वाटते भले बुरे अता बरेच सारखे
होत राहते अशामुळे भलेच सारखे
जाउदेत, सोड राग, जाहले चुकून ते
सांग मी कुठे उगाळतो खरेच सारखे?
पाहिजे मिळायला शरीर वेगळे अता
येत राहते मनात तेच तेच सारखे
का मनासमोर वाट आखलीस तू अशी?
ठेच सारखी, नवेनवेच पेच सारखे
तीच ती सकाळ रोज वाटते नवी नवी
तेच लोक भासतात वेगळेच सारखे
उत्तरे कळून काय फायदा मला तसा?
भासतात प्रश्न उत्तरे लगेच सारखे!
वागतेस तू जशी तशीच ओळ जन्मते
गात राहते महत्त्व आपलेच सारखे