रोजच्यासारखा ओढीनं घरी पोहोचलो
कसली एवढी गर्दी ? दारात थबकलो
वाट काढत शिरलो आत
वेगवेगळी चर्चा प्रत्येक कोपऱ्यात
मागे कोण कोण आहे ?
खातं कुठे कुठे आहे ?
घराचं काय करायचं ?
विमा कितिचा आहे ?
वगैरे वगैरे
काहीच कळेनासं झालंय
जमलेल्या गर्दीत
चेहरे मात्र कां वाटताहेत
सारेच ओळखीचे ?
शेजाऱ्यांचे, मित्रांचे,
आईचा, बायकोचा,
मुलांचे आणि नातेवाईकांचे
सापडलं शेवटी
साऱ्या प्रश्नांचं उत्तर
खोलीच्या मध्यावर
झाकून ठेवलेल्या देहाचा
चादरीतून डोकावणारा चेहरा
ओळखीचा वाटला
हुबेहुब तोच, जो सकाळीच
आरशात होता भेटला
तेव्हा आलं लक्षात
माझं शरीराबाहेर फिरणं
शरीरानं साथ सोडताच
जन्मभराच्या दिशाहीन वणवणीचा
थकवा जाणवतोय
सारे विधी आटपेपर्यंत
चितेजवळच्या झाडावर
थोडी विश्रांती घ्यावी म्हणतोय
म्हणजे निघता येईल
पुढच्या प्रवासाला
ताजंतवानं होऊन