मुक्तक

सगळे झोपी गेल्यावर, माझा गांव कसा दिसत असेल?

हे पहायला मला चांदणं व्हावं लागेल,

आणि वाऱ्यासाठी उघड्या ठेवलेल्या खिडकीतून

आत शिरावं लागेल... झोपलेल्यांच्या स्वप्नात डोकावण्यासाठी !

त्रासदायक नसलेला माझा प्रकाश

उधळीत असेन मी मुक्तपणाने

घरांवर, देवळांवर, अंगणातल्या तुळस-प्राजक्तावर

आणि परसातून डोंगराकडल्या पायवाटेवर !

रात्रीच्या स्तब्ध शांततेत, जणू ध्यानालाच बसलेल्या

माझ्या गावाचं ते 'सुप्त' चैतन्य

मला प्रेरणा देत राहील, उद्याची !

आणि मग, पहाटे तांबडं फुटायच्या वेळी मला जावं लागेल!

सूर्याच्या नजरेतून,

जागा होत असलेला गांवही पहायला नको का?