भटकंती (शेगाव- मंदिर, नागझरी)

शनिवारी सकाळी पुन्हा मंदिरात जायचे होते दर्शनाला. साधारण ८ वाजता तयार होऊन आम्ही निघालो. विचार केला होता की दर्शन घेऊन तसेच थेट निघता येईल. म्हणून मग सर्व सामान गाडीत ठेवले व हॉटेलची खोली सोडून दिली. आम्ही असलेली जागा ही मंदिराच्या पश्चिम द्वारासमोर होती. ते द्वार सध्या दुरूस्तीकरीता बंद होते. त्याच्याच उजव्या बाजूनेही दुसरे आणखी एक प्रवेश द्वार होते. त्यातून आम्ही आत गेलो. (रात्रीही ह्याच मार्गाने गेलो होतो, पण आता थोड्या जास्त माहितीसोबत)

दर्शन घेतल्यावर आम्ही थोडा वेळ मंदिराच्या आवारात बसलो होतो. तिथेच स्वागत कक्ष, देणगी केंद्रे बनविली आहेत एका बाजूला पोथी वगैरेचे पारायण करण्याकरीताही एका हॉलमध्ये सोय केली आहे. तशाच आणखीही सोयी आहेत. मंदिराच्या आसपासच्या भागात म्हणजे खालील फोटोत दिसणाऱ्या द्वारातून आत गेले की पूर्ण भागात कॅमेरा वापरण्यास बंदी होती, त्यामुळे बाहेरील भागात जमतील तशी चित्रे कॅमेऱ्यात बंदिस्त केली (अर्थात संस्थानाच्या कार्यकर्त्यांच्या परवानगीनेच). त्यामुळे गजानन महाराजांच्या मूर्तीचा फोटो वगैरे ह्यात नाही.

ह्या द्वारातून आम्ही आत आलो.

हे संस्थानाचे सभागृह,

आजूबाजूच्या आवारातही इतर लहान मंदिरे बांधलेली आहेत.

शेगाव संस्थानाचे भक्त निवास क्र १. इथेही अशाच प्रकारे इतर निवासस्थाने क्र २ ते ६ बनविली आहेत.

हे मुख्य प्रवेशद्वार (आतून). ह्या प्रवेशद्वारापर्यंत येण्याची गाडी, रिक्षा ह्यांना परवानगी आहे. ह्यापुढे चालतच जायचे. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर फुल/प्रसाद व इतर साहित्याची दुकाने आहेत.

हे सर्व पाहताना एक जाणवले की मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत सगळीकडे चांगली स्वच्छता पाळली गेली आहे. असेच आनंदसागर येथेही अनुभवले होते.

मंदिरातून निघून मग आम्ही मुख्य मंदिरापासून ६/७ कि. मी अंतरावर असलेल्या नागझरी ह्या ठिकाणी जायला निघालो. तेथे जाण्याचा रस्ता जाणीव करून देत होता की आपण एखाद्या खेडेगावातून जात आहोत. लहान रस्ता, आजूबाजूला घरे. रस्त्यावरून ऊस वाहून नेणाया बैलगाड्या. एखादी गाडी समोर असली की त्याला सहज पार करून जाणे अशक्य. दोघांनीही एकमेकांकरीता रस्ता मोकळा करून द्यायचा. गावातून बाहेर निघालो तर एकदम निर्जन, ओसाड वाटणारा प्रदेश. पण शेतीकरीता वापरला जाणारा असेल असा अंदाज. रस्ता एकदम खडबडीत.

आम्ही नागझरीला पोहोचलो. तिथे गेल्यावर कळले की येथे गजानन महाराजांच्या गुरूंचे मंदिर आहे. तिथे बाहेरच मोठे प्रवेशद्वार बनविले आहे. आम्ही त्या प्रवेशद्वारातून न जाता उजवीकडील वेगळ्या रस्त्याने खालपर्यंत गाडी घेऊन गेलो व तिकडून दुसऱ्या पायऱ्या उतरलो.

आत एक पाण्याचे कुंड बनविले आहे जिथे गायीच्या तोंडातून पाण्याचा उगम आहे. पुढे मंदिराच्या वरच्या भागात एक मंदिर आहे (कोणाचे ते आठवत नाही) तिकडून खाली उतरल्यावर गुहेत आत गेल्याप्रमाणे पायऱ्या बनविल्या आहेत व तिथे गुरूंचे मंदिर आहे. (पुन्हा त्या मूर्तीचा फोटो घेण्यास मनाई)

खाली उतरल्यावर पाहिले की प्रसाद (जेवण) बनविण्याकरिता तेथे एक मोठे स्वयंपाकघर बनविले आहे. आणि दुसऱ्या खोलीत भांडी ठेवण्याची व्यवस्था आहे. तिकडची भांड्यांची मांडणी एकदम पद्धतशीर होती, ते मला एवढे वेगळे वाटले आणि आवडले की मी त्याचा फोटो घेणार होतो, पण तेथील मुख्य असलेल्या व्यक्तीने (काय संबोधन होते तेही विसरलो आता) नकार दिल्याने तो विचार सोडून दिला.

तेथून मग आम्ही अंदाजे ११:४५ ला निघालो. पुन्हा शेगावच्या मंदिराजवळ आलो. तिथे ११ ते १ महाप्रसाद मिळतो. मी रांगेत लागून तो प्रसाद घेतला, व पुढे मग जेवणाकरीता हॉटेल शोधत निघालो. शेगावच्या बाहेर निघताना एक चांगले हॉटेल दिसले. रात्री जेवलेल्या हॉटेलपेक्षा हे भरपूर चांगले होते, आणि त्याच्या थोडेच पुढे होते. त्यामुळे काल रात्री आणखी थोडा शोध घेतला असता तर बरे झाले असते असे वाटले.

असो, तिकडे जेवण करून मग आम्ही शेगावहून शिर्डीकरीता प्रस्थान केले.