पाद्रीबुवांची मराठी शिकवणी

तुम्ही कधी कोणाला आपली मातृभाषा साहेबाच्या भाषेतून शिकवायची कसरत केली आहे? आणि त्यातून तुमचा विद्यार्थी साधासुधा कोणी नाही तर तो एक पाद्री आहे हे माहीत असताना? मला हा अनोखा अनुभव घेण्याची मजेशीर संधी काही वर्षांपूर्वी मिळाली आणि त्या छानशा अनुभवातून एक सुंदर स्मृतिचित्र तयार होताना मलादेखील काही शिकायला मिळालं.

कॉलेजच्या सोनेरी दिवसांमधील गोष्ट. भटकंती, सहली, सिनेमा, हॉटेलिंग, वाढदिवस इत्यादींसाठी कायमच हातखर्चाला दिलेले पैसे कमी पडायचे. अवाजवी पैशांची मागणी केली की घरून सांगितले जायचे, "आपापले पैसे कमवा आणि खर्च करा"! स्वावलंबनाचे व स्वकष्टाच्या कमाईचे महत्त्व समजण्यासाठी त्याचा फार उपयोग झाला. त्यामुळेच मी कधी छोटासा जॉब कर, कधी इंग्रजी वृत्तपत्रांत काहीबाही लेख पाठव तर कधी शिकवण्या घे असे नाना उद्योग करून धन जोडण्याच्या कामी असे. सुदैवाने इंग्रजी व मराठी ह्या दोन्ही भाषांवर बऱ्यापैकी प्रभुत्व असल्याने अर्थार्जनाच्या संधींची कधीच कमतरता भासली नाही. तर एक दिवस अचानक एका मित्रशिरोमणींचा फोन आला. त्यांची ओळख असलेल्या एका मिशनरी संस्थेत एका पाद्रीबुवांना साहेबाच्या भाषेतून मराठी शिकवण्यासाठी सुयोग्य व्यक्ती हवी होती. 'तुला ह्या जॉबमध्ये इंटरेस्ट आहे का? ' अशी पलीकडून पृच्छा झाली. काहीतरी वेगळे करायला मिळते आहे म्हणून मी लगेच होकार दिला. झाले! मिशनच्या मुख्य पाद्रींनी माझी एक अनौपचारिक मुलाखत घेतली. सौम्य, मृदू बोलणे व हसरे व्यक्तिमत्व असलेल्या ह्या पाद्रींनी जणू माझी बरीच जुनी ओळख असल्याप्रमाणे माझे स्वागत केले. मला सोयीची वेळ, पगाराची रक्कम आणि कामाची साधारण रुपरेषा इत्यादी गोष्टींची चर्चा करून झाल्यावर त्यांनी त्यांच्या संस्थेच्या समृद्ध पुस्तकालयातून हवी ती संदर्भपुस्तके, शब्दकोष इ. घरी नेण्याचीही परवानगी दिली. घरी मी अक्षरशः उड्या मारीत परत आले.

त्यानंतर मी माझ्या ६८ वर्षांच्या तरूण विद्यार्थ्यालाही भेटले. हे माझे विद्यार्थी खास दक्षिण भारताच्या किनारपट्टी प्रदेशातून पुण्याच्या मिशनशी संलग्न असलेल्या शैक्षणिक संस्थेत प्रशासकीय जबाबदारी सांभाळण्यासाठी आले होते. ह्या दाक्षिणात्य पाद्रीबुवांना तरूण अशासाठी म्हणावेसे वाटते कारण वयाच्या ६८व्या वर्षीही त्यांचा काही नवे शिकण्याचा, नवी भाषा - नवी संस्कृती जाणून घेण्याचा उत्साह केवळ अप्रतिम होता! त्यांच्या पहिल्या भेटीतच मला त्यांचे हे गुण भावले. कारण उत्साहापोटी त्यांनी ग्रंथालयातून मराठी शिकण्यासाठी त्यांना उपयुक्त वाटलेली २-३ पुस्तके मला दाखवायला आणली होती. थोडी जुजबी चर्चा करून दुसरे दिवसापासून आमची साहेबाच्या भाषेतून मराठीची शिकवणी सुरू झाली.

तीन महिन्यांच्या आमच्या ह्या शिकवणीत आम्ही दोघांनी आपापल्या भाषा- संस्कृती - तत्त्वज्ञान- विचार इत्यादींची भरपूर देवाणघेवाण केली. आमचे हे पाद्रीबुवा मराठीतून बोलायला बऱ्यापैकी तयार होत असले तरी लिखाणात खूप कच्चे होते. मी त्यांना जो गृहपाठ देत असे तोदेखील ते कसाबसा पूर्ण करीत. जमलं तर चक्क अळंटळं करीत. स्वभाव तसा थोडासा रागीटच होता. शिवाय ते वयाने एवढे मोठे होते की सुरूवातीला मला त्यांना गृहपाठ न करण्याबद्दल रागवायचे कसे हाच प्रश्न पडत असे. पण माझी ही अडचण संस्थाप्रमुखांनी सोडवली. "खुश्शाल शिक्षा करा त्यांना, " प्रमुखांनी मला खट्याळपणे हसत सांगितले. मीही पडत्या फळाची आज्ञा मानून आमच्या ह्या विद्यार्थी पाद्रीबुवांना जास्तीच्या गृहपाठाची शिक्षा देत असे. मग तेही कधी लहान मुलासारखे रुसून गाल फुगवून बसत तर कधी इतर गप्पा मारून माझे लक्ष दुसरीकडे वेधायचा प्रयत्न करीत. कधी माझ्यासाठी चॉकलेट आणीत तर कधी एखादी अवघड शंका विचारून विषयांतर करता येतंय का ते पाहत. अर्थात मीही स्वतः कॉलेजमध्ये शिकत असल्यामुळे मला ही सर्व तंत्रे तोंडपाठ होती! त्यामुळे मी त्यांच्या दोन पावले पुढेच असे. मग चाळीशीच्या फ्रेमआडून माझ्या दिशेने कधी वरमलेले तर कधी मिष्किल हास्यकटाक्ष टाकण्यात येत असत!

ह्या काळात अवांतर गप्पांच्या ओघात त्यांनी मला त्यांची जीवनकहाणीही थोडक्यात सांगितली. दक्षिणेतील एका छोट्याशा गावात एका गरीब ख्रिश्चन कुटुंबात त्यांचा जन्म झाला. बरीच भावंडे आणि पाचवीला पुजलेली गरीबी! शाळेतही खूप प्रगती नव्हती. पण फुटबॉलमध्ये मात्र विलक्षण गती! अगदी आंतरराज्य स्तरावर खेळले. पण करियर करण्यासारखी घरची परिस्थिती नव्हती. मग धर्मकार्याला वाहून घेतले आणि त्यातच सगळी हयात गेली. निवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना मिशनच्या कामासाठी अनोळखी प्रांतात, अनोळखी लोकांमध्ये, वेगळ्या भाषा व संस्कृतीच्या प्रदेशात त्यांना धाडण्यात आले. पण तशाही अवस्थेत त्यांची शिकण्याची तयारी, नवी भाषा आत्मसात करून ती बोलायचा उत्साह खरोखरीच स्तुत्य होता. शारीरिक व्याधी, म्हातारपण, वयाबरोबर येणारी विस्मृती ह्या सर्व आव्हानांना तोंड देत ते आपल्या नव्या जबाबदारीसाठी तयारी करत होते. पण मग कधी कधी त्यांचाही धीर सुटे. खास करून मिशनच्या भोजनकक्षात दिले गेलेले खाणे त्यांच्या पसंतीचे नसले की ते हमखास सायंकाळी त्याविषयी माझ्याकडे एखाद्या लहान मुलासारखी तक्रार करीत. मग खाण्यावरून त्यांचे लक्ष अभ्यासात आणण्यासाठी मला खरीखुरी कसरत करावी लागत असे.

ह्या काळात त्यांना शिकवण्यासाठी माझी जी तयारी झाली त्यामुळे मला माझे मराठी व इंग्रजी भाषाकौशल्य सुधारण्यासाठी फार मदत झाली. नवनवीन पुस्तके, मिशनचे वाचनालय व निसर्गाच्या सान्निध्यात असलेल्या मिशनच्या इमारतीतील शांत प्रार्थनागृह ह्यांचाही मी लाभ  घेतला. बघता बघता तीन महिने संपले. आमच्या पाद्रीबुवांना आता त्यांच्या नव्या जबाबदारीच्या पदाची सूत्रे स्वीकारायची होती. माझीही कॉलेजची परीक्षा जवळ येऊन ठेपली होती. काहीशा जड अंतःकरणानेच आम्ही एकमेकांचा निरोप घेतला. गुरूशिष्याचे स्नेहाचे हे अनोखे नाते आता संपुष्टात येणार होते. शेवटच्या दिवशी आम्ही भरपूर गप्पा मारल्या, आणि त्याही मराठीतून! निघताना पाद्रीबुवांना डोळ्यांतील अश्रू लपविणे कठीण झाले होते. त्यांची छोटीशी आठवण म्हणून त्यांनी मला एक छोटेसे बायबल देऊ केले व त्यांचा आवडता पायघोळ ट्रेंचकोट मी नको नको म्हणत असताना माझ्या हातांत कोंबला.

आज त्याला बरीच वर्षे लोटलीत. पाद्रीबुवा आता हयात आहेत की नाही हेही मला ठाऊक नाही. पण अजूनही मी कधी कपाट आवरायला काढले की एका कप्प्यात सारून ठेवलेला तो कोट मला पाद्रीबुवांची आठवण करून देतो! त्यांच्यामुळे मला जो काही अनुभव मिळाला, काही वेगळे शिकता आले त्या सर्वांची सय मला कायम राहील.