दोन कविता छोट्याश्या !

कोणत्या सप्तकात

एकेक पक्षी उडून जाताना
एकेक फांदी रिकामी होताना
उरतात मागे फक्त सुरांचे
काही पुंजके उदासवाणे
आणि उरांचे धपापणे केविलवाणे

जातील हळूहळू विरत
उरलेले नादही आसमंतात
मग लागेल आठवावं
गीत जीवनाचं गातात
कोणत्या सप्तकात

 नातं जन्मभराचं

असतीस तू मूक
आणि मी बधीर
तरीही तुझ्या भावना
पोहोचल्याच असत्या
माझ्यापर्यंत
कारण तुझी स्पंदनं
जोडून गेलीत नातं
माझ्या स्पंदनांशी
कधीचं, जन्मभराचं