बिट्या

सपकन हाणलेल्या छडीचा वण उमटावा तशी काळ्या-करड्या मातीत मध्येच रेल्वेलाईन सरसरली होती. मळकट कौलारू छपरांच्या टोप्या घालून उभी असलेली घरे मेल्या झुरळाला मुंग्या लागाव्यात तशी रेल्वेलाईनला बिलगली होती. त्यातच वालपिटे स्टेशन आपले डोके उंचावून उभे होते.

तसे अभिमानाने डोके उंचावण्यासारखे त्या स्टेशनात काही नव्हते. फलाट जेमतेम फूटभर उंच होता. एक ए. एस. एम. आणि एक तिकीट क्लार्क एवढाच तिथे सुटसुटीत संसार होता. पिण्याच्या पाण्याचा नळ गंजक्या कपच्या सांभाळीत कोरडा उभा होता. एकट्या सिमेंटच्या बाकावर कुणीतरी डांबर घालून ठेवले होते.

गुळाच्या ढेपेसारखा बसकट बजाबा सुटल्या पोटावरून हात फिरवीत कायम ए. एस. एम. च्या खोपटीत बसलेला असे. फार वेळ झाला की मग तो पोटावरचा हात जरा खाली घेई आणि धोतराच्या कनवटीला खोचलेली चंची काढून सातारी जर्द्याचा एक मनपसंत तोबरा तोंडात भरून घेई.

जवानीत कुस्त्या गाजवलेला बजाबा आणि चारमिनारने बोटे पिवळीजर्द पडलेला नाकतोड्यासारखा कडक्या ए. एस. एम. हेगडे यांचे काय सूतगूत होते हे कुणालाच ठाऊक नव्हते. तासंतास बसूनदेखील थुंकण्यापलीकडे बजाबाने फारसे तोंड उघडल्याचे कुणाच्या ऐकीवात नव्हते. हेगडे तर कायम धुराचे लोट सोडत बसलेला असे. त्याच्या खोलीला आतून धुराचा गिलावा करण्याचे काम हाती घेतल्याच्या निष्ठेने तो भारतीय रेल्वेची मालमत्ता असलेल्या खुर्चीवर बैठक ठोकून बसत असे. मुळात तिथे थांबणाऱ्या पॅसेंजर दोन. ते काही तो फारसे मनाला लावून घेत नसे. फक्त त्यांच्या आणि मुंबई एक्सप्रेसच्या वेळेला तो सिग्नलचा झेंडा मेल्या उंदरासारखा हातात धरून फलाटावर उभा राही. वर्षातून दोनदा बजाबा मुलीच्या सासुरवाडीला जाई तेव्हा फक्त तो इंजिनापर्यंत चालून बजाबाची सोय त्यात लावून देई.

पॅसेंजरची वेळ झाली तशी कापडी पट्ट्याने गळ्याला अडकवलेली, धमक पिवळा भडंग भरलेली, वेताची टोपली सांभाळीत बिट्या तिथे पोचला.

तो कोण, कुठला, कुणालाच माहीत नव्हते. एका पावसाळी दुपारी दुहेरी हाडापेराचा आणि उंचनिंच असा हा प्राणी रेल्वेलाईनच्या कडेने चालत चालत स्टेशनात आला. आला, आणि पागळत्या कपड्यांनी हेगडेच्या कॅबिनमध्ये येऊन बसून राहिला. नाव, गाव, पत्ता, कुठल्याच प्रश्नाला त्याने तोंड उघडले नाही. ताडगोळ्यासारखी निर्जीव नजर दारावर चिकटवून तो उकिडवा बसून राहिला. हेगडे सिगरेटीवर सिगरेट पेटवीत राहिला. शेवटी दाराजवळ सरकत बजाबाने तोंड मोकळे केले आणि विचारले, "भाकर खातूंस रं?" हांऱ्हूं न करता त्याने बजाबाचे गठुळे पुढ्यात घेतले आणि वांगं-भाकरी-ठेचा खाऊन तो निवांत बसला. बजाबाने त्याला मग आपल्याकडेच ठेवून घेतले आणि स्वतःहून वीतभर उंच असलेल्या त्याचे 'बिट्या' असे बारसे करून टाकले.

दिवस उलटले तसा बिट्या हळूहळू बोलू लागला. बोलू लागला ते व्यवहारापुरतेच. त्याचा इतिहास अंधारातच राहिला.

रेल्वेत भडंग विकण्याची कल्पना त्याचीच. विठाबाईकडचे भडंग तोंडात भूक पेटवून जात. बिट्या काहीतरी करू पाहतो आहे म्हणताना बजाबाही खूष झाला होता.

भडंग विक्रीतून प्राप्ती अशी खात्रीची नव्हती. कारण बिट्याचे गणित दहा रुपयांपर्यंतच विश्वासार्ह होते. त्याहून मोठी नोट कुणी काढली की तो घाबरून त्याच्याकडे जमलेला सगळा गल्ला त्या गिऱ्हाईकाला परत करी आणि आपण करायला पाहिजे होते त्यापेक्षा कमी पैसे परत केले की काय म्हणून भीतीने कावराबावरा होऊन त्या गिऱ्हाईकाकडे पाहत बसे. आणि एवढ्या नवसासायासांनी मिळालेली मोठी नोट (वा त्याखालील पाच-दहाच्या नोटा) सुखरूप घरी येण्याची शाश्वती नव्हती. घामेजल्या मुठीत आवळून कधी त्या नोटेचा लगदा होई तर कधी ती हवेत उडून जाई.

असला बुडीतखाती धंदा कशाला चालवायचा असे नामू शिंप्याने एकदा बजाबाला विचारले तेव्हा बजाबा भडकला. "रांड्या, त्याला तीन टाईम पोटाला कोन घालतो? तुजा बा? त्याला कापडतुकडा कोन करतो? तुजा आजा? पुन्नाच्यान त्वांड उगडलंस तर मोकळं करून दीन दात सगळं". त्याने खरेच केलेही असते तसे, त्यामुळे नामू मुकाट बसला.

थकल्या-भागल्या म्हाताऱ्यासारखी उठत-बसत गाडी स्टेशनात आली. बिट्या डब्यात चढला. डब्यातली गर्दी त्याने हेरून घेतली. आणि दम दिल्यासारख्या आवाजात तो गुरकावला "हे..... दोदोन रुपये भडंग, मस्सालेदार भडंग, टैमपास्स भडंग, दोदोन रुप्ये, द्दोन रुपिये". सकाळी कपभर चहा पिऊन गाडी गाठायला गडबडीने आलेल्या जनताजनार्दनाच्या जिभा चाळवल्या. बिट्याची विक्री सुरू झाली.

करकरत धपापत गाडी सरपटत होती. हळूहळू ऊन चढत होते. सावली लहान होऊ लागली की ही गाडी कोल्हापूरला पोचणार होती, आणि उन्हे कलल्यावर परत निघणार होती.

खिसा खुळखुळवण्याइतका गल्ला बिट्याने जमवला आणि संडासासमोरच्या बोळकंडीत उभा राहून तो मन लावून खिसा खुळखुळवू लागला. अचानक त्याचे लक्ष कोपऱ्यात अंग मुडपून बसलेल्या म्हाताऱ्याकडे गेले. काळ्या राकट रंगाचा तो हाडकुळा म्हातारा अंगापिंडाने चिमणीसारखा होता. चेहऱ्याच्या उंचावलेल्या हाडांवरून कातडी कशीबशी न विरता ताणली गेली होती. गुडघ्यापासून खाली उघड्या असणाऱ्या पायांच्या नळ्या पोटाशी घेऊन तो मुसमुसत बसला होता.

बिट्याला कसेसे झाले. खाली वाकून त्याने विचारले, "बाबासाब, कुटं जायाच तुमास्नी?" म्हाताऱ्याने आपली मळकट बुबुळे स्थिरावत बिट्याकडे पाहून घेतले आणि सुर्रकन नाक ओढून तो बोलू लागला, "माजी बाईल खंय रंवली ता माका म्हायती नाय रे झिला. लॉक म्हणतंत साताऱ्याक तिका बगलंय म्हणान थंय जावंन इलंय. पण थंय ना ती. आता तिका खंय बगू माका कळना न्हंय. तुका म्हायती हा रे, तुका म्हायती हा? सांग झिला, सांग माका सांग" म्हणताम्हणता म्हाताऱ्याचा एक हात पुढे आला आणि बिट्याच्या मानेभोवती वेटाळून बसला. समजूत काढल्यासारखी मान हलवत बिट्या त्याला थोपटत बसला.

कोल्हापूर आले. बिट्याने म्हाताऱ्याला उतरवून घेतले आणि फलाटावर तो त्याची राखण करीत बसला. म्हातारा पुटपुटणे आणि बडबडणे यांच्या सीमारेषेवरचे आवाज मधूनमधून घशातून काढत होता. "माजो सोन्यासारको चेडू रे ता, तिका मायझंयांनी मारलनी. तिच्या घोवाक भेटाक गेलो तर भड्वो म्हनता कसा, 'हजार रुपये न्हंय दिलास तर तुजा चेडू काय तुका दिसना न्हंय. भोसडिच्यांनी तिका मारलंनी रे. माज्या बायलेन माका गाळ्या घातल्यान. पन माजो काय्येक दोस ना ह्या तिका म्हायत होता रे. माजी ना ती बाईल. माज्या झिलाचो थंय मुंबईत आक्षिडेण झाला त्येका बगूक गेलंय तर हंय माजी बाईल निगान गेली. खंय गेली ता गावात कुनाशीकच कळना न्हंय. वामनभटाक इचारलंय तर बामण म्हंता कसा, 'ईशान्येक जा'. आता ईशान्य खंय हे कुनाच्या बापाशीक म्हाईत? "

पॅसेंजर गाडी परतून फलाटाला लागली. बिट्याने म्हाताऱ्याला पुन्हा गाडीत चढवले. गाडी डुगडुगू लागली. बिट्याला मांजरासारखे चिकटून बसलेल्या म्हाताऱ्याचे मुसमुसणे आता बंद झाले. बिट्याने त्याची स्थापना बाकावर केली होती. तिथे मांडी घालून, खिडकीला डोके लावून तो बसला होता आणि शेजारी बसलेल्या बिट्याकडे सलगीने पाहत होता.

"झिला, लाल धागा मेळतली रे? लाल धागा? लाल धागा बिडी?" बिट्याने ऐटीत एक अख्खे बंडल खरेदी केले आणि आपणच विडी ओढणारे झाल्याच्या थाटात त्याने म्हाताऱ्याकडे ते सरकवले.

"माका खंय घेवन चल्लंस रे? कोलापुरासून माका यष्टीने जांवक व्हंया राधानगरीत्सून. पयसा हां रे" म्हाताऱ्याने बंडीतून जीर्ण पन्नास रुपयांची नोट बाहेर काढली. बिट्या गडबडला. रेटारेटी करीत त्याने ती नोट परत म्हाताऱ्याच्या बंडीत खुपसली. त्या धक्काबुक्कीत म्हाताऱ्याला सणसणीत खोकल्याची उबळ आली. नुकतीच पेटवलेली बिडी फेकून देऊन तो खँय खँय खोकत बसला. वालपिट्याच्या स्टेशनवर गाडी उभी राहताच त्याने घसा खरखरवीत बेडका टाकला आणि त्याची मान पडली. म्हाताऱ्याला पाठुंगळी मारून बिट्याने हेगडेच्या कॅबिनमध्ये बजाबापुढे सादर केले तेव्हा म्हातारा धुतलेल्या धोतरासारखा बोळा झाला होता.

"बजाबा, ह्येला ह्येच्या घराकडं पाटवा" असे सांगून बिट्या घाईत घराकडे गेला.

बेवारशी प्रेत म्हणून पोलिस पंचनाम्याचे सोपस्कार आटपून बजाबा घरी पोचला तेव्हा मध्यानरात होत आली होती. खळ्याच्या कडेला बिट्या घोंगडे पांघरून बसला होता.

"कुटनं आनलावतास बाबा त्येला?" बजाबाने हळुवारपणे विचारले.

"त्येला पाटिवला की न्हाई घरला?" बिट्याने उत्सुकतेने प्रतिप्रश्न केला.

"पाटिवला बाबा, पाटिवला. चांगला घरापोत्तर सोडला त्येला. म्हून तर वाढूळ येळ झाला" बजाबाने गडबडून उत्तर दिले. "चल आता भाकर खायाला".

"कसलं पाटिवता त्येला?" सुस्कारा सोडून बिट्या म्हणाला. "त्ये तर मेल्यालं हुतं. माजा बाबी असाच म्येला न्हवं का? बिडी वढू ने म्हनत्यात ते काई लबाड न्हवं. असू द्या. चंपीला कालवड हुनार म्हनताना बसलोवतो वाट बघत. झकास कालवड हाये".

चांदण्यांच्या पिठूळ प्रकाशात सगळे जग गरागरा नाचते आहे असे बजाबाला वाटले आणि चकित नजरेने तो सरळ पाहत राहिला.

पेटलेला अजगर फुसफुसत जावा तशी मुंबई एक्सप्रेस निघून गेली.