ऐका 'मिटींग देवी', तुमची कहाणी

ऐका ’मीटिंग देवी’, तुमची कहाणी

कलियुगात भूतला वर भारतवर्षात एक आटपाट नगरी होती. तिचे नाव मायानगरी. नगरी मोठी नामी. टोलेजंग इमारती, चकचकीत कचेऱ्या, सुसाट धावणाऱ्या गाड्या, भिरभिरणारी विमाने, सर्पटणाऱ्या आगगाड्या, कोलाहल आणि गर्दीचे राज्य होते. या मायानगरीत एक बुद्धीचाकर राहत होता. त्याचे नाव दिनू. दिनू मोठा कष्टाळू. शिक्षण झाले, दिनू नोकरीला लागला. दिनू होता प्रामाणिक आणि मेहेनती. तो आपले काम चोख बजावित करीत असे. कुणाच्या अध्यात ना मध्यात. आपण बरे की आपले काम बरे असा दिनू.

नित्याप्रमाणे एप्रिल मास उगवला. दिनू ने नोकरी देवीची मनोभावे प्रार्थना केली, ’हे नोकरी देवी, यंदा तरी प्रसन्न हो! मला बढती मिळवून दे. दरवर्षी मी मरून काम करतो आणि भलत्याचे नाव होते, भलत्यालाच मान मिळतो. मी आपला आहे तिथेच. ’ बघता बघता महिना आखेर आली. कचेरीतले कागद सळसळले. साहेब लोक हलू लागले. आणि ज्याची प्रतीक्षा असते ते हुकुम सुटले. कुणाला नवी कामगिरी, नवी नेमणूक तर कुणाला बढती आणि कुणाला गाडी. मात्र दिनुला हा श्रावणही कोरडाच गेला. चार दिडक्या वाढल्य पण पदोन्नती नाही.

दिनू  कचेरी सुटल्यावर खिन्न मनाने बाहेर पडला. त्याला घरी जावेसे वाटेना. तो रस्त्याच्या कडेने एकटाच निघाला. चालता चालता समुद्राकाठी पोहोचला. सूर्य बुडाला. दिनू तसाच अंधारात बसून राहीला. मग कंटाळून तो तिथून निघाला. आपल्याच तंद्रीत रस्ता ओलांडताना अचानक मागून प्रकाशाचा झोत आला आणि पाठोपाठ कर्र्र्र्र्र्र कच्च्च असा आवाज. दिनू दचकला आणि एकदम खजिल झाला. गाडी वेळीच थांबवून आपले प्राण वाचवणाऱ्या गाडीवाल्याला हात जोडून तो चार अपशब्द ऐकायच्या तयारीत निमूट उभा राहीला. गाडीचा दरवाजा उघडला आणि एक रुबाबदार पोषाख केलेला सद्गृहस्त बाहेर आला. ’दिन्या! ’ तो गाडीवाला मोठ्याने ओरडला आणि त्याने जवळ येत दिनुला आलिंगन दिले. सावरलेल्या दिनुने आ वासत त्याला पाहिले आणि ओळखले, अरे विनू, तु? तो दिनुचा सहपाठी विनू होता.

विनुने दिनुला हाताला धरून गाडीत बसवला आणि गाडी सुरू केली. रे दिनू, तुझा पत्ता काय? कुठे असतोस? काय करतोस? दिनू सुस्कारा टाकत म्हणाला, बाबारे नोकरी करतो! आणि काय करणार. आहे एका खाजगी अस्थापनेत कनिष्ठ अधिकारी झालं. पण तु तर मोठा तालेवार झालास की रे. मोठ्या आनंदात दिसतोस. ’होय’ विनू म्हणाला. होय मित्रा मी खरेच आज आनंदात आहे, अरे मजेत नोकरी चालली आहे, मी वरिष्ठ व्यवस्थापक झालो आहे. ही पाहा मला नवी गाडी देखिल मिळाली आहे. ’मित्रा, आज किती दिवसांनी भेटलास! चल आपण एखाद्या झकपक अतिथीगृहात उतम भोजन करुया. आज फारा दिवसांनी आपली गाठ पडली, आणि तीही अचानक, त्याप्रित्यर्थ आज माझ्यातर्फे मेजवानी’ विनू म्हणाला. दोघे एका एका सुबक व शितल अतिथीगृहात प्रवेशते झाले. मग दिनुला बोलते करत विनू म्हणाला, बाबा रे जपी तर बोलतोस तपी तर चलतोस. निष्ठेने काम करतोस, मग असा उदास का. दिनुने सर्व कहाणी त्याला ऐकविली. मग दिनू दीनपणे विनुला म्हणाला, मित्रा काम तर करतो मग यश का नाही मिळत बरे? माझे काय चुकले? तु कसले व्रत केलेस? कोणत्या देवतेची आराधना केलीस ज्या योगे तुला उच्च पद लाभले? कोणते व्रत केलेस? समोर आलेल्या फेसाळ पेयाचा एक पेला विनुने दिनुच्या हाती दिला, एक स्वत: घेतला. आपल्या पेल्यातून एक मोठ्ठा घोट घेत दिनू म्हणाला, ’मित्रा तुझी कहाणी मी ऐकली. पण चिंता करू नकोस. तुला एक उपाय सांगतो. ’तो कोणता? त्या योगे काय फळ मिळेल? अधिर झालेल्या दिनुने विचारले.

’हे मित्रा तुज एक वसा देतो. नेमाने पाळ. उतू नकोस मातू नकोस. हे व्रत केल्याने तुझ्या मनोकामना पूर्ण होतील. तुही मोठा साहेब होशील. ’ आपल्या पेल्यातला एक घोट घेत दिनू भक्ती भावाने परिसू लागला. ’मित्रा तु मिटिंग देवीचे व्रत घे, हे व्रत मोठे प्रभावी आहे’. दिनू आतुरतेने विचारता झाला, ’हे व्रत काय असते, हे व्रत कसे करावे? ’ उत्तरादाखल विनू व्रता विषयी सांगता झाला:

कचेरीत एक दिवस आपल्या खात्यात डांगोरा पिटावा; ’मीटिंग’ होणार असे जाहिर करावे.
खूप गाजा वाजा करावा.
सर्वाना कामाला लावावे.
आपल्या शिष्यांना भाराभर कागद भरायला सांगावेत.
कचेरीतली सर्वात सुसज्ज बैठकीची खोली आरक्षित करावी.
खोलीबरोबरच कागदाची बाडे, लेखण्या, रंगी बेरंगी बोरू आणि मोठा शुभ्रफलकही मागवावा.
झालेच तर एका भिंतीवर शुभ्रपटलाचे आयोजन करण्यास सांगावे
एक द्रायुस्फटिक प्रेक्षेपक मागवावा.
ध्वनिवर्धकही मागवावा.
अशा प्रकारे सर्व साहित्याची सिद्धता करावी.

मग प्रत्यक्ष मीटिंग व्रताच्या आधी दोन दिवस व्रतस्थ व्हावे.
म्हणजे नक्की काय करावे?
मौन व्रत धारण करावे.
मुद्रा गंभिर ठेवावी.
कार्यासनावर भाराभर कागद झुलत्या मनोऱ्यागत रचून ठेवावेत.
संगणकाच्या पडद्यावर एक्सेलच्या चादरी अंथराव्यात.
त्यावर भरमसाठ आकडे मोड करावी.
भाराभर रकाने बनवावेत.
मग त्या रकान्यांमध्ये रांगोळी सारखे रक्त, पीत, नील, हरीत रंग भरावेत.
मग जालावर जावे.
इकडची तिकडची माहिती गोळा करावी.
थोडे आलेख बनवावेत.
मग काही चित्रे जमवावीत.
मग शक्तिबिंदू ला आवाहन करावे.
गोळा केलेली सामग्री आकर्षक सरक्यांवर चिकटवावी.
पहिल्या सरकीवर मोठ्यात मोठ्या साहेबाचा उपदेश चिकटवावा.
मग अस्थापनेच्या स्तुतिपर स्तोत्रे आणि साहेबाचे स्तवन लिहावे.
पुढच्या सरक्यांवर कुठे चित्रे चिकटवावीत, तर कुठे आलेख डकवावेत.
अधून मधून आकडेही पसरावेत.
हे सर्व करीत असता अधून मधून सर्व सहकाऱ्यांना हाकाटावे.
शिष्यगणाला वारंवार सिद्धतेची विचारणा करावी.
या व्रतस्थ काळात उशीरापर्यंत कचेरीत बसावे.
खान, पान, भाष, जाल, शीत आदी सर्व मोफत सुविधा उपभोगाव्यात.
मात्र मुद्रा सैल पडू देउ नये.

व्रताचा दिवस उजाडला की काय करावे?
प्रथम सर्वांचे स्वागतकरावे.
उष्ण खाद्य व शीत पेयांची सरबराई करावी
मग साहेबास उपदेशामृत पाजण्यास विनवावे.
ते झाल्यावर आपली पोथी उघडावी.
आपल्या गोळा केलेल्या साहित्याचे वाचन करावे.
रटाळ माहिती रसभरीत वर्णन करून ओतत राहावी.
आपल्या सहकाऱ्यांची संमती घ्यावी.
मग कुणी काही शंका उपस्थित करेल तर त्यावर गहन व असंबद्ध उत्तर द्यावे.
अर्धा प्रहर उलटताच उष्णपेय व मिष्टचकत्यांची तबके फिरविण्याची योजना करावी.
मग आपल्या सहकाऱ्यांना आळी पाळीने त्यांच्या सरक्या सादर करू द्याव्यात.
मग बौद्धिक श्रमाने शिणलेल्या जीवांना घटकाभर विश्राम द्यावा.
सुग्रास भोजन वाढावे.
भोजनोत्तर शीतमिष्टान्न खाऊ घालावे.
पुन्हा दालनात प्रवेश करावा.
सर्व प्रकाशयोजना कुंठित करून प्रक्षेपक प्रज्वलित करावा.
आपल्या रंगीत सरक्या पटलावर सादर कराव्या.
मग आपल्या सर्वात मोठ्या साहेबास पाचारण करावे.
तो त्याचे मंत्रिगणांनी सिद्ध केलेले बाड घेउन दाखल होताच सर्वांनी अभिवादन करावे.
त्याला सर्व पामरांना मार्गदर्शन करण्याची प्रार्थना करावी.
साहेब सरक्या दाखवित असता अधून मधून प्रसन्न मुद्रेने मस्तक डोलवावे.
कुणी समधिस्त झालेला दिसल्यास त्याचा तपोभंग करू नये.
साहेबाच्या सादरीकरणानंतर टाळ्यांचा गजर होताच सर्व भानावर येतीलच.
मग अंधार दूर करावा, प्रकाशमान व्हावे.
अंमळ उष्णपेयपान करवावे.
मग पुन्हा चर्चा रवंथ सुरू करावा.
मग जनसमुदायाची झालेल्या कार्यक्रमावर मते मागवावीत.
मग पुढच्या मिटींगची कालनिश्चिती करावी.
मग तोंड भरून आभार मानावेत आणि व्रत पूर्णत्वास जाते.

या व्रताचे उद्यापन कसे करावे?
सायंकाळी कार्यकालानंतर सर्व सहकारी, श्रेष्ठ, ज्येष्ठ, मनुष्यबळाधिकारी, लेखाधिकारी, वित्ताधिकारी अशा सर्वांना उत्तम आतिथ्यगृहात निमंत्रीत करावे.
सर्वांना पेयपान घडवावे.
आपल्या कार्याची महती सांगावी.
सर्वांनी उपस्थित राहून उपकृत केल्याप्रित्यर्थ आभार प्रदर्शन करावे.
साहेब लोकांचे उत्तम आतिथ्याबद्दल आशिर्वाद घ्यावेत.
अशाने व्रताची सांगता करावी.

हे मित्रा दिनू, तु हे ’मीटिंग देवीचे’ व्रत अंगिकार, तुला मान सन्मान लाभेल, तुझ्या मनोकामना सिद्धीस जातील आणि तुला मानाचे स्थान लाभेल. दिनुने कृतकृत्य होत विनुला व्रताचरणाचे वचन दिले आणि ते दोघे मार्गस्थ झाले. दिनुने हे व्रत मनोभावे आचरले आणि त्याची भरभराट झाली.

मनोगतींनो, जशी विनुची झाली, दिनुची झाली तशी तुम्हा-आम्हा सर्वांची भरभराट होवो.

ही मीटिंग देवीची साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण!