विद्याधन

सुईच्या टोकालाच जाणवेल एवढी बारीक कुसर कोरलेल्या संगमरवरी स्तंभांनी ते सभागृह सजले होते. सर्व स्तंभ साच्यातून ओतून काढल्याप्रमाणे एकसारखे होते. सभागृहाला भिंती नव्हत्या. खालची जमीन एका प्रचंड काळ्या पाषाणातून अलगद कोरून काढली होती. त्यावर बटबटीत रांगोळीसारखी एकच एकछापी नक्षी होती.

सभागृहाचा चौथरा पुरुषभर उंचीचा होता. त्यावर ठिकठिकाणी खाली पाय सोडून एकटे दुकटे तरुण बसले होते. मनाशीच ते सुरावटी गुणगुणत होते, त्यातील हीण शोधत होते, ठोकून-तपासून त्या सुरावटी पक्क्या करीत होते.

नुकतेच स्नान करून आलेला तीव्रबुद्धी अस्वस्थ मनाने कोपऱ्यात उभा होता. आज त्याचा केदारदीक्षा समारंभ होता. रात्रंदिवस मेहनत करून त्याने केदार रागामध्ये स्वतःचे निशाण लावले होते. आज ते निशाण आचार्य प्राज्ञमतींच्या उपस्थितीत साजरे केले जाणार होते. मग त्याने उभे केलेले स्वरचित्र आणखी कोणालाही रंगवायला बंदी होती. आणि आणखी दुसरे स्वरचित्र उभे करायला त्यालाही बंदी होती. त्याने उभे केलेले स्वरचित्र हीच त्याच्या अस्तित्वाची खूण राहणार होती. श्वासाच्या यांत्रिकपणे तो पुन्हा पुन्हा ते स्वरचित्र रेखाटणार होता आणि या प्रकाराला सरावलेल्या रसिकांचे मनोरंजन करणार होता.

दीक्षासमारंभ ऐकण्यास सर्वांना मुक्तद्वार होते. पण सभागृहात बसून त्या समारंभात सामील होणे हा विशेष मान होता. तो निवडक रसिकांनाच, ज्यांच्या रसिकतेबद्दल आचार्यांची खात्री झाली आहे अशांनाच, प्राप्त होता. प्रत्येक दीक्षासमारंभात त्या मानकऱ्यांच्या यादीत वाढ होत असे.

पायात ओबडधोबड कातडी पादत्राणे, कमरेला धोतराचे अर्धुक, खांद्यावर कांबळे, डोक्याला मुंडासे आणि हातात घुंगराची काठी असा तो धनगर रमतगमत तिथे आला आणि सभागृहाच्या चौथऱ्याला पाठ टेकून त्याने खाली धुळीत पाय पसरून दिले. या दीक्षासमारंभाबद्दल त्याने खूप ऐकले होते आणि हरप्रयत्ने आजची वेळ त्याने साधली होती.

रुबाबदार दिसणारे आचार्य प्राज्ञमती गंभीरपणे पावले टाकीत आले. त्यांच्या सोबत मान्यताप्राप्त रसिकांचा एक बेदरकार घोळका होता. आणि मान्यतेसाठी वाट पाहणाऱ्या रसिकांचा एक छोटा घोळका अतिनम्रपणे आणि अतिगंभीरपणे हात मागे बांधून हळूहळू चालत होता.  सभागृहाच्या पायऱ्या चढताना आचार्य थबकले आणि सावकाश मागे वळले. सर्वत्र स्तब्ध शांतता पसरली आहे याची खात्री पटल्यावर त्यांच्या सपक घोगरट आवाजात त्यांनी एकच नाव उच्चारले, "कवी चारुकांत".

तीव्रबुद्धीचा बालमित्र असलेला चारुकांत याच क्षणाची वाट पाहत होता. झटकन पुढे होऊन त्याने आचार्यांना वंदन केले आणि दोन पायऱ्या मागे सरकून तो नम्रपणे उभा राहिला.

घडून गेलेली घटना बऱ्याच जणांना अपेक्षित होती, तरीही काही जणांना आश्चर्याचा तीव्र धक्का बसलाच.

तो धनगर आळसटलेल्या कंटाळवाणेपणे इकडेतिकडे बघत होता.

सभागृहात बसणारे सभागृहात बसले.  चौथऱ्याखाली उभे राहणारे चौथऱ्याखाली उभे राहिले.  सभागृहात एकटे आचार्य उभे होते. चौथऱ्याखाली एकटा धनगर बसला होता.

दीक्षा समारंभाची सुरुवात झाली. समारंभ सुटसुटीत होता. रागाचे सादरीकरण, आणि त्याला दीक्षा द्यायची की नाही याबद्दल आचार्यांचा निर्णय. ज्यांचा दीक्षासमारंभ आधीच झाला होता असे सर्वजण सभागृहात उपस्थित होते.

थोडीशी खळबळ झाली. नव्याने कळपात सामील झालेल्या चारुकांतने उठून बोलण्याची परवानगी मागितली. आचार्यांनी त्याला मानेनेच खुणावले.

मग तीव्रबुद्धीच्या गाण्यातली मर्म, सौंदर्यस्थळे, कुसरीची ठिकाणे या आणि अशा विषयांवर चारुकांतने एक प्रहर बडबड केली. तो स्वतः कवी असल्याने त्याच्यापाशी शब्दांना तोटा नव्हता. त्या शब्दभडिमाराखाली बरेच जण दडपून गेले. एवढे, की यापूर्वी कुणालाही न मिळालेली दीक्षासमारंभात बोलायची परवानगी चारुकांतला का मिळाली हे विचारायचेदेखील कुणाचे धाडस झाले नाही. तीव्रबुद्धीच्या चेहऱ्यावर हलकी स्वप्रसन्नता उमटली.

धनगर डोळे मिटून बसला होता. तीव्रबुद्धीचे गाणे सुरू झाल्यावर तो हळूहळू उठला आणि चौथऱ्याला पाठ-डोके टेकवून उभा राहिला.

तीव्रबुद्धी आचार्यांचा लाडका शिष्य होता. त्याच्या पदरी भाटकवी होते. त्याचे लग्न खुद्द अमात्यकन्येशी ठरले होते त्यामुळे त्याला संपत्तीची ददात नव्हती. पण त्याला आवाज नव्हता. सोमरसात जास्वंदीची फुले कुस्करून घालण्याचा त्याचा प्रयोग उलटला होता आणि त्याच्या स्वरयंत्रावर कायमचा परिणाम होऊन बसला होता. त्यामुळे त्याचा खर्ज पोकळ लागत होता नि तारस्वर पिचका.

पण या सगळ्या अडथळ्यांमधून तो निधडेपणाने वाट काढीत होता. साथीदारांना मधूनच नजरेने चमकावीत होता. धांदोट्या गोळा करून महावस्त्र विणायचा घाट घालीत होता.

एवढे मात्र खरे, की तो वाटेत कुठे अडखळला नाही. सर्वकाही पाठ करून ठेवल्याप्रमाणे तो पुढे घरंगळत होता.

गाणे संपले. काय होते आहे हे कळायच्या आतच चित्त्याप्रमाणे पायऱ्या ओलांडत त्या धनगराने सभागृह गाठले. आचार्यांपाशी पोचून त्याने त्यांना वाकून नमस्कार केला आणि तो बोलू लागला.

अथांग पसरलेल्या निळ्या महासागरावर पावसाचे टपटपीत थेंब पडावेत तसा त्याचा आवाज होता. त्यात कसलीही भेसळ नव्हती. फक्त नजरेचे मोती करण्याची ताकद असलेला फिकट निळा पूर्णगोल आकार.

"प्रथम मला वाटले की काही लुटूपुटीचा खेळ चालू आहे. तो कुठल्याही क्षणी संपेल अशी मला आशा होती, पण ती फोल झाली.

"मी कोणी सर्वज्ञ माणूस नाही. कारण भाषेच्या एका शब्दातून, संगीताच्या एका सुरातून, शरीराच्या एका हालचालीतून फुलणारे अर्थाचे पिसारे सर्वज्ञाला अप्राप्य असतात. प्रत्येक सुराचा, शब्दाचा, रंगाचा एकच, आणि त्यामुळे कदाचित सत्य, अर्थ त्याला ठाऊक असतो. आणि त्या अर्थाचे त्याच्या मनात उमलणारे फूल एकरंगी असते. सर्वज्ञ माणसाचा संवाद खुंटतो, कारण संवाद हे अज्ञानाचे प्रकटीकरण आहे.

"या अज्ञानाला आकार नसतो, परिमाण नसते. सर्वज्ञतेचा उंबरा ओलांडून आत दोन्ही पावले पडेपर्यंतचे ते सर्व अज्ञान. त्याचा दर्जा एकच.

"त्या अज्ञानातला एक लचका तोडून त्याला खुळचट आढ्यतेचे कुंपण घालून हा जो बाजार तुम्ही मांडला आहे त्याचे वाईट वाटते.

"तुमची भरभराट होवो, तुम्हांला खूप शिष्य मिळोत, त्यांच्या गाण्यातून निरंतर अंधाराला बाजूला सारीत प्रविष्ट होणाऱ्या पिवळसर निळ्या ज्योतीची अनुभूती येवो, एरवी प्रियेसमोर गोंडा घोळणारे अनेक कविश्रेष्ठ त्यांच्या चरणी रुजू राहोत, अशा माझ्या मनापासून सदिच्छा.

"पण या सगळ्यात तुम्ही संगीताला मध्ये घेतले आहे, त्याच्यावर डाग पडत आहेत, त्याची शकले होत आहेत, हे माझे दुःख आहे.

"संगीत ही अशी कुंपणात बंदिस्त करून ठेवायची गोष्ट नव्हे. नव्हे, ती कुंपणात बंदिस्त होऊच शकत नाही. आणि तिच्यावर प्रकाश पाडायला शब्दांचीही गरज भासत नाही. शब्दांच्या दिवट्या घेऊन धावत येणारे वीर त्या दिवट्यांचा प्रकाश त्यांचा हीन ढोंगीपणाच उजळून दाखवतो आहे हे लक्षात घेत नाहीत.

"एका माणसाने आयुष्यभर एकच राग म्हणायचा, तोही एकाच प्रकारे. असला कृतघ्न अत्याचार संगीतावर करायचा तुम्हांला हक्क कोणी दिला? असे किती राग आहेत तुमच्याकडे? पाच? पन्नास? पाचशे? कलेचा बाजार तुम्ही मांडलाच आहे, मग तेवढ्या विद्यार्थ्यांच्यानंतर तुमचा विक्रय बंद पडेल एवढे तरी ध्यानी घ्या.

"कलेचा बाजार असे चोखपणे म्हणायलाही जीभ वळत नाही. आत्ता सादर केले तसले हीण तुम्ही केदार रागाचा अंतिम शब्द म्हणून जाहीर करणार. आणि ते का? तर उष्ट्या किडक्या शब्दकल्पनांची सालपटे चिकटवून कावळ्याचा मोर करू पाहणारे भाट त्याची थुंकी झेलतात म्हणून? मग तुमची गरजच काय? कुणीही उठावे आणि सुचेल त्या नावाचा आपल्या कपाळावर टिळा रेखून घ्यावा. रागांरागांतील फरक काय, एकाच रागाच्या विविध रूपांमधले वैविध्य कसे उमटते याची नाहीतरी कुणाला काळजीच नाही. "

आचार्य शांत होते. तीव्रबुद्धी लालेलाल झाला होता. लोक कुजबुजत होते. आता या धनगराचे मुंडके उडणार याची सर्वांना खात्रीच होती. आचार्यांचा अधिकारच तसा होता. कित्येक वर्षांपासून ते राजाला संगीत शिकवत होते. त्यांचा शब्द राजा खाली पडू देईल हे शक्यच नव्हते.

आचार्य बोलू लागले. त्यांच्या आवाजाला खिन्न परिपूर्तीचे विरविरीत आवरण होते.

"खरे आहे तू म्हणतोस ते. हे कधी ना कधी कुणाच्यातरी जाणिवेत उतरेल आणि तो धैर्याने हे मांडेल या आशेवर मी दिवस काढले.

"आतापर्यंत मी 'गुरू' म्हणवून घेण्यालायक काहीच केले नाही. या कणाहीन पोषाखपंडितांना मी दिले ते ज्ञान नव्हे, तर त्याचा आभास. मला जे काही तुटपुंजे ज्ञान आहे ते देण्यासाठी मी योग्य शिष्य शोधीत होतो, पण ते घेण्याची तर सोडाच, त्याच्या अस्तित्वाबद्दल विचार करण्याची पात्रता असलेलाही कुणी सापडला नाही. मग हा लुटूपुटीचा देखावा मांडून मी माझी करमणूक करून घेत गेलो. प्रत्यक्षात मी स्वतःचाच छळ करीत होतो.

"आता माझे संपत आले आहे. पण शिल्लक आहे तेवढी उमेद तुझ्या मालकीची आहे. कोण गुरू हे माहीत नसताना दिलेल्या तुझ्या गुरुदक्षिणेने तू गुरूला दास करून घेतले आहेस. "

दोघेही चालू लागले.

मळभ दूर झाले आहे. लख्ख प्रकाश पडला आहे. आता तो कितीही काळ टिकेल. काही क्षण वा काही युगे वा निरंतर. नक्की किती ते कुणालाच ठाऊक नाही. पण काही बिघडत नाही. मृदूकोमल प्रकाशाने आपल्या पूर्ण ताकदीने सर्व जाणीवांना कवेत घेतले आहे. पुन्हा सावट आले तर ते जाणवणारा, त्या सावटावरून प्रकाशाचे मूल्यमापन न करणारा एक जीव प्रकाशाची स्पंदने अनुभवतो आहे.

प्रकाशाला पुन्हा दृष्टी प्राप्त झाली आहे.