एकदा...

एकदा मला भेटायला

माझ्या घरी येशील

आणि केस मोकळे सोडून

माझ्या जवळ बसशील

 

मी दोन्ही हातांमधे

तुझा चेहरा घेईन

रेखीव गहिऱ्या डोळ्यांमधे

बघून हरवून जाईन

 

तू विचार माझा राज़ा

असं काय बघतो?

मी म्हणेन बघतो कुठे?

पावसात भिजतो

 

मग तू अलगद, तुझा रेखीव

पापण्या मिटून घेशील

पाऊस ओसरल्यावरचं

निरभ्र आकाश होशील

 

मग विचार किती वाजले?

वेळ झाली का?

मी म्हणेन हे ग काय राणी

मग तू आलीसच का?

 

मला जवळ घेऊन

माझी समजून घाल

म्हण राजा सोडून जाताना

माझेही होतात हाल

 

मग मी तुला पुन्हा एकदा

डोळ्यात साठवून घेईन

आणि एकदम शहाण्यासारखा

तुला जाऊ देईन

 

तुषार जोशी, नागपूर