूंबल्या घागरी तर घरेही तुडूंबतात, एरव्ही घागरींना स्वप्नातही विहिरींचे तळच दिसतात!