मेरीची डायरी

डीसूजाने सिगारेट विझवली. कंटाळा आला म्हणून. देवापुढे मेणबत्ती लावली. ते सुद्धा एक कर्तव्य म्हणून. मेरी लावायची म्हणून. मेरीला आपण भकाभका सिगारेटी ओढतो ते बिलकूल आवडायचं नाही. आणि ती चिडते म्हणून आपण मुद्दाम ओढायचो तिच्या समोरच. तिच्या अंगावर धूर सोडत. मग तिला खोकल्याची उबळ यायची. डोळ्यातून पाणी काढत खोकायची. रागावून लटकी चापट मारायची. आपण तिला जवळ घ्यायचो तिच्या खोकून ताज्या मधासारख्या गालावर हात फिरवायचो. ती झिडकारायची पण तिला ते आवडत असणारच. डीसूझाला अप्रूप वाटलं. चांगला ३ वर्ष संसार केला आपण मेरी बरोबर. पण तिचा एकही गुण आपल्याला कसा लागला नाही. तिचा नीटनेटके पणा, तिच सुबक राहणं, तिच बोलणं, तिच वागणं. काही म्हणजे काहीच कस आपल्याला लागलं नाही. नाहीतर आपण वेंधळट, रासवट. तिला शोभेसे नव्हतोच आपण. अगदी विजोड जोडा. म्हणून तर....
.
घरातल्या प्रत्येक गोष्टीवर मेरीची आठवण दाटून राहिलीये. तिने सजवलेलं कपाट, तीन कुण्या नातेवाईकाला सांगून आणवलेला काश्मिरी गालिचा. तिची नीटनेटकी खोली. तिच्या कपड्यांना अजून तिचा गंध चिकटलाय. सहज गंमत म्हणून त्यानं तिच्या कपाटातला एक ड्रेस काढला. तिच्या कपाटाला, तिच्या वस्तूंना हात लावलेला तिला बिलकूल खपायचं नाही. मग अशी चिडायची ती. डीसूझाला हसायला आलं. कडवट औषधाची चव जिभेवर रेंगाळावी तसं. कडूशार हसू. आता आयुष्याची चव कडवट झालीये. उरलाय तो फक्त एकटेपणा. नाही म्हणायला तो शेजारचा डॉक्टर दामले येतो कधीतरी. पाहुणचाराला. तसा आधीही यायचा आपल्या आणि मेरीबरोबर गप्पा ठोकायला. पण आता येतो तो एखादा उपचार म्हणून. नको नको म्हणताना कॉफी करून देतो मला. इकडच्या तिकडच्या गोष्टी करतो. जुन्या आठवणी काढत बसतो. नाहीतरी आता बोलायला उरलंय काय वेगळं.
.
मेरीला दैनंदिनी लिहायची सवय होती. आपण तिची चेष्टा करायचो. म्हणायचो काय लिहिण्यासारखं असत त्यात. आज काय तर म्हणे उशीरा उठले, भाजीवाल्याने भाजी स्वस्त दिली, आज डीसूझा लवकर घरी आले. असलंच काहीतरी नॉन्सेन्स. इडियट सारखं. कधीतरी तिची वही लपवून ठेवायचो. मग ती घरभर शोधत राहायची. मग आपण तिच लक्ष नाही बघून हळूच मूळ जागेवर ठेवून द्यायचो. आणि वही सापडली की एखाद्या लहान मुलीसारखे तिचे डोळे चमकायचे. दामले म्हणायचा सुद्धा लेका डीसूजा तुझ्यात एक लहान खोडकर मूल दडलंय. अगदी खरं. आता बघूया का तिची वही. ती म्हणायची की अशी दुसऱ्यांची वही चोरून वाचू नये. पण आता काय फरक पडणार आहे. तेवढाच मनाला उद्योग.
.
दिनांक सोळा एप्रिल : आज सकाळीच उठून पॅन केक केला. डीसूजांना खूप आवडतो. कॉफी बरोबर पॅन केक आणि न्यूज पेपर मिळाला की बास काही विचारायला नको.
.
दिनांक बारा मे : आज डीसूजांनी माझी वही लपवून ठेवलेली. त्यांना वाटलं मला कळणारच नाही म्हणून. पण कळते बरं मला अशी खोडी.
.
दिनांक सोळा जून : आज रात्री दामले आलेले गप्पांना. डीसूजा मी, आणि दामलेंनी खूप गप्पा केल्या. खूप छान वाटलं खूप खूप बोलल्यावर.
.
डीसूजा पान चाळत राहिला. दिनांक सव्वीस जुलै. म्हणजे आपल्या त्या लाँग ड्राइव्ह ची आधीची रात्र. कुठून आपण ही वही वाचायला काढली अस डीसूजाला झालं. खपली धरलेल्या जखमेवरची खपली कुणीतरी ओरबाडून काढावी आणि पुन्हा ती तांबडी भळभळीत जखम दिसू लागवी तसं काहीस.
.
दिनांक सव्वीस जुलै : आज मी खूप आनंदात आहे. उद्या मी आणि डीसूजा लाँग ड्राइव्हला जाणार आहोत. खूप दिवसांनंतर मनमुराद भटकणार आहोत.
.
डीसूजाला आठवत राहील. आपण आणि आपल्या गळ्यात हात घालून बसलेली मेरी. तिचा धुंद करणारा वास. तिचा प्रेमळ स्पर्श. थोडंसं धुकं होत. पण अश्या धुक्यात तर खरी मजा येते गाडी जोरात उडवायला. मेरी घाबरलीये आपल्याला अधिकच बिलगून बसलीये. इतक्यात समोर दिसणारा तो ट्रक. कसलासा माल नेणारा. अचानक त्याचा वेग मंदावलाय. आपण वेगात आहोत. लवकर वेग कमी करायला हवाय. आपण जोरात ब्रेक्स दाबलेत. आता गाडी थांबायला हवीये. पण हे काय गाडी थांबत का नाहीये. त्या रस्त्यावर पडलेल्या डिझेल ने घात केलाय. गाडीची चाक रस्त्याची ग्रीपच घेत नाहीये. ब्रेक लावून उपयोग नाहीये. आता फक्त वाट बघायची गाडी ट्रकला धडकायची. मग पुढचं काही नीटसं आठवत नाहीये. थोडंसं आठवतंय ते भेदरलेली किंचाळणारी मेरी, जोरात बसलेला हिसका, गाडीच्या फुटलेल्या काचा, आगीचा भडका आणि डोक्यात बसलेला कसलातरी जबरदस्त फटका. शुद्धीवर आलो तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा दिसला तो डॉक्टर दामले आपल्याकडे बघतोय. आणि मेरी कुठाय. ती का दिसत नाहीये कुठेच. आपण दामलेला विचारतोय मेरी बद्दल. दामले काहीतरी सांगतोय पण ते आपल्याला कळतच नाहीये. आपण ऐकतोय पण डोक्यातच शिरत नाहीये तो काय बोलतोय ते. आपले डोळे पुन्हा मिटताहेत.
.
डीसूजा आठवत राहतोय. तो भयानक अपघात, त्यात आपले निकामी झालेले पाय, आणि मेरी? दामले सांगतोय मेरी त्या आगीत जळाली. जळून कोळसा झाली, अगदी ओळखता न येण्या-इतपत विद्रूप झाली. आपण मात्र त्या अपघातातून आश्चर्य कारक रित्या वाचलो. २ आठवडे कोमात होतो म्हणे. आता उरल्या आहेत त्या मेरीच्या आठवणी आणि हे दोन अधू पाय भूतकाळाची साक्ष देणारे.
.
वाऱ्यावर वहीची पान फडफडताहेत. आणि ते काय आहे. पाहिल्यासारखं वाटतंय काहीतरी. पण हे कस शक्य आहे. भास म्हणायचा का? का मनाचे वेडे खेळ. त्या वहीत पुढे काहीतरी लिहिलंय का?
.
दिनांक दोन सप्टेंबर : डीसूजा मला तुम्ही असे कसे हो सोडून गेलात? इतकी वर्ष सवय झालीये तुमची. तुम्ही कुठे आहात कसे आहात.
.
डीसूजा वीज पडल्यासारखा चमकला. अगदी अस्पष्ट कष्टाने लिहिल्या सारखं लिहिलंय. पण कुणी लिहिलंय हे? मेरीने? पण हे कस शक्य आहे? ती तर? बापरे देवा हा काय खेळ चालवलाहेस? का आपल्याला वेड लागतंय?
.
आज दामले येऊन गेला. आपण त्याला ती वही दाखवली. त्या तारखेला लिहिलेलं अजूनही आपल्याला दिसतंय. मग दामले अस का म्हणाला. त्याला काहीच दिसत नाहीये म्हणून. का ते फक्त आपल्यालाच दिसतंय? मेरी जिथे कुठेही आहे आपल्याशी संवाद साधू इच्छितेय. डीसूजाच्या अंगावर शहारा आला. मेरीच माझ्यावर अजूनही प्रेम आहे. आणि ती वहीच आता आमच्या दोघातलं संवादच साधन आहे.
.
दिनांक आठ सप्टेंबर : डीसूजा मला खूप एकटं वाटतंय हो. कधी एकदा तुम्हाला भेटतेय अस झालंय. इथे मला बिलकूल करमत नाहीये तुमच्याशिवाय. मला भेटणार ना लवकर.
.
अगदी अस्पष्ट लिहिलंय. माझी मेरी खूप त्रासात आहे. तिला माझी कमतरता जाणवतेय. तिला एकटीला पडू देता कामा नये. तिला लवकर भेटायला हवंय. पण कस? कस? ती माझ्या जगात येऊ शकत नाही हे तर नक्की. मग? मग? मग काय झालं? मी तर तिच्या जगात जाऊ शकतो ना. तिच्या साठी एवढं करायला हवंय. मगाशी ती सफरचंद कापायला म्हणून सुरी आणली होती दामलेने ती तो टेबलावरच विसरलाय. मी भर्रकन ती सुरी उचललीये आणि सर्रकन मनगटावरून फिरवलीये. रक्ताची धार मला दिसतेय. तांबडं भडक रक्त. हे वाहणार रक्तच मला मेरी कडे घेऊन जाणारै. माझ्या डोळ्यासमोरचा प्रकाश अंधुक होतोय, माझी शुद्ध हरपतेय. मी आता मेरीला भेटणार आहे. लवकर लगेच आत्ताच.....
.
दोन आठवड्यानंतर दामले त्याच्या आऊट हाउस वर दारूचे पेग भरत होता. एक स्वतःसाठी आणि दुसरा त्याच्या लाडक्या मेरी साठी. आता त्या दोघांना लपून भेटावं लागणार नव्हत. त्यासाठी दोघांनी अगदी शिताफीने प्लॅन आखलेला. डीसूजा त्याच्या सापळ्यात अलगद अडकला. मेरी चा मृत्यू तो सहन करू शकला नाही. आणि डीसूजाला भेटायला जाऊन दामले मोठ्या शिताफीने ती वही बदलत होता. त्याने सांगितल्या प्रमाणे मेरी वहीत लिहीत गेली. आता तिच वही मेरीच्या हातात होती. ही वही आता फक्त नष्ट करायची म्हणजे शेवटचा पुरावाही नाहीसा करायचा. मग आपल्याला कधीच कुणी पकडू शकत नाही. दामले स्वतःवरच खूश होता. तो ओरडला चीयर्स फॉर अवर सक्सेस. मेरी हसली. तिनेही ग्लास उचलला. इतक्यात जोराचा वारा आला आणि वहीची पान फडफडली. तीन वाचलं..
दिनांक बावीस सप्टेंबर : मेरी तू कुठे आहेस? मला तुझी आठवण येतेय. खूप एकटं वाटतंय. तुला लवकर भेटायचंय. तुझा डीसूजा.