ह्यासोबत
आपल्या नेहमीच्या अड्ड्यावर सुधन्वा दिवेकर ग्लासमध्ये कडक कॉफी ओतून, तो समोर ठेवून विचारमग्न अवस्थेत बसला होता. एखादी अत्यंत नवीन, महत्त्वाची कल्पना कुणासमोर मांडायची असली की तो आधी अर्धा एक तास असाच तंद्रीत बसायचा. आज त्याची अकरा वाजताची वेळ ठरली होती. तीही शिक्षणचुडामणी बाळासाहेब कलंत्रे यांच्याबरोबर.
काय बोलायचं हे दिवेकरचं खरंतर बऱ्यापैकी ठरलेलं, घोटलेलं होतं. कारण या प्रकल्पावर चार एक महिने बारकाईनं विचार करुनच शिक्षणचुडामणींशी या विषयाचें सूतोवाच करण्याचं धाडस त्यानं केलं होतं. त्यातच गेल्या चार दिवसांत आपल्या प्रकल्पाची समाजातली गरज त्याला याच त्याच्या नेहमीच्या हॉटेलवर फक्त दुसऱ्या टेबलवर झालेल्या एका संभाषणामुळं फार प्रकल्पानं जाणवली होती. एक निश्चयी सिगरेट दिवेकरनं पेटवली. तिचे खोल झुरके घेताघेता ऐकलेलं ते संपूर्ण संभाषण, एखाद्या पटकथेसारखं पुन्हा एकदा त्याला मनात आठवून गेलं.
झालं होतं ते असं. हॉटेलमध्ये शेजारच्या टेबलवर त्या भागातले एक समाजहितरक्षक बसले होते. दिवेकरला लोक दहा वर्षांपूर्वी त्यांना 'गुंड' म्हणायचे हेही अंधुक आठवत होतं. असं का म्हणायचे कुणास ठाऊक. चौकातल्या किरकोळ हिंसाचारानं सुरवात करून समाजहितरक्षक आज आपल्या भागात चांगलेच प्रस्थापित झाले होते. फटाक्यांचा स्टॉल, मग एक (अतिक्रमण करुन) काढलेला पावभाजी-ज्यूस बार, एक फोन बूथ असं करत करत पेंटिंग कॉंट्रॅक्टस घेणे, वीटभट्टी असा त्यांच्या उद्योजकतेचा यशस्वी आलेख होता. राजकारणामध्येही त्यांची प्रगती याबरोबरीनंच होत गेली होती.
त्यांच्यासमोर टेबलवर अगदी त्यांच्यासारखेच पण दुसऱ्या भागातले असे आणखी एक समाजहितरक्षक बसले होते. समदुःखी किंवा खरं तर 'समसुखी' असल्यामुळे त्यांच्यात विलक्षण मोकळेपणाने अनुभवांची देवाणघेवाण चालली होती. शेजारीच त्या दोघांनी पाळलेला वनराज नेने हा झुंजार पत्रकारही विनम्रपणे बसला होता आणि त्यांचें बोलणं विशेष इच्छा नसूनही शेजारच्या टेबलवर दिवेकरला आपसूक ऐकू येत होतं - कारण साक्षात लोकनेतेच असल्यामुळे अर्थातच प्रघाताप्रमाणे समाजहितरक्षकांचा आवाज हा जरुरीपेक्षा फारच मोठा होता. दोघांचाही.
"बरं झालं दादा तुमी त्या शिवा खाडेला टोले टाकले. मागंच मी म्हनलेलो, दादांच्या एरियात इतकी डांगडिंग करतंय हे खाडं, आणि दादा एकदम सायलेंट कशे बसले? डाऊन झाला आसंल आता खाड्या"
"हे बघ शेषराव, आपन हून तर कुनाला हात नाय लावत. तुला नॉलेज आहेच. तसली भाईगिरी करायचीच नाई आपल्याला. खाडेचं म्हणजे कसं झालं, आपल्या एरियात डॉनगिरी केली चालू. आपन एक घिऊ आयकून... कसं म्हनजे, आपलं पक्कं असतं - इलेक्षनची लाईन डोक्यात. ट्रबल झालं छोटंमोठं, ऐकून घ्यायचं. पन आपली पोरं... कार्यकर्ते? यंग ब्लड पडतंय त्यांचं. कसं.. मला म्हनले दादा, काढायचं आता खाड्याचं आडिट एकदाच. आता तुला म्हायतिय पोरं हायती हाताशी म्हनून आपलं एकदम केअरफ्री चालतंय. त्यानला डायरेक नाही म्हनता येत नाही. एरियातले चार नाही, चांगले सहा-सात चौक मॅनेज करतात. निस्ता आवाज दिला ना, ब्येडमधनं पन उठून येतात. त्येंच्या मताला किंमत द्यायला लागते. "
शेषरावनं एक सुस्कारा टाकला. "खरं हाये दादाराव. पोरं पन काई म्हना, सांभाळली राव तुमी. आमच्याकडं पोजिशन अजूनच बेकार. पोरंच मिळत नाहीत. आमच्या एरियात एकतर तुमच्यासारखी उत्सवाचा जोर नाही. सगळे झाले एज्युकेटेड. वर्गणी कलेक्शन एकदम डाऊनमध्ये. मग पोरांना जोर येनार कसा? वरतून साली आमच्या एरियात प्वॉरांनी शिक्षणाची काय लाईन पकडली कळत नाई. पूर्वी दिवसभर वडापाव, च्या-बिड्या आणि संध्याकाळला क्वाट्टर येवड्यावर भागनारी प्वारं... आता कोन काय शिकतंय, कोन कुटं कामाला लागलेत. समाजशेवेत मानसं नकोत का? इलेक्शनच्या टायमाला अन्नांनी इचारला, कुटंय फौजफाटा, काय सांगनार त्येंना? "
झुंजार पत्रकार वनराज नेनेनं आपली मान भयंकर समंजसपणे मागेपुढे हलवली. "पण बरं का शेषराव, तुम्हीच काय, विधायक काम करू बघणाऱ्या समळ्याच सामाजिक संस्थांकडे हीच परिस्थिती आहे. तरुण, नव्या जोमाचे कार्यकर्तेच नसतात. आजकाल ना, सगळी तरुण मुलं संध्याकाळी कॉंप्युटरच्या किंवा कुठल्या तरी परीक्षेच्या क्लासला जातात. " त्यानं माहिती पुरवली.
हॉटेलचा मालक ग्लास फुटल्यावर पोऱ्याकडं पाहतो, तसं दादासाहेबांनी वनराजकडे पाहिलं. " वनरु, तुला कळतं का काई? तू म्हनतो तसली पोरं आमच्या काय कामाची? रिक्षावाल्याशी नाय नडता येत तसल्या चिकन्यांना. आमचे कार्यकर्ते वेगळे... तुला नाई कळनार. तू लेखफिक लिहितो, तेच बरंय. "
पुन्हा ते शेषरावकडे वळले. "प्वारं तर लागनारच शेषराव. नाई तं तुजा वटच जाईल तुज्याच एरियात. पन तू राव, स्पेंडिंगमदी लय कमी पडतो... मला तरी वाटतं. आरे, आजकालच्या दिवसात तुला चा-बिड्या आनी वडापावमदी नडणारी प्वारं पायजेत! दिवस ऍडव्हान्स आले शेषा! तू काय इचार केला, त्यांना काय लागतं शायनिंगला? यमाहा-बिमाहा किती ठेवल्या तू? आं? चार-पाच मोटरबाईक हाताशी पायजेत. जुन्या बाजारात मिळनारी, कुटंली नाव ल्हिल्येली असतेत... हां, आधीदास, नायकी बुटं किती आनून ठेवली तू? तू पन ना, राव... "
पुढचं ऐकण्याची दिवेकरला गरजच भासली नव्हती. बिल देऊन तो उठला होता. कारण त्याच्यातल्या उद्योजकानं एक नवीन प्रॉडक्ट रेंज हेरली होती. त्यामुळं त्याचं डोकं भराभरा चालू लागलं होतं. एक प्रॉडक्ट म्हणून या 'प्वारां' ची गरज कुणी विचारात घेतली नव्हती. डिमांड तर प्रचंड होतीच. उत्सव मंडळं, राजकीय पक्ष यांच्यापासून ते कॉस्मोपॉलिटन शहरांमधील संघटित गुन्हेगारीला अशी प्वॉरं, तीही त्यांना हवी तशी प्रशिक्षित स्वरुपात मिळणं गरजेचं होतं. सर्व मार्केट सेगमेंटसना या मनुष्यबळाची गरज होती. एकद असे पावटे प्रशिक्षित झाले की व्यक्तिगत पातळीवर पैशाची वसुली करणे, भाडेकरुंना हाकलण्याच्या सुपाऱ्या घेणे अशा स्वयंरोजगारीच्या संधी होत्याच. देशातल्या बेकारीमुळं, नोकऱ्यांच्या अभावामुळं 'कच्चा माल' तर प्रचंड प्रमाणात उपलब्द्ध होताच. प्रश्न होता तो चाचपडत, आपापलं शिकत या क्षेत्रामध्ये येणाऱ्या तरुणाईला घासूनपुसून, प्रशिक्षित स्वरुपात व्यावसायिक पातळीवर मार्केटमध्ये उतरवण्याचा आणि अगदी हेच दिवेकर विलक्षण कुशलतेने करणार होता. या असंख्य दिशाहीन अकुशल 'पावट्यां'ना तो एक फिनिश्ड प्रॉडक्ट म्हणून समाजासमोर पेश करणार होता.
हे सगळं आठवता आठवता हॉटेलमधून उठून मोटारबाईकवरून शिक्षणचुडामणींच्या भव्य कॅंपसमध्ये आपण कसे आलो ते दिवेकरला कळलंही नाही
(क्रमशः)