"एक हृदय हो भारत जननी"

होय! आम्ही देशप्रेमी आहोत! म्हणजे काय हो?

इथल्या चराचराशी माझे नाते घट्ट आहे. जशी इथली माती मला प्रिय आहे तसेच इथले लोक देखील. त्यांची सुखदुःखे केवळ त्यांचीच नसून  माझीही आहेत.

पण हे जर प्रत्यक्षात यायचे असेल तर एकमेकांना समजून घेण्यासाठी एकमेकांचे मनोगत समजण्यासाठी, आम्हास एकमेकांच्या भाषा समजायला हव्यात. "विविधतामें एकता, यही भारत की विशेषता!" ही विविधता आणि त्यांना एकत्र आणण्यासाठी भाषा हे प्रभावी साधन आहे.

आमच्या देशात बहुभाषी व्यक्तींची कमतराता सतत जाणवत राहते. सन्मानीय अपवाद भरपूर आहेत, पण ते हाताच्या बोटावर मोजता येईल इतकेच! इसवी सन २००० नंतर माझ्या निरिक्षणानुसार, एका प्रांतामधून दुसऱ्या प्रांतात नोकरी धंद्यासाठी जाणाऱ्यांची संख्या खूपच वाढली आहे. ही मंडळी आपापल्या वैयक्तिक पातळीवर अन्य भाषा शिकतात देखील. पण त्यात प्राविण्य मिळवण्यासाठी प्रयत्न नसतो.

मागे आकाशवाणीवर विविध भाषेतील श्रुतिका अनुवादित करून सादर होत. (हल्ली ही होत असतील, पण माझे आकाशवाणी ऐकणे कमी झाले आहे.) बंगालीतील श्रुतिका मराठीत येताना तीचा प्रवास इंग्रजी- हिंदी-मराठी असा व्हायचा. थेट बंगाली ते मराठी का होऊ नये?

आज शासकीय पातळीवर अथवा अन्य कोणत्याही पातळीवर बहुभाषिकांसाठी काही उत्तेजनाची व्यवस्था नाही. आमच्या कडे आमच्या विविध विद्यापीठांमधून जपानी, फ्रेंच, रशियन शिकवायची खास सोय असते, पण गुजराथी, कन्नड, तेलगूची नाही! बहुभाषिकत्वाला उत्तेजन देण्यासाठी काय करता येईल याचा विचार व्हावा. कन्नड साहित्यिकांच्या कादंबऱ्या मराठीत आणणाऱ्या उमा कुलकर्णींचे मराठीत फार कौतुक झालेले दिसत नाही. ते व्हायला हवे.

त्यासाठी काय करता येईल यावर मनोगतींनी विचार मांडावेत.