टूथपेस्ट ते दंतमंजन

"सुमे, गधडे, मला दंतमंजन देतेस होय गं दात घासायला... ते काही नाही, मला टूथपेस्टच हवी आहे, आणि तीदेखील ताबडतोब! " दहा वर्षांच्या मनीषाचा आरडाओरडा ऐकून घरातली सगळी मंडळी जांभया देत, डोळे चोळत आवाजाचा मागमूस घेत परसात आली. पायऱ्यांच्या जवळच्या गुलबक्षीच्या ताटव्यापाशी मनीषा एका खांद्यावर नॅपकीन, हातात टूथब्रश आणि चेहऱ्यावर चिडके भाव अशा थाटात तिच्याच वयाच्या सुमावर गरजत होती. "मनू बेटा, घरातली टूथपेस्ट खरंच संपली आहे गं, वाण्याचं दुकान उघडलं की लगेच देते हं आणून तुला टूथपेस्ट! " मावशीबाई मऊ आवाजात मनीषाची समजूत काढीत म्हणाल्या. शहरातली पोर चार दिवस गावाकडे राहायला आली मोठ्या हौसेने, आता तिचे मन उगाच का मोडा, असा त्यांचा प्रेमळ दृष्टिकोन! पण मनीषाच्या आईला हे बिलकुल मान्य नव्हते. "मावशी, घरी असाच हट्ट करत असते ही... एक दिवस राहिली टूथपेस्टशिवाय म्हणून काही भोकं पडत नाहीत अंगाला... इथले लोक पण दात घासतातच ना, मग एक दिवस दंतमंजन वापरलं तर बिघडलं कुठं! " शेवटी हो ना करता करता विषय तिथेच संपला आणि मनीषादेवी दंतमंजनाने आपले दात घासण्यास तयार झाल्या!

पण एका विचारचक्राची सुरुवातच झाली जणू ह्या प्रसंगाने! शहरातली आपली जीवनशैली म्हणजे उठल्यापासून झोपेपर्यंत वेगवेगळी रसायने, सौंदर्योत्पादने, कृत्रिम पदार्थांची एक जंत्रीच झाली आहे. त्यांच्याशिवाय आयुष्य म्हणजे वैराण वाळवंटच जणू! आता हेच पाहा ना, वॉशबेसिनजवळचे तुमचे कपाट उचकटून पाहिलेत तर त्यांत नाना प्रकारचे माऊथवॉश, टूथपेस्ट्स, साबण, फेसवॉश, हॅंडवॉश, शेव्हिंगचे निरनिराळे साहित्य, आफ्टरशेव्ह, हेअरजेल, सुगंधी तेले, निर्जंतुके इत्यादींची बेफाम दाटीवाटी दिसेल. आणि बाथरुममध्ये डोकावलेत तर रंगीबेरंगी साबण, शांपू, कंडिशनर्स, जेल्स, बाथजेल्स, वैविध्यपूर्ण अशी सौंदर्योत्पादने ह्यांची प्रचंड तैनात फौज पाहून नवखा माणूस तर चक्रावूनच जाईल! बरं, ह्या यादीत खोलीतल्या आरशासमोरील डिओडोरंटस, पर्फ्युम्स, चेहऱ्याची क्रीम्स, लोशन्स, पावडरी इत्यादींचा समावेश करायलाच हवा!

आता जरा शहरातल्या स्वयंपाकघरातही डोकावू... इथेही कस्टर्डस, जेली, आईसक्रीम्स, सॉस, जॅम, ब्रेड, मॅगी नूडल्स, तयार मसाले, मसाला पेस्ट्स, केचप, प्रक्रिया केलेले फळांचे रस, सिरप्स, कोल्ड्रिंक्स, इन्स्टंट पिठे यांचा अबब भरणा दिसेल! शिवाय भाज्या, फळे इत्यादींबरोबर स्वयंपाकघरात त्यांवर फवारलेली जंतुनाशके येतात ती वेगळीच! आमच्या ओळखीच्या एक काकू त्यांना लागणाऱ्या भाज्या, फळे शक्यतो त्यांच्या परसबागेतच उगवतात. रसायनविरहित पालेभाज्या, फळभाज्या व दारातच उगवलेले चिक्कू, पेरू, डाळिंबे, पपया व नारळ... काय समाधान विलसतं म्हणून सांगू त्यांच्या चेहऱ्यावर असा निसर्गमेवा लुटताना! बागेत काम करून करून नवराबायकोंची तब्येत पण ठणठणीत आहे. परंतु शहरांमधील सर्वांनाच जागेचे असे वरदान लाभत नाही. तरीही माझ्या परिचयातील अनेकजण गच्चीवर कुंड्यांमधून कढीपत्ता, ओवा, मिरच्या, गवतीचहा, तुळस, कोरफड अशी रोपे लावून काही प्रमाणात का होईना, ही हौस भागवतात.

रसायनांच्या दुनियेतून घरांच्या बैठकीच्या खोल्याही सुटत नाहीत बरं का! शहरांतील प्रदूषणातून घरी आल्यावर प्रसन्न सुगंध हवा म्हणून वेगवेगळे एअर फ्रेशनर्स, डासांना दूर हटविणारी उत्पादने तर असतातच... पण परवा तर मी एके ठिकाणी शू रॅक मध्ये चक्क पायांना सुगंधित करण्याचा स्प्रे पाहिला आणि धन्य झाले! आणि हो, आपल्या यादीतून कपडे, लाद्या, भांडी धुण्याची वेगवेगळी रसायनयुक्त उत्पादने राहूनच गेली! त्यांमध्ये सुद्धा डोळे विस्फारायला लावतील एवढे प्रकार आहेत! आणि कपडे सुगंधित ठेवण्यासाठी सुगंधित हँगर्स, पाऊचेस, कपाटांसाठी डांबरगोळ्या वगैरे हव्यातच!

कुतूहलाचा प्रश्न हा आहे की एवढ्या भरमसाठ प्रमाणांत आपल्या शरीरात आगंतुक रसायने रिचवून शहरी माणूस जगतो तरी कसा? काही तज्ज्ञ म्हणतात की माणसांची शरीरे ह्या सर्व 'पाहुण्यांना' आपल्या शरीरात कालांतराने सामावून घेतात आणि हे पाहुणे शरीराचा एक हिस्साच बनतात. पण मग दवाखान्यांमधील पेशंट्सची रांगही वाढताना का दिसते? पाश्चिमात्य देशांमध्ये आता पुन्हा नैसर्गिक, रसायनविरहित, जंतुनाशकविरहित गोष्टींचे महत्त्व लोकांना पटू लागले आहे. अनेकांनी तशी जीवनशैली स्वीकारली आहे. पण भारतासारख्या देशांत पाश्चिमात्यांनी अव्हेरलेली उत्पादने मोठ्या आकर्षक जाहिराती व योजना जाहीर करून अज्ञानी ग्राहकांच्या माथी मारली जात आहेत. गरीबीच्या खाईत वावरणाऱ्या लोकांमध्ये तर त्यांविषयी कमालीची उत्सुकता व आकर्षण आहे. मध्यमवर्गातही चित्र फारसे वेगळे नाही. तारुण्य, उत्साह, समृद्धीसारख्या भावनांचे बाजारीकरण करणाऱ्यांपासून सावध होऊन भारतीयांनी सजग झाले पाहिजे. बाजारात जे जे काही मिळते ते चांगलेच असते ही धारणा सोडून देऊन आपल्याला खरोखरी कशाची आवश्यकता आहे, आपण खरेदी केलेले उत्पादन हानिकारक तर नाही ना, त्याची रास्त किंमत काय या गोष्टींबद्दल जागरूक होणे गरजेचे आहे. आपल्या दिवसेंदिवस हात पाय पसरणाऱ्या गरजा पाहून कोणाला हीच का ती 'साधी राहणी, उच्च विचारसरणी'चा संदेश देणाऱ्या ज्ञानियांची भूमी हा प्रश्न पडल्यास त्यात नवल वाटणार नाही. म्हणूनच हे भारतीया, जागा हो! चंगळ जरूर कर, पण त्यालाही धरबंद असू देत. स्वतः शी प्रामाणिक होऊन संवाद साध. दिखाऊपणाला बळी पडू नको. उत्कृष्टतेचा जरूर आग्रह धर, पण वरवरच्या आभासाला भुलू नको. आपल्या मातीचा अभिमान निश्चित बाळग, पण इतरांकडून चांगले घ्यायला विसरू नको. त्यातूनच आपला भविष्यकालीन भारत घडणार आहे! :-)