टोल्यांचे घड्याळ आणि वामकुक्षी

माझ्याकडे एक टोल्यांचे (ठोक्यांचे) घड्याळ आहे. सर्वच टोल्यांच्या घड्याळांप्रमाणे, ते प्रत्येक पूर्ण तासाच्या वेळेला (म्हणजे मिनिटकाटा बारावर असताना) जितके वाजले असतील तितके टोले आणि दोन पूर्ण तासांच्या मधल्या अर्ध्या तासाच्या वेळेला (म्हणजे मिनिटकाटा सहावर असताना) एक टोला देते. (उदा. तीन वाजता तीन टोले, चार वाजता चार टोले, वगैरे; पण साडेतीन वाजता एक टोला, साडेचार वाजता एक टोला वगैरे.)

एकदा मी असाच दुपारचा वामकुक्षी घेत होतो. जाग आली, तर घड्याळाचा एक टोला ऐकला. आळस जाईना, म्हणून तसाच अंथरुणात पडून राहिलो. तर थोड्या वेळाने आणखी एक टोला ऐकला. तरीही उठायचा कंटाळा केला. तर थोड्या वेळाने आणखी एक टोला ऐकला. म्हटले अजून थोडा वेळ पडू आणि मग उठू, तर थोड्या वेळाने आणखी एक टोला ऐकला.

हे गौडबंगाल काही केल्या कळेना. चकित होऊन मी ताडकन अंथरुणातून उठलो.

म्हणजे मला जाग नेमकी कधी आली?