इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी -४

बऱ्याच वेळा नाईलाजयुक्त आदरानं आणि व्यासंग वाढावा म्हणूनही दिवेकर सर शिक्षणचुडामणींच्या तासाला बसत. एक दिवस चुडामणी 'वार्षिक हिशेब व ताळेबंद हिशेब तपासनिसाकडून मंजूर कसे करून घ्यावे' याचं विवेचन करत होते. सोयीस्कर हिशेबांची मंजुरी महत्त्वाची असते हे त्यांचं मत. "संस्था, मंडळं, संघटना यांच्या पदाधिकाऱ्यांना ऑडिटरचं भावविश्व, त्यांच्याशी बोलताना हळूहळू उलगडत गेलं पाहिजे. नेमकं उमगलं पाहिजे." ते सांगत होते. चुडामणींचं हे वाक्य ऐकून दिवेकर सरही गोंधळले. वर्गातल्या एकाही विद्यार्थ्याच्या कानावर भावविश्व हा शब्द पडला असण्याची शक्यता नव्हती. सर्वांनीच गोंधळून चुडामणींकडं पाहिलं.

चुडामणी शांत होते. "मी समजावून सांगतो. समजा... तुम्ही गॉगल विकत घेताना, विक्रेता जास्त बोलायला लागला, तर तुम्ही काय म्हणता? " एका सुरात दोन तीन आवाज आले, " ए... जास्त पचपच नाय पायजे! भाव बोल! " "बरोबर. " चुडामणी म्हणाले, "जसा आपण तिथे भाव विचारतो, तसाच हिशेब करून सही ठोकणाऱ्याचा पण भाव असतोच. फक्त एज्युकेटेडमध्ये असं डायरेक्ट विचारायचं नसतं... बोलता बोलता, हळूहळू त्यांच्या 'भावा' चा अंदाज घ्यायचा. या अर्थी त्यांचं 'भाव' विश्व तुम्हाला उमगलं पाहिजे. "

दिवेकर सरांनी सुस्कारा टाकला. या महनीय व्यक्तीला 'शिक्षणचुडामणी' हा किताब कसा प्राप्त झाला, त्याचं आणखी एक कारण त्यांना उमगलं होतं.

'आदर्श पावट्याचे आचार, उच्चार आणि विचार' असाही एक विषय थिअरीत होता; पण दिवेकर सरांना त्यातल्या फक्त 'विचार' याच गोष्टीवर थोडेफार कष्ट घ्यावे लागले. त्यांच्या असं लक्षात आलं, की उच्चार आणि आचार ही नित्यनूतन, प्रवाही आणि काळाबरोबर बदलत जाणारी 'ट्रेंडी' प्रक्रिया आहे. सिनेजगत, लोकप्रिय अभिनेते, खेळाडू, जाहिरातदार यांनी रुजवलेल्या अनेक शब्दसमूहांचा तो एक परिपाक आहे. उदाहरणार्थ, त्यांच्या दोन विद्यार्थ्यांना, आपल्या ठिकाणी पोचण्यासाठी दुभाजकामुळं बरंच अंतर कापून रस्त्याच्या बरोबर दुसऱ्या बाजूला बाईकवरून यावं लागणार होतं. ही समस्या उभी राहते तोच त्यातला एक जण उत्स्फूर्तपणे उद्गारला, "चल ना राव पिल्या... 'मै हूं ना! '" आणि ते उलट्या बाजूने प्रचंड कर्कश्श हॉर्न वाजवत गेलेदेखील. या 'मै हूं ना! ' चा अर्थ लक्षात यायला दिवेकर सरांनाच वेळ लागला होता.

किंवा त्यांच्याच विद्यार्थ्यांच्या कानावर पडलेल्या संभाषणावरून उच्चारशास्त्र या विषयाची त्यांची तयारी दिवेकर सरांना आपसूकच कळाली. एक विद्यार्थी आपण आपल्या 'डेम' शी कसा 'नडलो' हे मित्राला सांगताना त्यांनी ऐकलं. "हेवाहदच्या (सेवासदनच्या) रत्त्यावरून (रस्त्यावरुन) काल चाललेली... शिल्पा. म्हनलं आज नडायचंच. घीन घीन घीन गाडी मारत तिच्यामागं गेलो, तिला गाठला, आन बॅकहँडमधून काढून फूल दिलं गुलाबाचं... म्हनलं फ्रेंडशिप देते की नाही? "

'मारामाऱ्या, हिंसाचार व तोडफोड' हाही विषय थिअरीमध्ये होताच. यासाठी मात्र त्या त्या क्षेत्रातल्या तज्ञांना बोलावणं दिवेकर सरांना भाग पडलं. विद्यार्थ्यांना याही विषयाची जुजबी तोंडओळख होती; पण त्यातला संघटित हिंसाचार, जमावाला कसं चिथवायचं, अत्यंत अल्प कालावधीत झुंडीनं एखाद्या मालमत्तेची जास्तीत जास्त नासधूस, नुकसान कसं करायचं या गोष्टी विद्यार्थ्यांना निष्णात व्यक्तींकडूनच अधिक चांगल्या समजू शकल्या. पुढील शैक्षणिक वर्षाच्या विद्यार्थ्यांना हा विषय प्रात्यक्षिकात ठेवून काही 'अभ्यास' भेटींचं आयोजन करावं असंही ठरलं. पिस्तुलं, एके ४७ आदी अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचं प्रशिक्षण एक वर्षाच्या सीमित अभ्यासक्रमाच्या कक्षेबाहेरचं होतं. शिवाय प्रशिक्षणानंतर उपलब्ध होणाऱ्या संधींमध्ये ते सगळं आपसूक येणार होतंच. त्यामुळे त्याचा फार बाऊ कुणीच केला नाही.

कोर्समधील प्रात्यक्षिकाच्या विषयांसाठी मात्र इन्स्टिट्यूटनं एक अत्यंत अभिनव उपक्रम राबवला. संपूर्ण शैक्षणिक विश्वातच हा  एक अभिनव, चैतन्यदायी उपक्रम म्हणून नावाजला गेला. ही क्रांतिकारी कल्पना मात्र चुडामणींची होती. कोर्सच्या सुरवातीच्या दिवसांमध्ये जेंव्हा दिवेकर त्यांच्याकडे प्रात्यक्षिकं काय असावीत, हे विषय घेऊन गेला, तेंव्हाच त्यांच्या डोक्यात ती चमकली होती.

झालं होतं ते असं. प्रात्यक्षिकाचे विषय दिवेकरने काढले खरे; पण ते कसे घ्यायचे, ते कोण शिकवणार अशा अनेक काळज्या डोक्यात ठेवूनच, तो काहीशा सचिंत अवस्थेत चुडामणींकडे विषय दाखवायला गेला होता. त्याच्या चेहऱ्यावरुनच अनुभवी चुडामणींना काहीतरी बिनसल्याचा अंदाज आला होता.

"या, या, दिवेकर सर. काय घेऊन आले? आन काय.. तब्येत डाऊन आहे काय? "

"नाही सर, " दिवेकरनं प्रॅक्टिकलच्या विषयांची नवी उघडलेली फाईल त्यांच्यासमोर ठेवली. "हे  प्रॅक्टीकलचे विषय काढलेत; पण नक्की एक्झिक्यूट कसं करायचं काही कळत नाहीये. "

"बघू आणा जरा. " चुडामणींनी फाईल उघडली. विषय सहा होते. त्यांनी वाचायला सुरवात केली.

१. तंबाखूची पिंक लांब व प्रभावीपणे कशी टाकावी?
२. परिणामकारक 'ढोस' कसा भरावा?
३. 'वाढवायचंय' का 'मिटवायचंय' याचा अचूक अंदाज कसा घ्यावा?
४. वरात, उत्सव इ. प्रसंगी (अंगविक्षेपासह) बीभत्स नृत्य कसे करावे?
५. मुलींना 'फ्रेंडशिप' कशी मागावी? नाकारल्यास डूक कसा धरावा?
६. पावटा वाहनचालक कसे बनावे? (दुचाकी व चारचाकी)

फाईल बंद करून चुडामणींनी संमतीदर्शक मान हलवली. "झकास आहे की. काय डिफिकल्टी काय तुमची? "

"कंडक्ट करणारी माणसं मिळायला पाहिजेत सर! ही टॅलेंटस समाजात इतकी विखुरलेली असतात, की नक्की कुणी लोकेटच होत नाही, सर. बरं, कोर्समध्ये बराच भर प्रात्यक्षिकांवर आहे. " अस्वस्थपणे दिवेकरनं आपली अडचण सांगितली.
चुडामणींनी आपली प्रसिद्ध 'विचारमग्न' पोझ घेतली. म्हणजे नजर आढ्यावर, दोन बोटं गालावर ठेवून डोकं हातावर रेललेलं आणि हात खुर्चीच्या हातावर टेकवलेला. याच पोझमध्ये त्यांचे बरेचसे फोटो असायचे. फक्त फरक इतकाच, की या वेळी ते खरोखर विचार करत होते.

अल्पावधीत त्यांच्या नजरेत प्रज्ञावंताची एक प्रगल्भ चमक उमटली.

"तुम्हाला आपण प्रवेशाच्या वेळी घेतले इंटरव्ह्यूज आठवतात, दिवेकर? "

"हां.‌सर... पण त्याचं काय? "

"अहो... नीट लक्षात घ्या. तुम्हाला हवी ती एकेक टॅलंटस आपल्या सध्याच्या विद्यार्थ्यांमध्येच आहेत. तो गुलाबी शर्टातला कॅंडिडेट आठवतो, इंटरव्ह्यू चालू असतानाच कशी पल्लेदार पिंक मारून आला होता? गुलाबी आणि पिंक! हा.. हा.. हा.. तर ते असो. एकेकाकडे एकेक विषय तयार आहे. शिकवू द्या इतर वर्गबंधूंना त्यांनाच! नाहीतरी विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर करण्यावर आपला भर असतोच. अल्प मानधनात एकेक विषय शिकवतील, उरलेले विषय शिकतील! काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? "

दिवेकरनं काही वेळ विचार केला. चुडामणींच्या म्हणण्यात तथ्य होतं. आजवर त्यानंही सगळी बॅच जवळून निरखली होती. खरोखरीच प्रॅक्टीकलचा एकेक विषय तरी एकेकाचा तगडा होताच. "बरोबर आहे सर तुम्ही म्हणताय ते! मी विषयवार माणसंच निवडायला घेतो आता. "

आणि अशा प्रकारे प्रॅक्टीकलचीही काळजी मिटली होती. वर्ष उत्तम पार पडलं होतं.

(क्रमशः)