पुस्तक परिचयः कालगणना

पुस्तक परिचयः कालगणना, लेखकः मोहन आपटे, राजहंस प्रकाशन,
आवृत्ती पहिलीः जुलै २००८, किंमतः रू. २००/- फक्त.

पंचांग आणि खगोलशास्त्र यांचा अतिशय घनिष्ट संबंध आहे. सूर्यनिर्मित ऋतुचक्र किंवा चंद्राचे कलाचक्र यांच्या संयोगानेच पंचांगांची रचना केली जाते. भारतीय पंचांगाचे नाते, आकाशाशी निरंतर जडलेले आहे. म्हणूनच त्यासारखे माहितीदायक पंचांग दुसरे नाही. विविध संस्कृतींनी निर्माण केलेल्या पंचांगांचा इतिहासही मनोरंजक आहे.

पाश्चात्य कालगणना, भारतीय पंचांग, पंचांग विज्ञान आणि अत्यंत उपयुक्त परिशिष्टे यांनी परिपूर्ण असे अद्ययावत पुस्तक सिद्ध करून मोहन आपटेंनी एक महत्त्वपूर्ण भर अर्वाचीन मराठी पुस्तकांत घातलेली आहे.

भारतीय पंचांगातील तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण यांच्या सुटसुटीत व्याख्या; सायन-निरयन पद्धतींची सोपी उकल; अमावस्यांत आणि पौर्णिमांत महिन्यांची रचना; तिथीच्या क्षय-वृद्धीच्या संकल्पना; अधिक व क्षय मासांच्या संकल्पना; आपापल्या स्थानांचे अक्षांश प्रत्यक्षात सूर्याच्या प्रकाशात पडलेल्या सावलीच्या साहाय्याने कसे काढायचे ही माहिती; तसेच अगदी आण्विक कालमापनापर्यंत कालगणनेचे सर्वच पैलू उत्तमरीत्या, तपशीलवार हाताळलेले असल्याने हे एक संदर्भ पुस्तक झालेले आहे.

यात एक सिर्कार्डियन (लॅटीन भाषेत सिर्का=विषयी, डिएम=दिवस) घड्याळ दिलेले आहे. आपल्या शारीरिक 'दिवसाविषयी' माहिती त्यात दिलेली आहे. कुठलाही संदर्भ न देता ते म्हणतात की शास्त्रज्ञांच्या मतानुसार 'दिवसविषयक घड्याळ' खालीलप्रमाणे असते.

रात्रौ ९:००: मेलॅटोनीन उत्प्रेरकाचाचे स्त्रवणे सुरू
रात्रौ १०:३०: मलमूत्र-विसर्जनाच्या अवयवांचे कार्य स्थगित
रात्रौ १२:००: मध्यरात्र
रात्रौ २:००: अतिगाढ झोप
पहाटे ४:३०: शरीराचे तापमान न्यूनतम
पहाटे ६:००: प्रातःकाल
सकाळी ६:४५: रक्तदाबात अचानक वाढ
सकाळी ७:३०: मेलॅटोनीन उत्प्रेरकाचाचे स्त्रवणे बंद
सकाळी ८:३०: मलमूत्र-विसर्जनाच्या अवयवांचे कार्य पुन्हा सुरू
सकाळी १०:००: उच्चतम सावधानता
दुपारी १२:००: मध्यान्ह
दुपारी २:३०: उच्चतम शारीरिक सहकार्य
दुपारी ३:३०: जलद क्रियाशीलता
दुपारी ५:००: रक्ताभिसरणक्रिया कार्यक्षम, स्नायूंची ताकद उच्चतम
सायं ६:००: सायंकाळ
सायं ६:३०: उच्चतम रक्तदाब
सायं ७:००: शारीरिक तापमान उच्चतम
रात्रौ ९:००: मेलॅटोनीन उत्प्रेरकाचाचे स्त्रवणे पुन्हा सुरू

मला ही माहिती फारच सुरस वाटली. डॉक्टरकडे सकाळी जातो की संध्याकाळी यावरही रक्तदाबाचे प्रमाण बदलते या अनुभवावर याने शिक्कामोर्तबच होते.

पुस्तक मनोरंजक तसेच माहितीपूर्ण आहे. अवश्य वाचावे. कालगणनेत रुची असणाऱ्यांनी संग्रही बाळगावे इतके ते चांगले आहे.