हा कवी झाला कशाला....!

आमची प्रेरणा खोडसाळ यांची रचना (शब्द मी आहे असा...! ) आणि
प्रदीप कुलकर्णी यांची सुरेख कविता शब्द मी आहे असा....!

............................................
हा कवी झाला कशाला....!
............................................

अर्थ अमुच्या 'वाहवा'चा लावला भलताच  केला!
आणि हा आता बघा की, पुर्ण शेफारून गेला!

हा कवी झाला कशाला, नेहमी वाटून जाते...
शेवटी ऱ्हासास याला याच कवितेनेच नेला!

वाचकांचे  या कवीने ऐकले नाही कधीही....
हा जरासुद्धा न थांबे वाटतो पुरता हटेला!

खेळ याचा चालतो हा रोज यमके जुळवण्याचा...
आणि मग  नशिबात अमुच्या रोज या मेल्यास झेला!

रोजच्या रट्टाळ कविता जाहल्या याच्या नकोशा...
रोज आतंकामुळे या सुन्न मेंदूचा तबेला!

स्पष्ट याला कैकदा सांगून झाले पण  तरीही....
रोज नेमाने बघा हा पाडतो ठरवून मेला!

रोज तू आम्हास का छळतोस या जाला वरी रे...
वाटतो "केश्या" अरे तू,  त्या कवीश्रींचाच चेला!

- केशवसुमार

............................................
रचनाकाल ः १५ एप्रिल २००९
............................................