पहिला पाऊस.

गच्च आभाळ आभाळ| गंध मातीला सुटला||
लेकरांच्या मायेपायी| पान्हा देवाले फुटला||

वारा खट्याळ खट्याळ| जणू घालितो पिंगा||
कानी शिरं वासरांच्या| झाडांशी करी दंगा||

अस्सा झाकोळ झाकोळ|सूर्य ढगानी झाकला||
शीण सारा उन्हाळ्याचा| झणी धरणीनं टाकला||

झाला कल्लोळ कल्लोळ|नाचे ईज तडातड||
बावरल्या पाखरानी| अंगं झाकली पानाआड||

झाली आंघोळ आंघोळ|सृष्टी सगळी ओलीचिंब||
कर्दळीच्या पानावर| मोत्यावानी झाले थेंब||

राहो अढळ अढळ| वरुणराजाची ही माया||
हात जोडी बळीराजा| शेत लागला पेराया||