उद्यापासून सुरवात -२

झाडावर प्रचंड वेळ बसल्यामुळं फेंगड्या कंटाळला होता. इतर वेळी त्याचे तासनतास रानात कसेही जात; पण सतत कशाची तरी वाट पाहण्याचा त्याला आता कंटाळा आला होता; पण इलाज नव्हता. खबर पक्की होती.

पाड्यावरचं एक छोटं, पण चलाख, बेरकी पोरगं सकाळीच त्याच्या कानाशी लागलं होतं. "हुकूमशेटची लोक येतव हां आजला... चिलम्याची गाठ घेताव" ते कुजबुजलं होतं. फेंगड्याच्या तोंडातली बिडी गपकन खाली पडली. साहेबाला वर्दी देऊन टेहळायला जायला लागणार. हुकूमचे लोक जबलपूरपासून येणार म्हणजे दुपारनंतरच. चिलम्याला गाठतील.

आख्ख्या पाड्यात फक्त चिलम्याच गांजेकस होता. थोड्याशा गांजा-चरससाठी तो हुकूमच्या माणसांचं काहीही ऐकायचा. वाघाचा माग देईल, घेईल, त्यांनी वाघासाठी आणलेलं विष गाईगुरांच्या कलेवरात भरून मोक्याच्या जागी ठेवील. एवढं मोठं अंबाईचं वाहन असणारा रुबाबदार वाघ विष खाऊन आडवा, निस्तेज झाला, की त्याच्या नख्या, मिशा उपटील. कातडं सोलणं म्हणजे रात्रभराचं काम. तेही हा गडी चार तासात उरकील. एवढ्याशा गांजासाठी.

फेंगड्याचा विचार थांबवणारी आणि कंटाळा पूर्ण घालवणारी गोष्ट त्याला अचानकच दिसली. थेट एका येणाऱ्या जीपवर त्याचे डोळे स्थिरावले. एका मोकळ्या भागात ती जीप थांबली. तीन जण होते. एक जण खाली उतरून, पेठेसाहेबासारखी शहरी सफेत कागदवाली बिडी पीत होता. फेंगड्या आवाज न करता खाली उतरला... आणि चिलम्या आलाच. आणि नुसता नाही आला; त्याच्याबरोबरच्या खोळीत काही तरी भरलं होतं; आणि हातात तर गुंडाळी केलेलं पटेरी वाघाचं कातडंच. मागल्यामागे फेंगड्या अलगद, सुसाट पळाला. आता सरोदेसाहेब आणि खात्याची जीप.

----------------------------------------------------------------------------------------------------------

संपूर्ण कानभर माचिसची काडी घालून अर्धवट मिटल्या डोळ्यांनी हुकूमचंद पंटर्सची हकीकत ऐकत होता. काहीशा अस्फुट हसऱ्या नेहमीच्या चेहऱ्यानं तो ऐकत होता; पण आज त्यात उमटलेला जहरी विखार समजणं त्याच्या पंटर्सच्या कुवतीबाहेरचं होतं. ज‍बलपूर मंडी मार्केटमधल्या एका दुर्लक्षित बिल्डिंगमध्ये वाचलेले पंटर्स हकीकत सांगताना अवघडून कोपऱ्यात उभे होते.
झाली गोष्ट हुकूमचंदला सटकवायला पुरेशी होती. वन्यजीवांच्या अवयवांची तस्करी हा त्याचा तीन पिढ्यांचा धंदा होता. कस्टम्सपासून पोलिसांपर्यंत लोक बांधले होते. माल जप्त तर सोडाच, एकाही फॉरेस्टवाल्याची, पोलिसाची साधी केस लावायची शामत झाली नव्हती. आणि आज ही स्टोरी. त्याची नजर एका पंटरवर स्थिर झाली.

"आपली जागा त्यांना कुठून कळाली? "

"शेट, आत जाताना तर आपलाच फॉरेस्ट गार्ड होता. काय बोलला नाय. मग धोका नाय वाटला. आतनंच कुणीतरी पाहिलं. कारण तो सरोदे, त्याचा मोठा साहेब, सगळे मागावर आले. "

दुसऱ्या पंटरनंही री ओढली. "इतलाच नाय शेट, पाड्यावरची तीन पोरंपण त्यांच्या बाजूनी मदी पडली. मग आमी कमी पडलो. गाडीमुळं कसेतरी सुटलो. "

"पाड्यावरची पोरं तिकडून मध्ये पडली? "

"होय शेट. वर त्यानला खाकी कापडं दिलीयत.... शिट्टी, काठी दिलीय. "

अच्छा. म्हणजे मोठी गेम होती. हाताच्या एका उडत्या इषाऱ्यानं त्याने सगळे पंटर बाहेर हाकलले. तंबाखूचा एक विस्तृत आणि सविस्तर बार भरला. पहिला हिशेब अर्थातच झालेल्या नुकसानीचा. दहा-बारा लाखांचा माल तर गेलाच. दोन कसलेले पंटर गजाआड. चिलम्यासारखा पाड्यावरचा कॉंटॅक्टपण अंदर, तेही कमीत कमी बारा - पंधरा वर्षं. अटकेस कारण मादक पदार्थ जवळ बाळगणं व विकणं. आणि वर पाड्यावरची पोरं फॉरेस्टवाल्यांबरोबर? माजरा क्या है? हुकूमसाठी पिंजरे लावणारी, ऐन पावसाळ्यातही 'माला' ची ये-जा न थांबवणारी पोरं फॉरेस्टवाल्यांनी पटवली?

आणि मुख्य. पाड्यावरचंही निस्तरलं असतं. पण हेडक्वार्टर्स? त्यांना काय उत्तर देणार? माझी, हुकूमचंदची, सिस्टीम फेल झाली? सेकंदभर नखशिखांत भीतीची एक लाट हुकूमचंदाचा कणा हलवून गेली...

हेडक्वार्टर्समध्ये सर्वार्थानं त्याचे बाप बसले होते. सीमावर्ती भागात धुमाकूळ घालण्यासाठी आणलेले प्रशिक्षित, भाडोत्री अतिरेकी... अस्सल अफगाणी क्रौर्य त्यांच्या नसानसांत भिनलेलं होतं. आनंद किंवा दुःख काहीही झालं तरी एके-५६ वगैरेतून हवेत गोळ्या उडवून ओरडत भावना व्यक्त करणारे ते सुंदर, बिनडोक, रेमेडोके होते.

डीलिंग व्यवस्थित केलं, तर अझीझ दोस्त. सगळं नीट होऊन वाघाची हाडं, कातडी, नखं जर नीट त्यांना पोचतं झालं की लगेच कॅश आणि नारकोटिक्स हुकूमला मिळायचीच. वर एक -दोन रात्री जोरात जशन.... पण जर तारीख देऊन पाळली गेली नाही तर फरक फक्त एके-५६ का ४७ इतकाच. त्याचं कारण होतं. सगळीकडून नाड्या आवळल्यामुळे वाघांचे ते अवयव म्हणजे अतिरेक्यांची 'कॅश'च होती. त्यांच्याकडून ते तिबेट बॉर्डरमार्गे चिनी औषध कंपन्यांत जात. विशेषतः हाडं. नखं, मिशा लंडन, पॅरीसच्या फॅशनच्या दुकानात. त्यातनं मिळालेल्या पैशातून मग शस्त्रखरेदी, भारतातलं नेटवर्क वाढवणं हे सगळं.

ही पूर्ण साखळी झरझर हुकूमचंदच्या डोळ्यांसमोरून गेली. आज किती वर्षांनी आपण त्यातला किती कमकुवत दुवा आहोत, हे जाणवून त्याला हतबल वाटत होतं; पण त्यानं शब्द पाळला नव्हता; त्यामुळे निदान झाली गोष्ट कळवणं भाग होतं. एक लांबलचक जबलपुरी शिवी हासडून हुकूमचंदनं तितकाच लांबलचक मोबाईल नंबर फिरवला.... रॉक्सॉल बॉर्डर!

(क्रमशः)