घनदाट जंगलाचे दोन भाग काहीसे अलग करणारी वस्ती जीपच्या प्रखर दिव्यांतून अचानक दिसायला लागली. सरोदेनं मग वेग थोडा कमी केला आणि शेजारी बसलेल्या पेठेसाहेबांकडं पाहिलं. त्याच्या अपेक्षेनुसार पेठेसाहेब म्हणाले, "सिगारेट ओढूया का एकेक?... पुढे जंगलात नको उगीच. "
हेही नेहमीचंच होतं. कितीही शौकीन असले तरे जंगलाच्या कोअर एरियात पेठेसाहेब कधीच सिगारेट ओढायचे नाहीत. निम्मी अधिक सिगारेट होईपर्यंत पेठेसाहेब काहीच बोलले नाहीत. पाड्यावर झालेल्या आदिवासींच्या मीटिंगचा विषय दोघांच्याही डोक्यात होता. मीटिंग चाललीही बराच वेळ; पण नाही तर हा विषय आदिवासींना कळला नसता. ते होणं आवश्यक होतं. अचानक पेठ्यांनी प्रश्न केला, "काय अंदाज, सरोदे? तीन्ही-चारी पाडे मिळून किती पोरं होतील तयार? "
"दहा -बारा तरी मिळतील. त्यातली पुन्हा टिकतील किती, ते महत्त्वाचं. कारण प्रेशर्स तर येतीलच. नक्षलवाद्यांना दुसऱ्या कुणाशी ती बोलली, की आवडत नाही. पुन्हा हुकूमचंदसारख्या स्मगलरशी क्लॅश, म्हणजे तोही आडवं घालणारच. "
पेठे हसले. "हीच तर त्यांची मनं तयार करता-करता झाले ना वर्षाभरात केस पांढरे...! पण पटल्यासारखी वाटतात. सिद्रामला पकडून ठेव. बाकी पोरांवर त्याचा होल्ड चांगला आहे. आतापर्यंत नक्षलवाद्यांनी पळवला नाही, हीच मेहेरबानी आहे. चल सुटू... पोरांना कधी, उद्या सकाळी बोलावलंय ना? "
"हां सर... मी करतो व्यवस्था सगळी. "
साहेबांना बंगल्यावर सोडून सरोदे क्वार्टर्सवर आला. आत जबरदस्त उकडत होतं; पण बाहेर मस्त झुळूक होती. बाजेवरच तो आडवा झाला, तेंव्हा चांदण्यांनी भरलेलं भरगच्च आकाश त्याला दिसलं. इंद्रावतीच्या रानव्याचा, शुद्ध हवेचा वास त्यानं खोल छातीत भरून घेतला.
'साहेबांची स्कीम तशी तगडी आहे' सरोदेच्या मनातल्या विचाराबरोबरच गेल्या वर्षातल्या अनेक घटना त्याच्यासमोर तरळून गेल्या. इंद्रावतीचं घनदाट जंगल पट्टेरी वाघांसाठी राखीव झालं. तिथल्या स्थानिक आदिवासींचं पुनर्वसन होतं... पण त्यांना रानाबाहेर न घालवता ते करायचं होतं. त्याच वेळी ही शक्कल पेठेसाहेबांना सुचली. दूध, मध, डिंक, नियंत्रित मासेमारी हे नेहमीचे उद्योग तर होतेच; पण तसं पाहिलं तर हे आदिवासीच इथले खरे मालक. इंद्रावतीत चालणाऱ्या भुरट्या चोऱ्या, पोचिंग याच्याविरुद्ध त्यांनाच हाताशी का नाही धरायचं? वाघांच्या अवयवांचे सौदे करून लाखोंमध्ये कमावणाऱ्या वन्यजीव माफियाचं जाळं इंद्रावतीत पसरत चाललं होतं. भारतीय वाघ संपत चालला होत. करायला तर लागणारच होता काही ना काही उपाय.
विचाराविचारांमध्ये झोप डोळ्यांवर अलगद उतरली. सरोदेला कळलंही नाही.
--------------------------------------------------------------------------------------------------------
योजनेच्या सरकारी मंजुरीची कागदपत्रं चाळून पेठेसाहेब बाहेर आले. पोरं जमली होतीच. सरोदेनं अंथरलेल्या सतरंजीवर अवघडून बसली होती. साहेब थेट त्यांच्यासमोर येऊन बसले. "उद्यापासून कामाला सुरवात करायची. समजून घ्या नीट... काही अडचण, खोळंबा असेल तर आत्ताच बोलून घ्या."
"जंगलाचे तीन वाटे आपण केलेत. एकेका वाट्यात तीन चार जण कामाला. साग, कळकाची गर्दी आहे, झरा आहे तो वाटा पहिला. आंधारी पाड्यातली मुलं तिथं राखण करतील. दुसरा वाटा तळ्याच्या आसपास. चोरटी मासेमारी तुम्ही थांबवायची. तिसरा वाटा- तुम्हाला जास्त जिम्मेदारी, जास्त धोका आहे. तुमचा रस्ता रोज बदलेल.... ते मी त्या त्या दिवशी सांगीन. हुश्शार राहून जंगलातल्या खाणाखुणा तपासत, वाघांसाठी लावलेले पिंजरे, विजेच्या तारा, विष घातलेली गुरांची कलेवरं हे सगळं हुडकत, फिरत रहायचं. कुणी कातडीचोर, नख्या काढणारे दिसले, हुकूमचंदची माणसं दिसली तर धरायचं. एक जण इकडं वर्दी द्यायला येईल. उरलेल्यांनी त्याला धरून ठेवायच. ध्यानात घ्या, नुसतं धरून ठेवायचं. मारामारी नको. पुढे मग आम्ही बघून घेऊ. "
साहेबांनी क्षणभर थांबून अंदाज घेतला. पोरांच्या डोळ्यांत चांगली चमक दिसत होती.
सरोदे बोलू लागला, "तिसऱ्या वाट्यात फेंगड्या, तू आणि सिद्राम. फेंगड्या जंगलाची पत्ती न पती ओळखतो. चोरट्यांचा वावरही तुला, सिद्रामला ओळखता येईल. काम जोखमीचं आहे. हुकूमचंदच्या माणसांकडं हत्यार पण असेल आणि तुमच्या हातात काठ्या. पण टाईट राहा. धीर गमावू नका. कुणी दिसलं की वर्दी द्यायला लगेच सुटा."
पेठे आणखी थोडे पुढे सरकले. "फिकीर करू नका. आम्ही शहरात पोलिसांशी बोलून आलोय. एकदा पकडले गेले की दहा - वीस वर्षं आतमध्ये जातील साले. तुम्हाला काय धोका नाही. "
सरोदे आत जाऊन प्रत्येकाचे गणवेष घेऊन आला. "या कामाचा महिन्याचा मेहनताना तर आहेच, पण पकडलेल्या प्रत्येक वस्तूमागं बक्षीस पण आहे. बघा रे, कापडं मापात बसतात का... "
गणवेष, काठी, शिट्टी... आदिवासी पोरांना काही खरंच वाटत नव्हतं. कुठल्याही सरकारी खात्याचा 'साहेब' असं समजावून सांगतानाही त्यानी कधी पाहिला नव्हता. पाहिली होती ती फक्त अरेरावीच.... नेपानगरवाल्यांची काय, तेंदूच्या ठेकेदारांची काय आणि सरकारी खात्याची काय!
बैठक संपली होती.
(क्रमशः)