मैत्री

मूळ इंग्रजी कथा कुठे वाचली होती ते स्मरत नाही. मनाला वाचताक्षणी भिडली. मूळ कथा माझ्याजवळ नसल्याने जमेल तसा आठवून स्वैर अनुवाद केला आहे.


                                      - वरुण.


ही कथा आहे दोन मित्रांच्या मैत्रीची. कथेखातर त्यांना नावे देऊ,अमित आणि अरविंद.


बालपणा पासुनचे जीवश्च कंठ्श्च मित्र. शालेय शिक्षण जसे एकत्र एकाच बाकावर बसून तसेच पुढे महाविद्यालयीन शिक्षणही एकत्र. कोणाचीही दृष्ट लागावी अशी अतूट निरपेक्ष मैत्री. दोघांचीही शिक्षण संपल्यावर देशसेवेसाठी लष्करात भरती होण्याची महत्त्वाकांक्षा. बुद्धिमत्ता आणी शरीरयष्टीच्या बळावर दोघेही लष्करात भरती होतात.


योगायोगाने लष्कराच्या एकाच तुकडी मध्ये दोघानंही प्रवेश मिळतो. दिवसागणीक मैत्री अधिक दृढ होत चाललेली असते. अशापरिस्थित देशावर अरिष्ट येऊन युद्धाचे ढग जमा होऊ लागतात आणी कोणत्याही क्षणी युद्धाचा भडका उडण्याची शक्यता निर्माण होते.


दोन्हिदेशामधे चाललेल्या वाटाघाटी फ़िसकटत जाऊन अखेर शेजारी राष्ट्राशी घमासान युद्ध सुरू होते. अमित आणि अरविंद एकाच तुकडीमध्ये असल्याने युध्धभुमिवरही एकाच आघाडीवर नियुक्ति होते. दोन्हिबाजुने रोजची तुफान धुमश्चक्रि चालू असते. अश्यांतच तो दिवस उजाडतो...


अमित अरविंद ची तुकडी शत्रूने काबीज केलेला एक एक प्रांत प्रसंगी रक्ताचे पाट वाहवून आपल्या मातृभूमीकडे सुपूर्त करत जिगरबाजणे पुढे निघालेली असते. अचानक एकाठिकाणी शत्रूचा अंदाज काढणे कठिण होऊन बसते. दोन्हीकडून गोळीबार चालू असतो. शत्रूचा अचूक ठावठिकाणा काढणे अवघड होऊन बसते. कोणीतरी धाडसाने पुढे घुसणे हाच पर्याय उरतो. अमित क्षणाचाही विलंब न करत एकटे पुढे घुसण्याची वरिष्ठ अधिकाऱ्यास विनंती करतो. धोका जीव गमावण्याचा असल्याने वरिष्ठ आधीकारी परवानगी देण्यास साशंक असतात. अखेर अमितच्या जिद्दी स्वभावापुढे माघार घेऊन त्याला परवानगी देतात.


पूर्णं तुकडी अमितकडे श्वास रोखून पाहतं असते. अमित एक एक पाऊल सावधपणे उचलून शत्रूच्या दिशेने कुच करू लागतो. जेम तेम दहा वीस फूट अंतर चालून जातो आणी कुठुनशि एक बंदुकीची गोळी सुं...करत अचानक येते आणी अमितच्या मस्तकाचा अचूक वेध घेते. त्याच्या वाटचालीवर लक्ष ठेवून असणारी त्याची तुकडी क्षणभर स्तब्ध होऊन जाते. अरविंदच्या तर काळजाचा ठोका चुकतो. आपला जीवाभावाचा मित्र आपल्या समोर कोसळलेला पाहून त्याचा धीर खचू लागतो.


अमित जमीनीवर कोसळून, क्षिण आवाजात त्याला हाक मारत असतो. आतामात्र त्याला राहवत नाही धावत जाऊन अमितला  भेटण्यासाठी अरविंदचे मन आतुर होते. तो त्याच्याकडे धाव घेणार इतक्यात वरिष्ठ त्याला अडवतात. "गोळी मस्तकात लागली आहे, जीव वाचण्याची तीळमात्र शक्यता नाही.मी आत्ताच एक आधीकारी गमावला आहे मला अजून एका अधिकाऱ्याचा जीव पणास लावायचा नाही आहे!" वरिष्ठांचे तर्कास पटणारे परंतु मनास न पटणारे उत्तर.


अरविंदची प्रचंड द्विधा मनस्थिती. एकीकडे वरिष्ठांचा ठाम नकार, तर दुसरीकडे मित्राची क्षिण होत चाललेली हाक. मन सून्न होऊन जाते, मेंदू बधिर होऊन जातो आणी अचानक निर्णय घेतो, बस्स!! मला त्याच्या हाकेला प्रतिसाद दिलाच पाहिजे. प्राणाची आणी वरिष्ठांची पर्वा न करता तो अमितच्या दिशेने झेपावतो. अमितजणु त्याची वाटच पाहतं असल्याप्रमाणे त्यांला भेटताच दोन शब्द बोलून जगाचा निरोप घेतो. अरविंद विमनस्कपणे माघारी फिरतो.


वरिष्ठ त्याच्या ह्या कृतीचा जाब विचारतात, "मी आधीच कल्पना दिली होती, तो वाचणे अशक्य होते. विनाकारण तु तूझा जीव का धोक्यात घातलास?"


"त्याचे शेवटचे शब्द माझी भेट सार्थक ठरवून गेले." अरविंद


"असे काय म्हणाला तो?" वरिष्ठ


तो फक्त एवढेच म्हणाला,


             "अरविंद, मला खात्री होती तू येणार!!" 


 


                          * समाप्त *