ह्यासोबत
मावशीच्या घरी पोचल्यावर आईला कंठ फुटला.आणि तिच्या माहेरचा सगळा इतिहास तिच्याच तोंडून ऐकायला मिळाला.त्याच्यापूर्वी आम्हाला या गोष्टी कळल्या नव्हत्या त्या या निमित्ताने बाहेर आल्या.ती अगदी लहान असतानाच तिचे आईवडील मरण पावले होते आणि तिच्या आज्जीने या तीन नातवंडांचा सांभाळ केला होता.आजी मोठी जहांबाज बाई होती.एकटी घोड्यावर बसून खंड वसूल करायची.तिचे घराणे म्हणजे गावातले अगदी तालेवार घर.मोठी शेती.वर्षाला दहावीस खंडी धान्य सहजच घरात यायचे.आंबा, पेरूची झाडेही होती.
आजीने मोठ्या बहादुरीने सगळा कारभार संभाळून मोठ्या लेकीला म्हणजे मावशीला गावातलेच तसेच मोठे देशपांड्यांच घर बघून दिले होते.त्यावेळी ते घर माणसांनी गजबजलेले आणि खाऊन पिऊन सुखी होते.आईला माणसांची फार हौस आणि मावशीच्या लग्नानंतर घरात आता ती स्वत: ,म्हातारी आजी आणि मामा अशी तीनच माणसे उरली. त्यामुळे आपल्या बहिणीकडे त्या भरलेल्या घरात रहायला तिला खूप बरे वाटायचे आणि तेथून आपल्या भयाण इनमिन तीनच माणस असलेल्या घरात परत यायच तिच्या अगदी जिवावर यायच.पुढ आई नेहमी म्हणायची "मला माणसाची हौस फार, देवान ती अगदी पुरेपूर भागवली." कारण तिला एक नव्हे दोन नव्हे तर चांगली दहा मुले देवान दिली आणि त्यातली आठ जगली सुद्धा !
आजीन आपल्या मुलाच म्हणजे मामाचही लग्न अगदी थाटात लावून दिल.पण खर तर जी मुलगी माहितीतली म्हणून तिन पसंत केली तिला लग्न होताच जणु दृष्टच लागली.आणि ती खंगू लागली.खरतर तिला लग्नापूर्वीच क्षयाची बाधा होती पण ही गोष्ट येरगट्टीकरांनी (तिचे माहेरच आडनाव) आजी पासून लपवून ठेवली होती. थोड्याच दिवसात ती पालीसारखी पांढरीफट्ट पडली आणि लग्नानंतर थोड्याच दिवसात तिन राम म्हटला.आईचे घराणे वारकऱ्याच.घरातील पुरुषांची आषाढी कार्तिकी कधी चुकली नाही.तसा मामाही प्रत्येक वारी करायचा,त्याची ही बायको वारल्यानंतर तो वारीला गेला.मामा म्हणजे अगदी भोळा सांब आणि तिथच काळ्या मामीच्या आई वडिलांनी त्याला " ह्यो ह्यो ह्यो पाव्हणा बरा दिसतोय" असे हेरले आणि त्याच्या तावडीत सापडलेला मामा चतुर्भुज होऊनच घरी आला बरोबर काळी मामी होतीच.तिला पाहून आजीन हायच खाल्ली.शेवटपर्यंत ती म्हणायची "येरगट्ट्यान येरगटल आणि दंडवत्यान (काळ्या मामीच माहेर) गंडवल."
तरी तशाही परिस्थितीत तिने माझ्या आईचे लग्न करून देण्याचे आपले शेवटचे कर्तव्य यथाशक्ती पार पाडले,पण तोवेळपर्यंत मामासाहेब पूर्णपणे बायकोच्या कह्यात गेलेले असल्यामुळे लग्नात आईच्या अंगावर चढवलेले सगळे दागिने सोनाराकडून जरा दुरुस्त करून देतो असे वडलांना सांगून दुसऱ्याच दिवशी त्याने काढून घेतले.आईच्या आजीन खूप हातपाय आपटले पण त्यानंतर ते परत कधीच कोणाच्याच दृष्टीला पडले नाहीत. दादाना म्हणजे माझ्या वडिलांना त्यांचा मोह नव्हताच पण त्यानंतर आजीने जे अंथरूण धरले ते परत कधी न उठण्यासाठीच.
मावशीच घर भरलेल होत पण आता त्याची अवस्था बडा घर पोकळ वासा अशी झाली होती.तरी अगदीच खाण्यापिण्याची ददात होती अशातला भाग नव्हता.मावशीचे यजमान लोक त्याना भाऊराव म्हणत शेतीच करून रहात होते त्यामुळे शिक्षण बेताचेच.पण माणूस मोठा दणदणीत शरीरयष्टीचा.अगदी उंचापुरा.मावशीला दोन मुलगे एक मला भेटलेला सुधाकर आणि दुसरा त्याचा मोठा भाऊ बाळ.
एकदा भाऊराव काहीतरी कामासाठी आमच्या गावी आले आणि दुपारी अकरा बाराच्या सुमारास आमच्या घरात शिरले.जेवण करायचा आग्रह वडिलांनी केल्यावर "आत्ता येतो तळ्यावरून अंघोळ करून" म्हणून पंचा घेऊन एकटेच तळ्यावर अंघोळीला म्हणून गेले.आमच्या गावचे तळे बरेच मोठे आहे.तळ्याच्या मध्यभागी एक खांब रोवलेला आहे.पट्टीचे पोहणारे या खांबाला हात न लाबता दुसऱ्या काठाला जायचे.आमच्यासारखे नवशिके धापा टाकत खांबापर्यंत पोचून तिथे जरा विश्रांती घेऊन परत फिरायचे.त्यादिवशी भाउरावांनी पोहण्यासाठी तळ्यात उडी मारली आणि सपासप आडवे हात मारत ते खांबापर्यंत पोचले आणि तेथूनच ते ओरडू लागले," वाचवा वाचवा कुणीतरी ओढतेय मला " आपल्या गावातच नव्हे तर अगदी आमच्या गाबी पण भाऊराव पट्टीचे पोहणारे म्हणून प्रसिद्ध ! त्यामुळे ते उगीचच ओरडत आहेत,थट्टाच करत आहेत असा सगळ्यांचा समज झाला आणि बघताबघता सगळ्यांच्यासमोर ते तळ्यात बुडाले आणि मग पहाणारे लोक भानावर आले आणि सगळ्यानी बुड्या मारून शोध घेतला पण तोपर्यंत फार उशीर झाला होता.एका क्षणात होत्याचे नव्हते झाले.बाहेर काढून चाकावर घालून फिरवून पाहिले पण काही उपयोग झाला नाही.
आमच्या घरी कुणीतरी सांगत आले,"भाऊराव बुडाले" आईचा विश्वासच बसेना.वडील तळ्यावर जाऊन पहातात तो काय खरेच एवढ्या तगड्या पुरुषाचे निर्जीव शरीरच लोकांनी तळ्याबाहेर काढून ठेवलेले त्यांना पहायला मिळाले. वडील जेवण करून जा असा आग्रह करत असताना जणु मरण बोलावत असल्यासारखे ते तळ्यावर गेले होते.
नवऱ्याच्या अशा अकाली जाण्यामुळे मावशी पार खचून गेली आणि ते घरही पारच खचले.भाउरावांना एक भाऊ होता पण तो गावी रहायला उत्सुक नव्हता.त्याने लग्नही केले नव्हते.तो नेहमी पुण्यातच रहात असे.कुणीतरी मावशीला त्याच्याशी लग्न करून घेण्याचे सुचवले पण तिच्या कोष्टकात ती गोष्ट बसत नव्हती आणि तिच्या दिरालाही लग्नात फारसे स्वारस्य नव्हते.त्यामुळे एकेकाळी भरलेला तो वाडा आम्ही गेलो तेव्हां अगदी ओसाड पडलेला होता. मावशी आणि तिचे दोन मुलगे एवढीच माणसे त्या भल्यामोठ्या वाड्यात रहात होती.
भाउराव हा एकमेव कर्ता पुरुषच गेल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांची अगदी अन्नान्न दशा झाली होती.गावातच मावशीचा सख्खा भाऊ असताना त्याच्या घरात शिळे अन्न गुरांना खायला मिळत होते पण आपल्या भाच्यांना दोन वेळची भाकरी देण्याची दानत मात्र त्या गृहस्थात नव्हती.त्यामुळे मावशीकडे गेल्यावर पहिल्यादा सगळ्यांसाठीच गहू,तांदूळ,दाळ अशा सगळ्या वस्तू विकत आणूनच आम्हाला स्वयंपाकाला सुरवात करावी लागली.
एक दोन दिवसातच बैलगाडीची व्यवस्था झाली आणि आम्ही निघणार होतो.मधल्या काळात मामाला मात्र आपली बहीण मुद्दाम आपल्याला भेटायला आली होती ,बायकोच्या धाकाने आपण तिला जवळ जवळ घराबाहेरच काढले तरी तिला एकदा भेटावे अस मात्र मुळीच वाटले नाही,मग नेहमीच गावात असणाऱ्या बहिणीची तर विचारपूस करण्याचे दूरच राहिले.त्यामुळे मावशीला गावात राहून सगळ्यांनाच टाचा घासत मरावे लागेल अशी परिस्थिती दिसत असल्याने आईने " मग तू इथे राहून काय करणार आहेस चल आमच्याबरोबर" असे म्हटले. आणि तीही लगेच तयार झाली.
मावशीची दयनीय स्थिती पाहून कोणाही सहृदय माणसाला तिच्यासाठी काहीतरी करावे असेच वाटले असते पण आमचीही परिस्थिती फार उत्तम होती अशातला भाग नव्हता.आणि माझे वडीलही काही बायकोच्या हो ला हो करणारे नव्हते मात्र आतापर्यंत आपल्या घासातला घास काढून त्यांनी आपल्या बहिणींना आणि भाच्यांना जमेल ती मदत केलेली आईने पाहिले होते आणि त्यावेळी तिनेही त्याना यथाशक्ती हातभार लावला होता म्हणूनच वडिलांनाही एवढी मोठी जबाबदारी घेण्यास भाग पाडण्याचे धाडस तिने केले.
आमच्याबरोबर गावी आणून मावशी आणि तिच्या दोन मुलांचे काय करायचे याविषयी आई आणि दादा यांनी काय ठरवले होते कुणास ठाउक,कारण आमच्याही घरात आणखी तीन माणस खपणार होती अशातला भाग नव्हता.आम्ही त्यावेळी गावाच्या एका टोकास असणाऱ्या देशमुख वाड्यात रहात होतो त्याच्या जवळच एक खोलीत आईने आपल्या बहिणीचा संसार थाटून दिला.गावातील एक श्रीमंत जमीनदार कुटुंबात आमच्याही कुटुंबाचे जरा वजन होते त्यांच्या घरी मावशीला आणि तिच्या मुलांना वरकड कामासाठी ठेवून घ्यायचे त्यांनी कबूल केले आणि ते तीन जणांचे कुटुंब गावात सामावून गेले.
सुधाकर शाळेत जाऊ लागला.बाळने सातवीची परीक्षा द्यावी त्यावेळी तिला व्ह. फा. म्हणत आणि ती पास झाल्यावर गावातीलच प्राथमिक शिक्षक शिक्षण महाविद्यालयात जाऊन दोन वर्षाचे प्रशिक्षण पार पाडून शिक्षक व्हावे असे ठरले.त्याच वेळी बाळला इंग्रजी शिकवण्याची काय दुर्बुद्धी दादांना सुचली कोण जाणे.शाळेत उत्तम शिक्षक म्हणून प्रसिद्ध असले तरी असे एका विद्यार्थ्याला घेऊन शिकवण्याचा त्यांचा पिंड नव्हता पण त्यावेळी त्यांच्याकडे मिलिटरीतील एक गृहस्थ इंग्रजी आणि गणित शिकायला येत होते.या गृहस्थांचे कौतुक म्हणजे मिलिटरी पेशात असून वर्षातून एकदा मिळणाऱ्या सुट्टीचा सदुपयोग करावा म्हणून ते आमच्या गावापासून पाच सहा मैल अंतर रोज पायी तुडवत सकाळी आमच्या घरी नऊ वाजता येत.या शिक्षणाचा त्यांना काय उपयोग होणार होता कुणास ठाउक पण त्याचा वक्तशीरपणा आणि शिकण्याचा उत्साह वाखाणण्याजोगा होता.त्यांना शिकवतानाच बाळलाही थोडेबहुत शिकता आले तर पहावे असा दादांचा दृष्टिकोण.
पण बाळची परिस्थिती वेगळी होती.मामाकडे गुरे चारणे,त्यांची धार काढणे आणि इतर पडेल ती कामे करणे यातच त्या दोघाही भावांचा वेळ जात असे,त्यामुळे यापूर्वी शांतपणे शिकणे हे त्याना माहीतच नव्हते.याशिवाय मामाकडे उरलेला शिळा भाकरतुकडाच काय तो खायला मिळे आणि त्यांची पोटाचीही आबाळच झाली होती अर्थातच या सर्व गोष्टींचा दुष्परिणाम अगोदरच कमी असलेल्या बौद्धिक कुवतीवर होणे स्वाभाविकच होते.आणि अचानक मिळालेली ही संधी बाळला पेलवली नाही.त्याने ए,बी,सी,डी गिरवायला सुरवात केली आणि घाण्याला बांधलेल्या बैलासारखी त्याची बुद्धी त्याच वर्तुळात फिरू लागली ती बाहेरच पडेनाशी झाली.पहिले काही दिवस बाळला इंग्रजीचा चांगलाच नाद लागलाय असे सर्वांना वाटू लागल.पण खरी परिस्थिती वेगळीच होती तो जागचा उठेचना,सारखा ए,बी सी.डी गिरवत किंवा पुटपुटत राहू लागला.एकीकडे आपल्याला हे जमलेच पाहिजे ही तीव्र इच्छा आणि त्याच वेळी आपल्याला हे जमणार नाही याचा त्याने धसका घेतला की काय कुणास ठाऊक. मावशीला आत्ता कोठे जरा माणसात आल्यासारखे वाटत होते,दोन वेळा पोटभर अन्न मिळू लागले होते तेवढ्यात तिच्या कम नशीबाने पुन्हा उचल घेतली आणि थोड्याच दिवसात बाळ ठार वेडा झाला.
त्यातल्या त्यात सुधाकर तरी व्यवस्थित शाळेत जाऊ लागला होता एवढीच काय ती समाधानाची बाब. ज्या जमीनदार कुटुंबात मावशी कामाला म्हणून जाई ती माणसे खरच स्वभावाने चांगली.त्यानी तिन्ही माणसांना ती फारशी कामाची नसली तरी कुरकुर न करता संभाळले होते. कारण बाळला वेड लागल्याने मावशीचा जास्त वेळ त्याची काळजी घेण्यातच जाऊ लागला. सुधाकरचा बराच वेळ शाळेतच जात असे.मात्र ही तिन्ही माणसे प्रामाणिकपणाचा कळस होती.म्हणजे अगदी भुकेने जीव कंठाशी आला आणि समोर अन्न दिसत असले तरी कोणी घ्यायला सांगितल्याशिवाय हात लावणार नाहीत.या त्यांच्या एकाच गुणामुळे ती बहुतेक तेथे टिकली असावीत.
मावशी आणि आई यांनी बरेच उपाय केले,गावातले डॉक्टर,वैद्य,मांत्रिक असे जे जे काही उपाय करणे शक्य होते ते ते त्या दोघींनी केले आणि हळूहळू बाळ शहाण्यासारखा बोलू लागला वागू लागला.पण नंतर त्याला शिकवण्याच्या फंदात दादा पडले नाहीत.कामाची त्याला चांगलीच आवड होती आणि संवयही त्यामुळे शेतीच्या कामालाही तो उपयोगी होता.हे जमीनदारांच्या पथ्यावर पडले.त्यांच्या शेतीच्या कामाला तो चांगली मदत करायचा.
.सुधाकरने कण्हत कुथत नववीपर्यंत मजल मारली.तो माझ्यापेक्षा वयान मोठा होता पण गावी असताना शिक्षणाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे शाळेत मात्र तो एक इयत्ता माझ्यामागे होता.त्याचा एक फायदा असा झाला की त्याला माझी पुस्तके उपयोगी पडू लागली.आपले गाव सोडून मावशी आमच्या गावात बरीच रुळली.जवळ जवळ दहा वर्षे अशी काढल्यावर मावशीला परत गावाकडे जावेसे वाटू लागले.मी शिक्षणासाठी पुण्यास गेलो असतानाच त्यांनी पुन्हा मायणीस जाण्याचा निर्णय घेतला,पुन्हा आम्ही आपल्या व्यापात दंग झालो आणि भावाकडे परत जाण्याची आईलाच इच्छा उरलेली नसल्यामुळे आमचा तेथे जाण्याचा काहीच संबंध उरला नाही.
मावशी मायणीत परत गेल्यावर पुन्हा जणु ती आमच्यासाठी नसल्यासारखीच झाली.त्यामुळे नंतर मलाही कधी असोशीने आजोळी जाऊन मावशी बाळ आणि सुधाकर यांची गाठ घ्यावी असे वाटले नाही.
मामाकडे जावे असे आईलाच वाटत नव्हते तर आम्हाला वाटण्याचा संबंधच नव्हता,पण तरीही मोठ्या बहिणीच्या लग्नात आठवण ठेवून आईने भावाला पत्रिका पाठवली आणि आश्चर्य म्हणजे सगळे विसरून ती दोघेही लग्नासाठी आली.तोपर्यंत त्या दोघानाही मूलबाळ नव्हतेच आणि आता होण्याची शक्यताही नव्हती.पण मजा म्हणजे त्यानंतर दोनच वर्षानी मी पुण्यात शिकत असताना मामा,मामी बहिणीकडे म्हणजे आमच्याकडे आले होते ,पण आईकडून जे कळले ते आश्चर्यकारक होते म्हणजे यावेळी त्यांच्याबरोबर काळ्या मामीची मुलगी शोभावी अशी आणखी एक बाई होती आणि ती मामाची तिसरी बायको होती.आणि ती काळ्यामामीशी अगदी सुनेने वागावे अशा आदबीने वागत होती. या तिसऱ्या मामीलाही काही मूल झालेच नाही.एकूण बहिणीची मुले आणि बहीण उपाशी रहात असताना मामाने मात्र तीनदा संसार थाटला
मधल्या काळात बाळचे लग्नही झाले पण त्यालाही आमच्यापैकी कोणीही गेले नाही.आता तो थोडीफार शेती आणि शिंपीकाम करत होता असे ऐकिवात होते.सुधाकर काय करतो याविषयी काही पत्ता नव्हता.पण मी मुंबईत बहिणीच्या घरी राहून नोकरीच्या खटपटीत असताना अचानक एक दिवस तो तिला भेटायला आला.चांगला दिसत होता कुठल्यातरी कंपनीत त्याला बऱ्यापैकी नोकरी मिळाली होती.मावशीही गावी बरी आहे हे कळल्यावर बरे वाटले.काही का असेना मावशीचे गाडे रुळाला लागले असे वाटून आईलाही बरे वाटले.
पण एकाद्याचे नशीब कसे असते पहा.सुधाकर मुंबईत नोकरी करून बऱ्यापैकी कमावत होता.पण एकदिवस लोकलमध्ये प्रवास करताना आपल्याला काय झाले हे त्याचे त्यालाच काही कळले नाही आणि त्याच्या अंगावरचे कपडे आणि खिशातले सर्व पैसे,हातातले घड्याळ अशा सर्व वस्तू कोणीतरी काढून घेतल्या आणि तो प्लॅटफॉर्मवर पडलेला कोणालातरी आढळला.पुन्हा एकदा मावशीला दुर्दैवाने तडाखा दिला होता. सुधाकर मात्र पुन्हा काही सावरलाच नाही गावाकडेच परत गेला.आणि तेथेच राहिला.तेथे भावाबरोबरच काहीतरी रुटुखुटू करत राहिला.
पुढे काही दिवसानी सुधाकरच्याही लग्नाची पत्रिका आली,आणि जायचा माझा विचार आईनेच खोडून काढला आणि त्यानंतर कोणाचीच गाठ पडली नाही.कधी कुणाचे पत्र नाही की लग्नाकार्यात भेटी नाहीत.खरे तर आमया गावापासून मामाचे गाव खूपच जवळ होते, आणी आता तर बसने अगदी तासदीड तासात जाणे शक्य झाले होते. पण त्यांचा ऋणानुबंधच जणू तेवढाच होता.
.एक दिवस मावशी निधन पावल्याचे पत्र औरंगाबादला आले आणि त्यानंतर एक दिवस मामानीही राम म्हटल्याचे असेच उडत उडत कळले आणि डोळे ओले करीत आईने " संपला माझा माहेरचा ऋणानुबंध !" असे उद्गार काढले आणि पुन्हा ती नित्यकर्मात गढून गेली.आईच्या माहेराला आतापर्यंतही फार काही अर्थ नव्हताच पण आता ते नावालाही उरले नव्हते.माझ्या मावशीचे लाडू हसले पण नशीब मात्र कधीच हसले नाही.