...........................................
... कोण जाणे!
...........................................
आसवांचा कोठवर हा त्रास आहे... कोण जाणे!
हासणे कोठे विनासायास आहे...? कोण जाणे!दाटल्यां दोन्ही मनांची भेट ही ओथंबलेली...
का तरीही कोरडा सहवास आहे... कोण जाणे!या जगाच्या अंगणी सारेच वेडेवाकडे का...?
... हा कुणाच्या कल्पनांचा रास आहे... कोण जाणे!दाट काळोखातसुद्धा राहिली हसरीच दुःखे...
का सुखांची खिन्न ही आरास आहे... कोण जाणे!'आतल्या आहेस गाठीचा' मला म्हणतात सारे...
(का तुझा माझ्यावरी विश्वास आहे... कोण जाणे! )मित्र साऱ्यांचाच व्हावे, हे खरे आहे, परंतू ...
त्यातही माझाच मी का खास आहे... कोण जाणे!अट्टहासाने कशाचीही न केली मागणी मी...
का निरिच्छेचा मला हव्यास आहे... कोण जाणे!तू पुन्हा येणारही नाहीस हे नक्की, तरीही...
तू पुन्हा येशील, ही का आस आहे... कोण जाणे!चेहरे सारेच आता देखणे म्हणवून घेती...
आरसा केला कुणी लंपास आहे... कोण जाणे!हे जिणे मोठीच शिक्षा... संपली कोठे प्रतीक्षा...?
केवढा हा लांबलेला तास आहे... कोण जाणे!मी तुझ्या लेखी तयारीचा जरी नाही तरीही...
मी परीक्षेला तुझ्या का पास आहे... कोण जाणे!पाहतो आहे तुला मी; बोलतो आहे तुझ्याशी...
तीच तू आहेस की हा भास आहे... कोण जाणे!कोणता केला गुन्हा मी? कोणत्या जन्मात केला?
आज का हा भोवती गळफास आहे... कोण जाणे!एक आहे जीव दोघांचा, असे वाटे जगाला...
श्वास हा माझा, तुझा निःश्वास आहे? कोण जाणे!!- प्रदीप कुलकर्णी
....................................................
रचनाकाल ः २ एप्रिल २००९
....................................................