काय होतास तू, काय झालास तू...

आरश्या घातकी का निघालास तू?
काय होतास तू, काय झालास तू!

एवढी काय मित्रा चितेची नशा
का पडावास होऊनसा लास तू?

जीवना वाटले तेच झाले, असो
सत्य येता समोरी पळालास तू!

पोचलो त्याच जागी पहा मी नि तू
मी कुठे ऐकले जे म्हणालास तू?

साठ वर्षे मला दूर लोटूनही
मोह झालाच, मृत्यो, चळालास तू

अर्थ ज्याच्याविना तोच तो राहतो
सांग त्या अक्षराला, गळालास तू

या जगाला तुझे मोल काही नसे
लाख वेळा जरी येथ आलास तू