नाही कुणी रे शापित

कधी येणारं वारं,
कधी जाणारं वारं,
नि देठाला अडकलेल्या,
पानांचा येरझारं |

अचानक थांबतो वारा,
आसामंत होई स्तब्ध,
सळसळणारी भिरभिरणारी,
पाने होती नि:शब्द |

शांततेत ह्या आहे,
एक अशांतता लपलेली
काळ येईल वादळाने,
नेइल फुले झोपलेली |

तरुआईच्या काळजातले,
भय कधीच संपत नाही
खोडामधील डोळ्यांमधून
ती शून्यामध्ये पाही |

अखेर आलाच तो वारा,
विखुरला सुवास,
देठ सुटले आता,
सुरू वेगळा प्रवास |

पानांच्या तळव्यांनी,
तरुआईचा निरोप,
अन पेंगूळलेल्या डोळ्यांचा,
आईवरचा आरोप |

दूर चाललेल्या फुलांना,
आई ने सांगितले गुपित,
" हा नियम विश्वाचा,
नाही कुणी रे शापित |

जा जा बाळांनो,
नका ओरडू आई आई,
तुम्ही आई होईपर्यंत,
ही धरणी तुमची दाई | "

 - अनुबंध